Saturday, 24 January 2026
नांदेड भक्तिमय; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक
नांदेड भक्तिमय; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक
नांदेड,दि.24 (जिमाका )हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्यावतीने नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण केले.विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे नांदेड शहर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान,महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत दर्शन घेतले.
गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने राज्यस्तरीय समागम समितीच्या सहाय्याने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या जवळपास एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी प्रशासन आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या माध्यमातून सुरू होती. यासाठी मोदी मैदानाच्या 52 एकर परिसरात गुरुद्वाराची प्रतिकृती असलेला मंडप उभारण्यात आला असून लंगर सेवेसाठी आठ मंडप, आरोग्य शिबिर, चित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. प्रशस्त पार्किंग,स्वच्छतेच्या उपाययोजना,पिण्याचे पाणी यासह सर्व आवश्यक सुविधांची उभारणी या मैदानावर करण्यात आली आहे.
भाविकांचा जनसागर: पारंपारिक वेशभूषा आणि बोलीभाषेतील गीतांतून जागविला भक्तिभाव
याठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी दरबार या मुख्य मंडपात गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. अबालवृद्ध भक्तांनी अतिशय शिस्तबद्धपणे गुरुचरणी माथा टेकत गुरुनाम स्मरण केले.या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतलेल्या शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील भाविकांचा यामध्ये समावेश होता. आंध्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.यापैकी काही महिलांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या मंडपात आपापल्या बोली भाषेतील भक्तिगीते सादर करत अनोख्या पद्धतीने भक्तिभाव जागविला.
प्रशासनाचे चोख नियोजन; भाविकांची स्वयंशिस्त आणि परिसराची स्वच्छता अबाधित
52 एकराच्या विस्तीर्ण परिसरात होत असलेल्या या भव्य कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावूनही परिसराची स्वच्छता कायम होती. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि राज्य समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अशासकीय सदस्यांच्या मदतीने जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेसाठी चोख नियोजन केले होते. यासोबतच याठिकाणी येणाऱ्या भाविकांनी दाखविलेल्या स्वयंशिस्तीमुळे स्वच्छता कायम राहण्यास मदत झाली.
******
नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान
नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान
नांदेड, दि. 24 : सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा आणि त्यागाची पवित्र भूमी आहे. या भूमीवर होणारा शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध समाजातील लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री. मान यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
सेवा हाच खरा धर्म आहे. या सोहळ्यातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश देशभर पोहोचत आहे. हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यांचे कार्य, त्याग व विचार येणाऱ्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. मान यांनी सांगितले. नांदेड येथील पंजाब भवनचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुढाकार : राज्य समन्वयक रामेश्वर नाईक
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास घराघरात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शाळा, महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावरील माहितीपट, गीत दाखविण्यात येत असून यामाध्यमातून त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचला आहे. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या कार्यक्रमात विविध राज्यातून भाविक दाखल होत आहेत. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा ठरणार आहे, असे राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, संत ज्ञानी हरनाम सिंग, पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज, संत बाबा बलविंदर सिंग, महंत रघु मुनी यांच्यासह संत, महंत यावेळी उपस्थित होते.
सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’ ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ
सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’ ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ
नांदेड दि.24:‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमात लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव, समता व मानवतेचे अनोखे दर्शन घडत आहे. धर्म, जात, भाषा, प्रांत यांचा कोणताही भेद न करता हजारो भाविकांना एकत्र बसवून भोजन देणारी ही लंगर परंपरा या कार्यक्रमाची खरी आत्मा ठरते आहे.
हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी विविध राज्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातून भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या भाविकांना मुख्य मंडपालगत उभारण्यात आलेल्या ८ मंडपाच्या माध्यमातून लंगर सेवा दिली जात आहे. लंगर सेवा ही केवळ भोजन व्यवस्था नसून मानवी समानतेचा आणि नि:स्वार्थ सेवेचा संदेश देणारी गौरवशाली परंपरा आहे. ‘सर्व मानव समान आहेत’ या तत्त्वावर आधारित ही सेवा हिंद-दी-चादर कार्यक्रमात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, लाखो भाविक, साधुसंत, नागरिक, स्वयंसेवक आणि पाहुण्यांना भोजन देण्यात येत आहे.
स्वयंसेवकांचा सेवायज्ञ
या लंगर सेवेत शीख बांधवांसह विविध सामाजिक संस्था, युवक-युवती, महिला, स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. भाजी कापणे, पोळ्या तयार करणे, अन्न शिजवणे, स्वच्छता राखणे, पंगतीत सेवा करणे ही कामे प्रत्येक कामात ‘सेवा हीच साधना’ या भावनेतून स्वयंसेवक करीत आहेत. अनेक जण तर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत न थकता सेवा देत आहेत.
समतेचे प्रत्यक्ष दर्शन
लंगरमध्ये श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, वृद्ध-लहान असा कोणताही भेद नाही. सर्वजण एकाच पंगतीत, जमिनीवर बसून भोजन ग्रहण करतात. यामुळे सामाजिक समतेचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना घडत आहे.
नेटके व्यवस्थापन
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून लंगर सेवेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, आरोग्य तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
000000
Subscribe to:
Posts (Atom)







