Friday, 7 August 2026
कमी पाण्यातही लाखोंचे उत्पन्न ; धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती ठरतेय आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग मराठवाड्यात कोष उत्पादनात धाराशिवचा दुसरा क्रमांक; एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न, ‘धाराशिव सिल्क क्लस्टर’ला मंजुरी
कमी पाण्यातही लाखोंचे उत्पन्न ; धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती ठरतेय आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग
मराठवाड्यात कोष उत्पादनात धाराशिवचा दुसरा क्रमांक; एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न, ‘धाराशिव सिल्क क्लस्टर’ला मंजुरी
धाराशिव दि.७ ऑगस्ट (जिमाका) अनिश्चित पाऊस,दुष्काळी परिस्थिती आणि पारंपरिक पिकांतील वाढते उत्पादनखर्च यामुळे अनेक शेतकरी पर्यायी शेतीकडे वळत आहेत.अशा परिस्थितीत रेशीम शेती हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून,कमी पाण्यात,कमी कालावधीत आणि हमखास उत्पन्न देणारा हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहे.तुती लागवडीपासून रेशीम धागा आणि कापड निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर रोजगार निर्माण करणारा हा शेतीपूरक उद्योग जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
धाराशिव जिल्ह्याचे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती रेशीम उद्योगासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकर वार्षिक दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.मराठवाडा विभागात रेशीम उद्योग आणि कोष उत्पादनात धाराशिवने दुसरे स्थान मिळविले असून,१०० टक्के शेतकरी रेशीम अळ्यांची ‘चॉकी’ घेणारा आणि १०० अंडीपुंजामागे उत्कृष्ट कोष उत्पादन करणारा अग्रगण्य जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने मार्च २०१६ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तुती लागवडीला मान्यता दिल्यानंतर या उद्योगाला मोठी चालना मिळाली.जिल्ह्यात सध्या १४ रेशीम किटक चॉकी पुरवठा केंद्रे कार्यरत आहेत.या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना एका पिकासाठी केवळ २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो आणि वर्षभरात किमान चार ते पाच पिके घेणे शक्य होते.एका पिकातून सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत,तर चार पिकांतून सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याने हा उद्योग शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
रेशीम उद्योगाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१७ पासून ‘महारेशीम अभियान’ सुरू केले.चालू वर्षापासून रेशीम विभागासोबतच कृषी विभाग आणि पंचायत समित्यांमार्फतही ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यात रेशीम उद्योगाच्या विस्ताराला अधिक गती मिळणार आहे.
धाराशिवसारख्या अल्प पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यातही रेशीम शेती यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. अवेळी पावसाचा फटका बसत असतानाही इतर पिकांच्या तुलनेत कमी पाण्यावर चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी या उद्योगाकडे वळत आहेत. किमान आठ महिने पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनाही रेशीम शेती करता येते.विशेष म्हणजे,एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत त्यातून उत्पन्न मिळू शकते,ही या उद्योगाची मोठी जमेची बाजू आहे.
मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवडीसाठी अकुशल आणि कुशल कामांसाठी मिळून ४.३२ लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होत आहे.त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनाही या उद्योगात उतरायला प्रोत्साहन मिळत आहे.
सध्या जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत १,३८० कामे सुरू असून,१,५६० शेतकरी रेशीम उद्योगाशी जोडले गेले आहेत.जिल्ह्यात १,५८५ एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.आतापर्यंत ८.७६ लाख अंडीपुंजांचा पुरवठा करण्यात आला असून,त्यातून ५२३ टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे.
रेशीम कोष उत्पादनापुरताच हा उद्योग मर्यादित नसून,कोषापासून धागा निर्मिती (रीलिंग),ट्विस्टिंग युनिट्स आणि इतर मूल्यवर्धित उद्योगांसाठीही मोठ्या संधी उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कळंब तालुक्यातील देवधानोरा,भूम तालुक्यातील माणकेश्वर आणि वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे रेशीम शेती गट कार्यरत आहेत.उत्पादित रेशीम कोषांना बेंगळुरूसह जालना,बीड आणि सोलापूर येथील बाजारपेठ उपलब्ध आहे.
याशिवाय,आकांक्षीत जिल्हा धाराशिवसाठी ‘धाराशिव सिल्क क्लस्टर’ प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे भविष्यात रेशीम उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी जिल्ह्यात विकसित होण्यास चालना मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
रेशीम शेती ही केवळ पर्यायी शेती नसून,शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा,ग्रामीण रोजगाराचा आणि शाश्वत कृषी विकासाचा प्रभावी मार्ग ठरत आहे.कमी पाण्यात अधिक उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारा हा उद्योग धाराशिवच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.
