Friday, 14 August 2026
धाराशिवच्या २० गुणवंत विद्यार्थ्यांची नासाभेट; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश गुणवत्तेच्या आकाशाला आता अंतराळाची झेप; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार जगातील सर्वोच्च अवकाश संशोधनाची अनुभूती
धाराशिवच्या २० गुणवंत विद्यार्थ्यांची नासाभेट;
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश
गुणवत्तेच्या आकाशाला आता अंतराळाची झेप; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार जगातील सर्वोच्च अवकाश संशोधनाची अनुभूती
धाराशिव दि.१४ ऑगस्ट (जिमाका ) जिल्ह्यातील ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता आकाशाची मर्यादा राहिलेली नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नासास्थळीय परीक्षेत अंतिम निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व २० गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (NASA) येथे भेट देण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे.पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना ही अविस्मरणीय संधी उपलब्ध होत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्राथमिक,धाराशिव यांच्या नासास्थळीय परीक्षेतील अंतिम निवड यादीत भूम,परंडा, धाराशिव,उमरगा,कळंब,लोहारा, तुळजापूर आणि वाशी या तालुक्यांतील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.काही विद्यार्थ्यांनी गणित,विज्ञान यांसारख्या विषयांतही विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
लहानशा गावातील शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नासापर्यंतचा प्रवास निश्चित केला आहे.त्यांच्या डोळ्यांत असलेली अंतराळाची स्वप्ने आता प्रत्यक्ष नासाच्या प्रगत अवकाश संशोधन सुविधांना पाहताना साकार होणार आहेत. रॉकेट,उपग्रह,अंतराळ संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि मानवाच्या अंतराळातील भवितव्याचा जवळून परिचय या विद्यार्थ्यांना होणार असल्याने त्यांच्या ज्ञानविश्वाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.
“ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आणि प्रतिभेची अजिबात कमतरता नाही; गरज आहे ती त्यांच्या स्वप्नांना योग्य व्यासपीठ आणि संधी देण्याची.धाराशिवच्या या २० विद्यार्थ्यांची नासाभेट ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्व ठरेल.या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून उद्याचा वैज्ञानिक भारत घडताना मला पाहायचा आहे,” अशी भावना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
धाराशिवच्या मातीतील या २० ‘चांदण्यांना’ आता अंतराळाच्या विश्वाची सफर घडणार असून, त्यांच्या स्वप्नांना नासाच्या आकाशाची जोड मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी ही संधी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासातील निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरणार आहे.
*******
जलसंधारण सप्ताह व अभियान प्रभावीपणे राबवा : ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’सह विविध उपक्रमांचे काटेकोर नियोजन करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
जलसंधारण सप्ताह व अभियान प्रभावीपणे राबवा : ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’सह विविध उपक्रमांचे काटेकोर नियोजन करा
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव,दि.१३ ऑगस्ट (जिमाका) पाण्याचे संवर्धन,भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक स्वरूपात राबविणे गरजेचे आहे. ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ या मूलमंत्रातून राज्यात जलसंधारणाची चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज १३ ऑगस्ट रोजी जलसंधारण सप्ताह व अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,जलसंपदा विभागाचे तुळजापूर येथील उपअभियंता कल्याणकर,नळदुर्गचे उपअभियंता वाघमारे,मृद व जलसंधारण विभागाच्या तुळजापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी सायली जाधव, धाराशिवचे जीवन काकडे,कळंबच्या हर्षिता पाटील तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडविणे,जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे.जलसंधारणाच्या माध्यमातून भूजलपातळी वाढण्यास, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास तसेच पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होते.त्यामुळे जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.लोकसहभागातून जलसंधारणाची कामे अधिक व्यापक झाल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा ग्रामीण तसेच शहरी भागाला होऊ शकतो,असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
२१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात यावी.या उपक्रमात लोकप्रतिनिधी,अधिकारी- कर्मचारी,विद्यार्थी, क्रीडापटू,स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करावा,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.वॉकेथॉनच्या मार्गावरील वाहतूक व्यवस्था,सुरक्षा, आरोग्य सुविधा,पिण्याचे पाणी,स्वच्छता तसेच इतर आवश्यक सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
युवकांना जल व मृदसंधारणाच्या चळवळीशी जोडण्यासाठी १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सोइल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही इन्स्टाग्राम रील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांचा या स्पर्धेत अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालये,युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
‘एक शाळा–एक शोषखड्डा’ उपक्रमावर भर देऊन जलसंधारण अभियानाच्या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध,चित्रकला आणि वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात.त्यासोबतच ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा.‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपणाला चालना देऊन विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये पर्यावरण व जलसंधारणाबाबतची जाणीव निर्माण करावी,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण आणि शहरी भागात लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांचे लोकार्पण,वृक्षारोपण आणि जलस्रोत स्वच्छता उपक्रम राबवावेत.या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवावा,असे आवाहनही त्यांनी केले.
जलसंधारण सप्ताह आणि अभियान हे केवळ कार्यक्रमांचे आयोजन न राहता त्यातून नागरिकांमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व रुजावे आणि जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनावी,यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे,असे जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले.
यावेळी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण दिन आणि जलसंधारण सप्ताह तसेच अभियानाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती श्री.महामुनी यांनी दिली.
*******
Thursday, 13 August 2026
“संकलित करता न आलेली गणक प्रपत्रे (Uncollectable EF)” मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध BLA प्रतिनिधींमार्फत नोंदींची खात्री करण्याचे आवाहन
“संकलित करता न आलेली गणक प्रपत्रे (Uncollectable EF)” मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
BLA प्रतिनिधींमार्फत नोंदींची खात्री करण्याचे आवाहन
धाराशिव दि.१४ ऑगस्ट (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय संकलित करता न आलेली गणक प्रपत्रे (‘Uncollectable EF’) ही अनुपस्थित,स्थलांतरित,मृत किंवा
यापूर्वीच नोंदणीकृत अशा कारणांमुळे गणक प्रपत्र संकलित करता न आलेल्या मतदारांचा समावेश होतो.(Absent, Shifted, Death, Already Enrolled) म्हणून नोंद करण्यात आलेल्या मतदारांच्या याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांचे गणक प्रपत्र (Enumeration Form) हस्तगत करून त्याचे डिजिटायझेशन केले आहे.मात्र, घरोघरी भेटीदरम्यान जे मतदार उपलब्ध झाले नाहीत,अशा मतदारांना Absent,Shifted, Death,Already Enrolled यापैकी संबंधित प्रकारानुसार ‘Uncollectable EF’ म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
अशा प्रकारे ‘Uncollectable EF’ म्हणून चिन्हांकित केलेल्या मतदान केंद्रनिहाय मतदारांच्या याद्या पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संबंधित याद्या खालील लिंकवर पाहता येतील.यादी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे आहे.https//drive.google.com/drive/folders/१pOkwPhVTPalvALiwkBoy५wKCHcf४८iky?usp=sharing अशी आहे.
तरी सदर
‘Uncollectable EF’ च्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांना उपलब्ध करून द्याव्यात.तसेच यादीतील मतदारांना Absent,Shifted, Death,Already Enrolled आदी प्रकारे केलेले चिन्हांकन योग्य आहे किंवा नाही,याची खात्री करून घेण्याबाबत मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या स्तरावरून आवश्यक सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
********
Subscribe to:
Posts (Atom)