Friday, 3 April 2026
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण
धाराशिव,दि.३ एप्रिल (जिमाका ) जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठका,नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रशासनातील समन्वय यामुळे संपूर्ण यंत्रणेला नवी दिशा मिळाली.विशेषतः प्रलंबित प्रकरणांच्या जलद मंजुरीसाठी बँक अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठका आणि दिलेले स्पष्ट निर्देश यामुळे कर्जमंजुरी प्रक्रियेतील अडथळे दूर झाले.परिणामी,अनेक प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळून लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केवळ कर्जपुरवठ्यापुरती मर्यादित नसून,ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी एक प्रभावी संधी आहे.या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढून आर्थिक विकासाला गती मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतिशील व संवेदनशील दृष्टिकोनामुळे जिल्ह्यातील शेकडो होतकरू युवक-युवतींच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, रोजगार निर्मिती क्षेत्रात जिल्ह्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.
या यशाबद्दल जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
****
Thursday, 2 April 2026
सुधारित वृत्त एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
सुधारित वृत्त
एमबीए/एमएमएस - सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
धाराशिव दि.२ (एप्रिल) एमबीए / एमएमएस सीईटी २०२६ ही परीक्षा सोमवार दि.६ एप्रिल ते बुधवार ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून,या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
ही परीक्षा सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,इंटरनेट कॅफे,कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स,ईमेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी,शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
हे आदेश दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
****
सहकार खात्यातील चौकशी अधिकाऱ्यांसाठी अर्ज मागविले
सहकार खात्यातील चौकशी अधिकाऱ्यांसाठी अर्ज मागविले
धाराशिव दि.२ एप्रिल (जिमाका) विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर विभाग,लातूर यांचेकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ८३ व कलम ८८ अन्वये चौकशी /प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेल्या अधिकारी (वयाची ७० वर्षे पूर्ण न झालेल्या),निवृत्त न्यायाधीश,वकिल,सनदी लेखापाल यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर विभाग,लातूर,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,दुसरा मजला,लातूर तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, लातूर / धाराशिव / बीड / नांदेड व संबंधित जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत.
हे अर्ज दि.३० मे २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. इच्छुक पात्र उमेदवारांनी भरलेले व पूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह वरील कालावधीत संबंधित कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)