*****
Thursday, 6 August 2026
गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेतील १५५ कामांची पडताळणी पूर्ण ; अनियमितता आढळली नाही
गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेतील १५५ कामांची पडताळणी पूर्ण ; अनियमितता आढळली नाही
धाराशिव,दि.६ ऑगस्ट (जिमाका) जलसंधारणाला चालना देत जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, धरणे व तलावांतील गाळ काढून त्याचा शेतीसाठी सुपीक माती म्हणून उपयोग करणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून शेतीची उत्पादकता वाढविणे,हा 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजनेचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीस हातभार लावणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सन २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये मंजूर झालेल्या १५५ कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नसल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे.
२८ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार "गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार" तसेच "नालाबांधणीकरण व रुंदीकरण" योजनेंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ मधील एकूण १५५ कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाची ४५ तर मृद व जलसंधारण विभागाची ११० कामे समाविष्ट आहेत.पूर्ण झालेली कामे ५० अशासकीय संस्था आणि ५ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात आली असून,त्यात धरणांतील गाळ काढणे तसेच नालाबांधणीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
या कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले होते.त्यानुसार सर्व १५५ कामांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणत्याही कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान,या कामांबाबत कोणत्याही शेतकऱ्याला काही तक्रार किंवा समस्या असल्यास त्यांनी मृद व जलसंधारण विभाग,धाराशिवचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात पुढील तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आपली तक्रार सादर करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतरच संबंधित निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी दिली.
*******
Wednesday, 5 August 2026
किशोरवयीन मुला-मुलींना 'मैत्री' क्लिनिकचा विश्वासार्ह आधार शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याबाबत मोफत समुपदेशन; जिल्ह्यात तीन वर्षांत ३८ हजारांहून अधिकांनी घेतला लाभ
किशोरवयीन मुला-मुलींना 'मैत्री' क्लिनिकचा विश्वासार्ह आधार
शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याबाबत मोफत समुपदेशन; जिल्ह्यात तीन वर्षांत ३८ हजारांहून अधिकांनी घेतला लाभ
धाराशिव,दि.५ जुलै (जिमाका) किशोरावस्था हा बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करण्याचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे.या काळात मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक,भावनिक,लैंगिक, वैचारिक तसेच वर्तणुकीत अनेक बदल घडत असतात.साधारणतः १० ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि विश्वासार्ह माहितीची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम (आरकेएसके) अंतर्गत 'मैत्री (AFHC) क्लिनिक' सुरू करण्यात आले असून,धाराशिव जिल्ह्यात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव,तसेच उपजिल्हा रुग्णालय उमरगा, परंडा, तुळजापूर आणि कळंब येथे मैत्री क्लिनिक कार्यरत आहेत. अनेकदा किशोरवयीन मुला -मुलींना शारीरिक,मानसिक किंवा भावनिक समस्यांविषयी आई- वडील,पालक,नातेवाईक अथवा शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधणे कठीण जाते.त्यामुळे त्यांच्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.अशा वेळी योग्य व शास्त्रीय माहिती न मिळाल्याने ते चित्रपट,दूरदर्शन, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून मिळणाऱ्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची शक्यता वाढते.यामुळे गैरसमज,चुकीचे निर्णय, व्यसनाधीनता किंवा धोकादायक वर्तन निर्माण होण्याचा धोका असतो.
याच पार्श्वभूमीवर मैत्री क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशकांकडून किशोरवयीन मुला-मुलींना शारीरिक,मानसिक, भावनिक व लैंगिक आरोग्याविषयी मार्गदर्शन,पौष्टिक आहाराबाबत माहिती,वैयक्तिक समुपदेशन, विवाहपूर्व मार्गदर्शन,कुटुंब नियोजन साधनांविषयी माहिती तसेच संपूर्ण गोपनीयतेसह आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. किशोरवयीन मुला- मुलींच्या मनातील प्रश्नांना शास्त्रीय, विश्वासार्ह आणि गोपनीय पद्धतीने उत्तरे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या क्लिनिकमधून केले जात आहे.
या सेवांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून,सन २०२४-२५ मध्ये १५ हजार २७९, सन २०२५-२६ मध्ये १७ हजार १७१, तर सन २०२६-२७ मध्ये जुलै २०२६ अखेर ५ हजार ६२८ किशोरवयीन मुला-मुलींनी मैत्री क्लिनिकच्या सेवांचा लाभ घेतला आहे.
दरम्यान,आरकेएसके कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमितपणे आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.अधिकाधिक किशोरवयीन मुला-मुलींनी मैत्री क्लिनिकला भेट देऊन आपल्या आरोग्यविषयक समस्या मोकळेपणाने मांडाव्यात आणि योग्य,शास्त्रीय माहितीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)


