Monday, 7 September 2026

रोजगार हमीतून ग्रामीण कुटुंबांना आधार ; जिल्ह्यात २४.५६ लाख मनुष्यदिवसांची निर्मिती * ५९ हजार ९९८ कुटुंबांना मिळाले काम * २७ हजार ३६९ कामे प्रगतिपथावर * १४५.१२ कोटींचा खर्च * आता मजुरांना १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी

रोजगार हमीतून ग्रामीण कुटुंबांना आधार ; जिल्ह्यात २४.५६ लाख मनुष्यदिवसांची निर्मिती * ५९ हजार ९९८ कुटुंबांना मिळाले काम * २७ हजार ३६९ कामे प्रगतिपथावर * १४५.१२ कोटींचा खर्च * आता मजुरांना १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी धाराशिव दि.७ सप्टेंबर (जिमाका) ग्रामीण भागातील कष्टकरी हातांना गावातच काम मिळावे, रोजगारासाठी स्थलांतर करण्याची त्यांच्यावर वेळ येऊ नये आणि मिळालेल्या रोजगारातून कुटुंबाच्या संसाराला आर्थिक आधार मिळावा,या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ अंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक मनुष्यदिवसांची निर्मिती केली असून,हजारो ग्रामीण कुटुंबांच्या हाताला काम देतानाच गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांनाही गती दिली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ३ लाख ७१ हजार ४७७ कुटुंबांची जॉबकार्ड नोंदणी झाली आहे. त्यापैकी सन २०२५-२६ मध्ये ४९ हजार ७०६ नवीन कुटुंबांची नोंदणी करून त्यांना जॉबकार्डचे वाटप करण्यात आले.त्यामुळे ग्रामीण भागातील आणखी हजारो कुटुंबांसाठी रोजगार हमीची दारे खुली झाली आहेत. सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्याला २३.२५ लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र २४.५६ लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली.जिल्ह्याने १०५.६१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत निर्धारित लक्ष्य ओलांडले आहे.ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या गावात किंवा परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. या कालावधीत योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५९ हजार १९८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.विशेष म्हणजे,त्यापैकी ४ हजार ९४२ कुटुंबांनी मनरेगा अंतर्गत १०० दिवसांपेक्षा अधिक काम केले आहे.रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी रोजगाराचा प्रत्येक दिवस घरखर्चाला हातभार लावणारा असतो.त्यामुळे या योजनेने ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेलाही प्रत्यक्ष आधार दिला आहे. २७ हजारांहून अधिक कामे प्रगतिपथावर रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच गावांमध्ये टिकाऊ मालमत्ता आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या २७ हजार ३६९ कामे प्रगतिपथावर आहेत.या कामांमुळे एका बाजूला स्थानिक मजुरांच्या हाताला रोजगार मिळत आहे,तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळत आहे. १४५.९२ कोटी रुपयांचा खर्च सन २०२५-२६ मध्ये या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण १४५.९२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.त्यापैकी अकुशल कामांवर ७२.९४ कोटी रुपये,तर कुशल कामांवर ७१.२४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रोजगाराच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांच्या हातात पैसा पोहोचण्याबरोबरच या निधीतून गावांमध्ये विविध विकासकामे उभी राहत असल्याने स्थानिक अर्थचक्रालाही गती मिळत आहे. कामांची व्याप्ती वाढली; आता १२५ दिवसांची हमी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अर्थात व्ही.बी.जी.राम. जी.या योजनेअंतर्गत कामांच्या प्रकारांमध्ये वाढ करण्यात आली असून ३१८ कामांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच योजनेअंतर्गत मजुरांना आता १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामीण कुटुंबांना अधिक दिवस रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नाला अतिरिक्त आधार मिळणार आहे. ग्रामीण भागातील हाताला काम, कुटुंबाला उत्पन्न आणि गावाला विकास अशी त्रिसूत्री साधणारे ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ जिल्ह्यात हजारो कुटुंबांसाठी उपजीविकेचा आधार ठरत आहे.रोजगारनिर्मितीबरोबरच हजारो विकासकामे आकार घेत असल्याने या अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात येत आहे. *******