Wednesday, 7 August 2019

पर्यावरणपोषक, निधर्मी, सलोखामय, सौहार्दाचे वातावरण असलेल्या समाजाची निर्मिती करू या -- पालक न्यायमूर्ती विश्वासराव जाधव


वृत्त क्रमांक- 521                                                 दि.04 ऑगस्ट 2019
पर्यावरणपोषक, निधर्मी, सलोखामय, सौहार्दाचे वातावरण


असलेल्या समाजाची निर्मिती करू या
--- पालक न्यायमूर्ती विश्वासराव जाधव

उस्मानाबाद,दि.04(जिमाका) :- डिजिटल क्रांतीमुळे सध्या समाजात तर निसर्ग बदलामुळे वातावरणातही अनेक बदल घडून येत आहेत.मात्र तरीही सर्वांनी मिळून पर्यावरणपोषक, निधर्मी सलोखामय, सौहार्दाचे वातावरण असलेल्या समाजाची निर्मिती करू या, असे आवाहन न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती श्री. विश्वासराव के. जाधव यांनी आज येथे केले.
उमरगा येथील न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीच्या भूमीपूजन व कोनशिला अनावरण प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल, उमरगा जिल्हा न्यायाधीश वर्ग-एक श्रीकांत साळुंखे, उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर हे उपस्थित होते.
न्यायमूर्ती श्री.जाधव म्हणाले, सध्या सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहेत. अनेक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. त्यामुळे कायदा व न्याय व्यवस्थेतील घटकांनी हे बदल स्वीकारून काळाच्या प्रवाहाबरोबर आपल्या क्षेत्रातील अभ्यास, संदर्भ आत्मसात करून अत्यंत जाणीवपूर्वक मेहनत करणे आवश्यक आहे. समाजात आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, मारहाण,व्हर्चुअल नंबरवरून दिल्या जाणाऱ्या धमक्या, त्यातून होणारी फसवणूक यामुळे जनता त्रस्त आहे. नवनवीन पद्धतीने घडणाऱ्या व घडवून आणण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा ही जलद प्रक्रियेतून देणे, समाज व्यवस्थेची गरज बनली आहे आणि त्यासाठी न्यायाधीश, वकील यांनी अधिक अभ्यास करून, संदर्भ तपासून गरजूंना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावण्यासाठी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम,भरपूर अभ्यास, सहनशीलता, तळमळ या बाबींना पर्याय नाही. श्री. जाधव यांनी न्यायालयास न्याय मंदिर न म्हणता न्यायदान केंद्र, न्यायदान प्रक्रिया केंद्र असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे, असे व्यक्तिगत मतही मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल यांनी केले तर स्वागतपर भाषण उमरगा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 श्रीकांत साळुंके यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. विलास कुलकर्णी, सुनील माने, सायली साठे, नरसिंग पांचाळ यांच्या कलावृंदाने गायलेल्या सुमधूर अशा स्वागतगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर उमरगा न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीचा भूमीपूजन व




कोनशिला अनावरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महेश इनामदार यांच्या मंत्रोच्चाराने येथील वातावरण अतिशय मंगलमय असे झाले होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नांदुर्गा या अत्यंत उपयुक्त अशा झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. याद्वारे समाजाला “झाडे तोडू नका वाचवा आणि झाडांचे पुनर्रोपण करा” असा नवा संदेशही देण्यात आला. याशिवाय इमारतीचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केलेले कंत्राटदार विक्रम गायकवाड तसेच जनहितार्थ शासकीय इमारतीकरिता स्वतःची सात एकर जागा दान करणार्‍या कै.शरणप्पा मलंग यांच्या मुलाचा न्यायमूर्ती श्री. जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, तहसिलदार संजय पवार, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद पाटील, आकाशवाणी केंद्राचे संजय बरिदे ,कृष्णा शिंदे ,जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती विधीज्ञ ॲड. अभयसिंह चालुक्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, संताजी चालुक्य, न्यायाधीश श्री. कारंडे, श्री. पाटील, श्री. बिलाल, श्री. गोसावी, सौ. चव्हाण, विधीज्ञ परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, ॲड.इनामदार, ॲड. सौ. पोतदार, सौ.घोडके, सौ. जोशी ,सौ.डंके, श्री. पणुरे, श्री.माळी, श्री. राजेश्वरकर, श्री.मल्हारी बनसोडे, श्री. उदय वैद्य, अरुण सूर्यवंशी, संजय बिराजदार, गोविंद गायकवाड, राहुल जाधव, अरुण सूर्यवंशी, युवराज माने, देशपांडे, दिवाकर जाधव, नंदकिशोर बिराजदार, अमित सांगवे, जुबेर कादरी,  जमील मुजावर, कपिल महाजन, अरुण हेडे, अशोक पोतदार, बालाजी सोमवंशी, प्रवीण पाटील, श्री. मंगेश येळीकर, मनोज कोडलंगरे, मंगेश चिंचोलीकर, जे.बी. शेख, एस.ए. पाटील, व्यंकटराव माळी, खाजा शेख, अमोल माळी, बी.डी. लुल्ला, फिरोज मुल्ला, सिद्राम हंदाळे, श्री.कलाने, रणजित जाधव, विशाल सूर्यवंशी, शंकर सुरवसे, एच.डी. करके,  जब्बार पटेल, श्री.कोथिबरे, श्री. व्ही.एस.आळंगे, श्री.यू.व्ही.वैद्य  आदींसह उमरगा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय मैंदरगे यांनी केले तर आभार उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
****

