Sunday, 6 September 2026
जिल्हा युवा महोत्सवात विद्यापीठ उपपरिसराच्या विद्यार्थ्यांची नाट्य क्षेत्रात चमक मूकाभिनयात प्रथम ; एकांकिका, प्रहसन व लघुपटात द्वितीय क्रमांक साक्षी गायकवाड स्त्री अभिनयात प्रथम
जिल्हा युवा महोत्सवात विद्यापीठ उपपरिसराच्या विद्यार्थ्यांची नाट्य क्षेत्रात चमक
मूकाभिनयात प्रथम ; एकांकिका, प्रहसन व लघुपटात द्वितीय क्रमांक
साक्षी गायकवाड स्त्री अभिनयात प्रथम
धाराशिव दि.६ सप्टेंबर (जिमाका) जिल्हा युवा महोत्सव २०२६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसर,धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी विविध नाट्य व कला प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत पुन्हा एकदा नाट्य विभागाची उत्कृष्ट संघ ट्रॉफी पटकावली.मूकाभिनयात प्रथम,तर एकांकिका,प्रहसन आणि लघुपट या प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी महोत्सवावर आपली छाप उमटविली.वैयक्तिक अभिनय आणि दिग्दर्शनातही विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली.
एकांकिका स्पर्धेत विद्यापीठ उपपरिसराच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.या संघात आकांक्षा साळुंके,स्वरूपा पेंढपाळे,साक्षी गायकवाड, प्राजक्ता रेनके,सुमेध चिलवंत, अविनाश शिंदे आणि शंतनू देडे यांचा सहभाग होता.
एकांकिकेच्या दिग्दर्शनासाठी सुमेध चिलवंत यांना द्वितीय क्रमांक,तर स्त्री अभिनयात साक्षी गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.पुरुष अभिनयात अविनाश शिंदे यांनी द्वितीय,तर शंतनू देडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.प्रकाशयोजनेची जबाबदारी प्रकाश मुळे यांनी,तर संगीताची जबाबदारी सुमित ठाणंबीर यांनी सांभाळली. मूकाभिनय स्पर्धेत उपपरिसराच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघात सुमेध चिलवंत, अविनाश शिंदे,आकांक्षा साळुंके, प्राजक्ता रेनके,साक्षी गायकवाड आणि गायत्री शिंदे यांचा सहभाग होता.
प्रहसन स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळविला.संघात सुमेध चिलवंत,अविनाश शिंदे,शंतनू देडे, प्राजक्ता रेनके आणि साक्षी गायकवाड यांचा सहभाग होता. तसेच लघुपट स्पर्धेतही संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.या उल्लेखनीय सांघिक कामगिरीमुळे विद्यापीठ उपपरिसराला नाट्य विभागाची ‘उत्कृष्ट संघ’ ट्रॉफी मिळाली.विद्यार्थ्यांच्या या यशात संघासोबत असलेले रतन मस्के, समाधान खंडागळे,परमेश्वर माने, विशाल टोले,सुमित ठाणंबीर आणि सचिन शिंदे यांचेही सहकार्य लाभले.
जिल्हा युवा महोत्सवात नाट्य विभागाची ट्रॉफी पुन्हा एकदा जिंकल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक रमेश चौघुले यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा सत्कार केला. नाट्यशास्त्र व लोककला विभागाचे विभागप्रमुख माहेश्वर कळलावे आणि शिक्षण विभागाच्या मनीषा असुरे यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.या संघाची जबाबदारी डॉ.उषा कांबळे यांनी सांभाळली,तर नाटकासाठी आवश्यक नेपथ्याची जबाबदारी कैलास पुपुलवाड यांनी समर्थपणे पार पाडली.
जिल्हा युवा महोत्सवातील विविध कला प्रकारांमध्ये मिळविलेल्या या यशामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरातील विद्यार्थ्यांनी नाट्यकलेतील आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
*****
