Thursday, 10 September 2026

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी धाराशिव तालुक्यात विशेष शिबिरे ११ व १६ सप्टेंबरला ११ मंडळांत सुविधा ; पात्र नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन * ९,१४६ अर्जांपैकी ८,९१३ प्रमाणपत्रांचे वाटप * कामकाज ९७.४५ टक्के पूर्ण

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी धाराशिव तालुक्यात विशेष शिबिरे ११ व १६ सप्टेंबरला ११ मंडळांत सुविधा ; पात्र नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन * ९,१४६ अर्जांपैकी ८,९१३ प्रमाणपत्रांचे वाटप * कामकाज ९७.४५ टक्के पूर्ण धाराशिव दि.१० सप्टेंबर (जिमाका) कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.त्याचाच भाग म्हणून धाराशिव तालुक्यातील ११ मंडळांमध्ये ११ आणि १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.पात्र नागरिकांनी आपल्या नजीकच्या शिबिरात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी केले आहे. धाराशिव उपविभागात धाराशिव आणि तुळजापूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे.३ सप्टेंबर २०२६ पर्यंत कुणबी जात प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी एकूण ५ अर्ज प्राप्त झाले असून,त्यापैकी ४ अर्ज मान्य करण्यात आले आहेत.तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्राप्त ९,१४६ अर्जांपैकी ८,९१३ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.या कामाची टक्केवारी ९७.४५ टक्के आहे. धाराशिव उपविभागांतर्गत SEBC १० टक्के प्रमाणपत्रांचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे.यामध्ये २०२४ मध्ये ४,३९२,सन २०२५ मध्ये ३,९४४ आणि सन २०२६ मध्ये २,८६१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.त्यामुळे आवश्यक प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत आणि पात्र व्यक्तींना वेळेत प्रमाणपत्र मिळावे,या दिशेने प्रशासनाची कार्यवाही गतिमान करण्यात आली आहे. अडचणी सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती कुणबी,मराठा कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पार पाडण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या ३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार गणेश शिंदे,उपविभागीय अधिकारी, कळंब यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ११ ठिकाणी होणार विशेष शिबिरे धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहर मंडळासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,धाराशिव शहर,धाराशिव ग्रामीण मंडळासाठी हनुमान मंदिर,देवळाली, येडशी मंडळासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,येडशी,अंबेजवळगा मंडळासाठी हनुमान (मारुती) मंदिर,ग्रामपंचायत कार्यालयासमोर,अंबेजवळगा,ढोकी मंडळासाठी ग्रामपंचायत कार्यालय,ढोकी येथे शिबिर होणार आहे. तसेच तेर मंडळासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,तेर,पाडोळी मंडळासाठी श्री देवी अकुबाई मंदिर परिसर,पाडोळी (आ),करजखेडा मंडळासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,चौरस्ता करजखेडा; केशेगाव मंडळासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,केशेगाव; जागजी मंडळासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय,जागजी आणि बेंबळी मंडळासाठी मंडळ अधिकारी कार्यालय,बेंबळी येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ही शिबिरे ११ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होतील.कुणबी,मराठा कुणबी आणि कुणबी- मराठा पात्र नागरिकांनी संबंधित ठिकाणी उपस्थित राहून या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी केले आहे. *****