Tuesday, 8 September 2026
ज्येष्ठ प्रवासी वाहतूक चालकांच्या कल्याणासाठी मिळणार सन्मान निधी
ज्येष्ठ प्रवासी वाहतूक चालकांच्या कल्याणासाठी मिळणार सन्मान निधी
धाराशिव दि.८ सप्टेंबर (जिमाका) राज्यातील ऑटो-रिक्षा व मीटर टॅक्सी चालक / मालक यांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना व सुविधा ऑटोरिक्षा / मीटर टॅक्सी चालक मालक यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
या मंडळामध्ये जास्तीत जास्त प्रवासी वाहनाच्या चालकाने सहभागी व्हावे, यासाठी शासन शुध्दीपत्रकान्वये या मंडळाचे नाव "धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ" असे करण्यात आले आहे.तसेच या कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्याबाबत पात्रतेमध्ये सुधारणा करुन सर्व प्रकारचे प्रवासी वाहने चालविणारे बॅज असलेले अनुज्ञप्तीधारक यांना मंडळाचे सभासद करून घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
प्रवासी वाहतूक क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिकपणे व जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ चालकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ चालक सन्मान निधी या उपक्रमांतर्गत पात्र ज्येष्ठ प्रवासी वाहतूक चालकांना १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येत आहे.प्रवाशांची सुरक्षित वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चालक बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
ऑटो रिक्षा,टॅक्सी चालकांसह सर्व प्रवासी वाहतूक चालकांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत ऑटो रिक्षा,टॅक्सी, कैब,मॅक्सी कॅब,बस,स्कूल बस, कॉन्ट्रॅक्ट कॅरेज तसेच इतर प्रवासी वाहतूक वाहनांवरील पात्र चालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांसह सर्व पात्र प्रवासी वाहतूक चालकांनी मंडळाचे सभासदत्व स्वीकारावे,तसेच ज्या पात्र चालकांनी अद्याप सभासद म्हणून नोंदणी केलेली नाही,त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्याशी संपर्क साधून सभासद नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
मंडळाच्या कल्याणकारी योजनांची माहिती अधिकाधिक चालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. पात्र चालकांनी मंडळाशी जोडा कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0000000