Monday, 22 July 2019

जिल्हयातील आर्थिक गणना 2019 होणार पेपरलेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन


वृत्त क्रमांक-470                                                     दि.22 जुलै 2019
जिल्हयातील  आर्थिक गणना 2019 होणार पेपरलेस
नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
उस्मानाबाद,दि.22:- आर्थिक गणना म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी होय. आर्थिक गणनेच्या माहितीवरुन संपूर्ण देशात तसेच गाव / वार्ड / तालुका स्तरावर ही माहिती केंद्र / राज्य शासनाला आणि स्थानिक शासनांना नियोजन व धोरणांसाठी उपयुक्त  ठरणार आहे. तसेच औद्योगिक विकासाचा अभाव असलेल्या क्षेत्रामंध्ये विस्तार करण्यासाठी माहिती उपयुक्त ठरणार आहे.
गणना होणारे प्रमुख घटक उद्योग, रोजगार, कामगारांची संख्या, कारखाने, दुकाने, वस्त्रोद्योग इ. बाबत प्रत्येक घराला भेट दिली जाईल व सर्वांकडून माहिती प्राप्त करण्यात येणार आहे.
दि. 10 जून 2019 ला पर्यवेक्षकांना यासंदर्भात जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले असून माहे-जुलै अखेर आर्थिक गणनेला प्रत्यक्ष प्रारंभ होईल. यावेळी प्रथमच ऑनलाइन मोबाइल ॲपदवारे  आर्थिक गणना होईल. ॲप मुळे मोबाईलची रेंज किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध झाली नाही तरी गणनेतील तपशील भरता येणार आहे. या प्रणालीमुळे प्रत्यक्षात जागेवर न जाता एकाच ठिकाणी बसून माहिती भरणे अशक्य आहे. रोजगाराचे / उद्योगाचे ठिकाणही अपलोड करणे बंधनकारक आहे. आपले सरकार ,ई-सेवा केंद्रात ऑनलाईन परीक्षेव्दारे प्रगणक व पर्यवेक्षक यांची निवड केली जात आहे. प्रगणक म्हणून काम करण्यासाठी ई-सेवा आपले सरकार केंद्रात जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. जिल्हयात एकूण 1 हजार 12 प्रगणक  व 253 पर्यवेक्षकांची निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या प्रगणकास प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाची माहिती संकलित केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर ‍ही गणना अधिक नेमकेपणाने अणि अचूक करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयातील सर्व शहर व गावात गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे  यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असून त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्यासह 15 सदस्यांचा समावेश आहे.
माहिती संकलित करताना जिल्हयातील सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा सांख्यिकी  अधिकारी वामन जाधव यांनी केले आहे.
                                    ****




वृत्त क्रमांक-471                                                     दि.22 जुलै 2019
पुलंच्या साहित्यावर आधारित
“स्टँड अप कॉमेडी” एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन
व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात दि. 9 ऑगस्ट रोजी रंगणार स्पर्धा

