Saturday, 14 March 2026

एलपीजी गॅस,पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय अत्यावश्यक ; साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

एलपीजी गॅस,पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय अत्यावश्यक ; साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार धाराशिव,दि.१४ मार्च (जिमाका) आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी गॅस,पेट्रोल व डिझेलचा पुरवठा अखंड व सुरळीत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज १४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी तसेच तेल-गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना इंधनाचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश दिले.इंधन साठा,वाहतूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेऊन संभाव्य अडचणी वेळेत दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल व एलपीजी पुरवठ्याबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या जिल्ह्यात १४९ पेट्रोल पंप कार्यरत असून विविध कंपन्यांच्या २७ गॅस एजन्सी कार्यरत आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीत पेट्रोल पंप व गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.जर अशा ठिकाणी गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित पोलिस निरीक्षकांशी समन्वय साधून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी,असेही सांगण्यात आले.आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. घरगुती गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांनी त्या ठिकाणी धाड टाकून साठा जप्त करून नियमांनुसार कडक कारवाई करावी,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.प्रत्येक तालुक्यात घरगुती गॅस वितरणाबाबत तसेच शिल्लक साठ्याबाबत नियमित आढावा घेण्याचेही ठरविण्यात आले. औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या मागणीची नोंद संबंधित जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकारी यांच्याकडे करावी,असे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी शासनाच्या edlpg@bharatpetroleum.in, indanecareho@indianoil.in आणि lpg.sbu.head@hpcl.in या ई-मेल आयडीवर मागणी नोंदवता येणार असल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात तुळजापूर व येरमाळा येथे होणाऱ्या यात्रांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व व्यावसायिकांना लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने संबंधित तहसीलदारांनी तालुक्यातील मागणीचा आढावा घेऊन ती जिल्हा गॅस एजन्सी समन्वय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या.बैठकीत सर्व निरीक्षण अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तालुक्यातील घरगुती गॅस वितरण व्यवस्था,उपलब्ध साठा तसेच केलेल्या तपासणी कारवाईचा आढावा घेण्यात आला.तसेच पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना गॅस वितरणाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस पोलीस अधीक्षक रितु खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,समाज कल्याण अधिकारी एस.ए.लमकाने,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे,शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी पी.एम.पांडे,निमा अध्यक्ष डॉ.पंकज शिनगारे,एमएएनजीए वे.अ.अध्यक्ष डॉ.एस.बी.बलकंडे, FOGSI धाराशिवचे सेक्रेटरी डॉ.आय.के.मुल्ला,आयएमए धाराशिवचे डॉ.सचिन देशमुख,जिल्हा गॅस एजन्सी समन्वयक रिझवान पटेल,इंडियन ऑईलचे सेल्स ऑफिसर प्रकाश राठोड तसेच एचपीसीएल ऑईलचे सेल्स ऑफिसर लिखित रेड्डी आदी उपस्थित होते. *****

Friday, 13 March 2026

नौदल माजी सैनिक व कुटुंबीयांसाठी २५ मार्च रोजी धाराशिवमध्ये कल्याण मेळावा

नौदल माजी सैनिक व कुटुंबीयांसाठी २५ मार्च रोजी धाराशिवमध्ये कल्याण मेळावा* धाराशिव,दि.१३ मार्च (जिमाका) भारतीय नौदल सैनिक,नौदल वीरनारी, नौदल युद्ध विधवा तसेच नौदल माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील नौदल सैनिक,नौदल वीरनारी,नौदल युद्ध विधवा तसेच नौदल माजी सैनिकांच्या अवलंबितांच्या भेटीच्या मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या भेटीसाठी २५ मार्च २०२६ रोजी धाराशिव येथे येणार आहेत. या भेटीदरम्यान नौदलातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना येणाऱ्या अडचणींचे मुद्दे जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले जाणार असून विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. या मेळाव्यास नौसेनेतील सर्व माजी सैनिक,माजी सैनिकांच्या पत्नी तसेच सर्व वयोवृद्ध सैनिकांनी दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह,धाराशिव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि) यांनी केले आहे. *************

खेळाडूंना दिलासा ! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली* घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा

*खेळाडूंना दिलासा ! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली* घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा धाराशिव,दि.१३ मार्च (जिमाका) राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ,पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. *प्रणालीची वैशिष्ट्ये आणि महत्त्व* ब्लॉकचेन तंत्रज्ञान : ही प्रणाली ब्लॉकचेन (Blockchain) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही.त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल.त्वरित पडताळणी : खेळाडूंनी माहिती भरल्यानंतर ती मूळ डेटाशी जुळल्यास अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो.QR कोड सुरक्षा : प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल.हा कोड स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी (उदा. MPSC,पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील. आगामी पदभरतीसाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे,त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. या प्रणालीअंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहेत.या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले ५ टक्के खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतात. यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढीलप्रमाणे आहे : *खेळाडूंनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य* ज्या खेळाडूंनी अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/ भेट द्यावी. संकेतस्थळावर सर्वांत खाली आमच्या सेवा (Our Services) मध्ये ५ टक्के Reservation या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी. या नोंदणीकरिता वैयक्तिक माहिती व क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर अर्ज नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार संलग्न (Aadhaar-linked) मोबाईल क्रमांकाचा आणि आयडीचा वापर करणे आवश्यक आहे.तसेच स्वतःचा योग्य व दैनंदिन वापरातील ई-मेल आयडी,आधार कार्ड पीडीएफ आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र यासह नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहेत,त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे. **************