Wednesday, 9 September 2026

पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा न्या.भाग्यश्री पाटील

पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा न्या.भाग्यश्री पाटील तुळजापुरात जिल्हास्तरीय कार्यशाळा ; लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी यंत्रणांच्या समन्वयावर भर धाराशिव,दि.९ सप्टेंबर (जिमाका) मुलगी जन्माला येण्याआधीच तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये,यासाठी गर्भलिंग निदान आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय व्यावसायिक आणि संबंधित सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील यांनी केले. ८ सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्था येथे पीसीपीएनडीटी,एमटीपी व सरोगसी कायदा तसेच लिंग गुणोत्तर या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती.पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी त्या बोलत होत्या. न्या.श्रीमती.पाटील पुढे म्हणाल्या की,मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट ही केवळ आकडेवारीतील बाब नसून सामाजिकदृष्ट्या गंभीर आणि चिंताजनक विषय आहे.त्याचे दूरगामी परिणाम समाजाच्या लोकसंख्यात्मक समतोलावर होऊ शकतात.त्यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे,लिंग निवडीला प्रतिबंध करणे आणि याविषयी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. पीसीपीएनडीटी कायद्यान्वये नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांनी कायद्यातील सर्व विहित तरतुदींचे काटेकोर पालन करावे.आवश्यक अभिलेख व नोंदी अद्ययावत ठेवण्याबरोबरच विहित नमुन्यातील कागदपत्रांची पूर्तता आणि संबंधित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायद्यापासून ऑनलाइन नोंदणीपर्यंत मार्गदर्शन कार्यशाळेत सोलापूर येथील डॉ. माणिक गुर्रम यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील विविध तरतुदी,त्याची प्रभावी अंमलबजावणी,सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसेच आवश्यक अभिलेख व नोंदींच्या देखभालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सोनोग्राफी व एमटीपी केंद्रांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी,आवश्यक कागदपत्रे आणि अभिलेख अद्ययावत ठेवण्याबाबतही त्यांनी माहिती दिली.छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.हर्षलता लड्डा यांनी सरोगसी कायदा,त्यातील प्रमुख तरतुदी तसेच त्यासंबंधीच्या वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींची माहिती दिली. खबरी योजनेचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रे,पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी आणि जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या खबरी योजनेबाबतही त्यांनी माहिती दिली. कार्यशाळेला जिल्ह्यातील नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र संचालक,एमटीपी केंद्रधारक, स्त्रीरोगतज्ज्ञ,उपजिल्हा व स्त्री रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील,जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.महेंद्र देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी,डॉ.अनिल चव्हाण,पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय खुणे आणि अमर सपकाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जोशी यांनी केले,तर डॉ.दत्तात्रय खुणे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.विक्रांत राठोड, शिवाजी साळुंखे,राहुल निरणे, शरद नाईकनवरे,उमेश गोरे,प्रदीप तटाळे,गोरोबा खांडेकर आणि श्रीनिवास निर्मल आदींनी सहकार्य केले. मुलींच्या जन्माचे स्वागत ही सामूहिक जबाबदारी मुलगा-मुलगी हा भेद न करता प्रत्येक मुलीला जन्माचा समान अधिकार आणि सन्मान मिळणे ही केवळ कायद्याची अपेक्षा नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे.पीसीपीएनडीटीसारख्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, वैद्यकीय क्षेत्राचे जबाबदार सहकार्य आणि समाजातील मानसिकतेत सकारात्मक बदल या तिन्हींची सांगड घातल्यास लिंग गुणोत्तरातील असमतोल दूर करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळू शकते. ००००००००००००