Monday, 3 October 2016

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा





         उस्मानाबाद,दि.3:- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि.5 पासून सुरुवात होणार आहे. यात, दि.5  रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 6 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.7 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि.8 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.9 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
            तत्पूर्वी, काल (रविवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
                                                        ****

Sunday, 2 October 2016

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद, दि.2 : आपल्या संपूर्ण आयुष्यातील आचरणातून आणि विचारांमधून जगाला शांतता , मानवतावाद , संहिष्णुता , बंधुभाव यांचा संदेश दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे , उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी , तहसिलदार राजकुमार माने, यांच्यासह कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते

शारदीय नवरात्र महोत्सव -2016 नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने प्रशासन अहोरात्र सज्ज



         उस्मानाबाद,दि.2:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह  तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून यात्रेकरु मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या भाविकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच मंदिर संस्थानासह विविध यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र तुळजापूरनगरीत पाहायला मिळत आहे.
            श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून  भाविक शिस्तबद्धरित्या दर्शन घेत असल्याचे दृश्य दिसत आहे. राजे शहाजी महाद्वार येथून दर्शनरांग बंद करण्यात आली असून धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगांतील बदल भाविकांना समजण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर जवळपास 2 हजारच्या आसपास अधिकारी-कर्मचारी वर्ग जागोजागी थांबून नियंत्रण ठेवत आहेत. मंदिर व आसपासच्या परिसराची सीसीटीवीद्वारे पाहणी केली जात असून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील 200पोलीस पाटीलही  भाविकांच्या सुरक्षेसाठी नवरात्रौत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत.
भाविकांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे  व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहेत.
 आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा चांगल्या प्रकारे लाभ भाविक घेत आहेत.यासाठी जवळपास 12 वैद्यकीय अधिकारी , 146 आरोग्य कर्मचारी , चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात आहेत . याशिवाय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत भाविकांना मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्षही येथे सुरु करण्यात आला आहे . 
शहरामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी नगरपालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनांच्या होणाऱ्या त्रासापासून चालणाऱ्या भाविकांची सुटका झाली आहे , एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय, त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देणे, त्यांच्यासाठी लॉकर्स, रुम्सची व्यवस्था या बाबींची व्यवस्था करण्यात  आली आहे.
            बाहेरुन येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेची, वाहतूक मार्गात केलेल्या  बदलाची माहिती मिळावी,यासाठी जागोजागी विविध भाषांमधील फलकांद्वारे माहिती दिली जात आहे. मंदिर परिसर आणि शहरातही अधिकाधिक स्वच्छता राहावी, यासाठी नगरपालिका यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील साफसफाई करण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने 280 कर्मचारी कार्यरत असून शनिवारी महाद्वार चौक, आर्य चौक, कमानसेवा यासह अंतर्गत रस्त्यांची तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांकरिता पालिकेकडून कोंडवाड्यांची व्यवस्था करण्यात आली  असून यासाठी अतिरिक्त कामगारांचीही नियुक्ती  करण्यात आली आहे याशिवाय उस्मानाबाद रोड वाहनतळ ते नळदूर्ग रोडवरील गोलाई तसेच लातूररोड ते धारीवाला,शिवाजी पुतळा ते हेलीपॅड आदी ठिकाणचे गवत व झुडपे काढण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मुख्याधिकारी राजीव बुबणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता एम.आर. फारुखी , कनिष्ठ अभियंता अशोक सलगले ,  प्रशांत चव्हाण , अविनाश  राऊत ,  अविनाश काटकर , स्वच्छता निरिक्षक प्रताप कदम, सहायक दत्ता साळुंके,मुकादम राजेंद्र सातपुते,  विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी श्री. मोटे हे नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसर  येथे सतत लक्ष ठेवून आहेत.

            शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत                श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्षाळ पूजा झाली. यावेळी   प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजित नरहिरे,  तुळजापूरचे तहसिलदार  दिनेश झांपले,भूमचे तहसिलदार  सुरेंद्र  देशमुख , मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.       *****