Thursday, 22 January 2026

श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती

श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती धाराशिव,दि.२० जानेवारी (जिमाका) शिख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांनी धर्मस्वातंत्र्य,मानवी हक्क आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देत आपल्या प्राणांची आहुती दिली.प्रार्थना,परोपकार,सेवा,साधेपणा, निर्भीडपणा आणि इतरांच्या सेवेला महत्त्व देणारे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.त्यांच्या प्रवचनांचा व भजनांचा समावेश ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये करण्यात आला असून, १७ व्या शतकात दिलेल्या त्यांच्या बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे संरक्षण झाले. मुघल सत्तेच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी श्री गुरु तेग बहादुर यांच्या पवित्र पार्थिवाला आपल्या तांड्यातील घर जाळून अग्नी दिल्याची घटना भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाची मानली जाते.या त्यागामुळे शौर्य व बलिदानाची परंपरा अधिक दृढ झाली. सन २०२५ हे श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने,त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा व त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे,यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येत आहे. नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित बैठकीला जिल्हा क्षेत्रीय समितीचे सदस्य संतोष चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना श्री.कडवकर यांनी दिल्या. नांदेड येथील कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहावेत,यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट व गीतांचे सादरीकरण,प्रभातफेरी,गायन, वक्तृत्व व निबंध स्पर्धा,डॉक्युमेंटरी वाचन, जागरण बैठक,प्रचार रथ,लाईट अँड साउंड शो तसेच विविध शासकीय बैठकीतून प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण भागातील वाड्या- वस्त्यांपर्यंतही कार्यक्रमाची माहिती पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जिल्ह्यात चित्ररथाच्या या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर यांच्या विचारांचा प्रचार व त्यांच्या बलिदानाचे स्मरण सर्वस्तरांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.अशी माहिती श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली. ***

श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रभक्तीचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रभक्तीचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश – राज्यमंत्री माधुरी मिसाळ नांदेड, दि.२० जानेवारी :- श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागमाच्या निमित्ताने ‘हिंद दी चादर’ अंतर्गत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. हा दोन दिवसीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार असून यामध्ये देशभरातून १० ते १२ लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, संत-महंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विविध समाजघटकांचा सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने नागरिक या समागमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत व तरुण पिढीपर्यंत देशासाठी बलिदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांची माहिती पोहोचवणे हा आहे. श्री गुरु तेग बहादूरजी यांनी धर्म, मानवता व राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती, त्याग व सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नमूद केले. दि. २५ जानेवारी रोजी होणारा मुख्य कार्यक्रम यशस्वी करून श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या बलिदानाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. या भव्य समागमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांचा जागर करण्यात येणार असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ***

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा * दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे*

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा * दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे* नांदेड दि.२१ जानेवारी:- ‘हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरूनही २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी नांदेडसाठी हजरत निजामुद्दीन, पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल . चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. चंदीगडवरून २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५:४० वाजता सुटणारी गाडी अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, विरांगणा लक्ष्मीबाई झाशी , भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता नांदेडला पोहोचेल. मुंबई येथून देखील विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड दरम्यान गाडी क्र. ०१०४१/०१०४२ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री २३:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीत १८ डब्यांची रचना असून यात स्लीपर, जनरल आणि एसी कोचचा समावेश असेल. या सर्व गाड्यांच्या नियोजनामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझेशनसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, गाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ०००००