उस्मानाबाद, दि. 22- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे “स्टँड अप कॉमेडी” या पुलंच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा दि. 9 ऑगस्ट 2019 रोजी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, उस्मानाबाद येथे संपन्न होणार आहे.
        मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंत यांमधील प्रतिभा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे की , दि. 6 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय फिरायला सुरुवात झाली, असून प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला रुपये 20 हजार आणि उपविजेत्याला रुपये 15 हजार अशी लोकं स्वरूपाची फोर बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्हा केंद्रावर सकाळी दहा ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सात अशावेळी  स्पर्धा संपन्न होईल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर स्पर्धकांना केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी 750 67 48 पंचावन्नाव्या व्हाट्सअप क्रमांकावर दोन मिनिटाचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धा कला केंद्रावर पाच ते आठ मिनिटे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.
स्पर्धेचा अंतिम सोहळा दि. 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे रंगणार आहेत.
या संपूर्ण उपग्रहाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवर केले जाणार असून महाराष्ट्रातील नवागत कलावंतांची कला सर्वदूर पोहोचावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी भागातील शहरी व ग्रामीण विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा राबविण्यात येत आहेत. विनोद हा फुलांच्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर मुलांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले




“स्टँड अप कॉमेडी” ही स्पर्धा देखील अशाच स्वरूपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवरख्‍ माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यावहारिक जीवनात घडणार्‍या प्रसंगांवर मिश्किल टिप्पणी करत,
त्यातील विनोद सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न अनेक “स्टँड अप कॉमेडियन” करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार लोकप्रिय होत आहे. त्यामुळे याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर आपला दोन मिनिटांचा व्हिडिओ पाठवा आणि अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत चौधरी यांच्याशी व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
****

वृत्त क्रमांक-472
         
विभागीय मंडळ स्तरावर इ.10वी, 12वीच्या
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू
उस्मानाबाद,दि.22- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा, ,शिवाजी नगर पुणे यांच्या वतीने जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इ.दहावीसाठी 0 23 82 251 633 व इ. बारावी साठी 0 23 82 251 733 या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.
तरी विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपापल्या अडचणींविषयी उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर तसेच लातूर जिल्हयासाठी एम. एस.दाणाई यांच्याशी 94 22 0 15 15 2, उस्मानाबाद जिल्हयासाठी व्ही.के.कदम यांच्याशी 94 23 72 17 56 तर नांदेड जिल्हयासाठी बी.एम. कच्छवे यांच्याशी 93 71 26 15 00 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी कळविले आहे.
****







वृत्त क्रमांक-473                                                   दि.22 जुलै 2019
माता व बालकांचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज
                                                 -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
उस्मानाबाद,दि.22- उस्मानाबाद जिल्हा आकांक्षा जिल्हा आहे. त्यात ग्रामीण व शहरी भागातील गरोदर माता व बालकांचे आरोग्याचे निर्देशांक यास विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागात आशा/आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत वैदयकीय सेवा अधिक गुणवत्तापूर्ण देऊन प्रत्येक गरोदर माता व बालक यांना आरोग्यसेवेच्या प्रवाहात आणून विशेष काळजी घेणे व  माता व बालकांचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी  आज येथे केले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे शहरी भागात विशेष जननी शिशु सुरक्षा आरोग्य शिबीरे आयोजित करण्याबाबत सूचित केले होते. त्यातील पहिल्या जननी शिशू आरोग्य शिबिराचे आयोजन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2 यांच्या वतीने अलमास सिद्दिक अहमद उर्दू शाळा व मदरसा, गालिब नगर, उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी यावेळी उपस्थित गरोदर माता बालकांशी संवाद साधला. त्यात आरोग्यदायी जीवनशैली बरोबरच स्वतःची काळजी घ्यावी, रक्तक्षय व इतर कोणत्याही आजाराबाबत तात्काळ आरोग्य संस्थेशी संवाद साधून निरसन करून घ्यावे व समाज सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, कुपोषित बालकांना अंगणवाडीमार्फत विविध प्रकारचे खाद्य वाटप करण्यात येत आहे. ते वेळेवर व नियमित दिल्यास कुपोषणाचे प्रमाण निश्‍चितच कमी होणार आहे.सध्या मुलींच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत असल्यामुळे शालेय जीवनापासूनच रक्तवाढीसाठी गोळ्या घेतल्यास भविष्यात कुपोषणाचे प्रमाण कमी होणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी परिसर स्वच्छता, वृक्ष लागवडीचे फायदे, माता व बालकांमधील कुपोषण व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुपोषित मातांना आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, मुफ्ती रहमतुल्ला खान, मीर हजरत अली, डॉ. शेवाळे, मौलाना निसार अहमद, शेख हुसेनी, शेख सादिक, डॉ. श्रीमती पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री.लाकाळ, श्री. पाटील, श्री. दिलीप जाधव, शालेय विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन दुबे यांनी केले.

Friday, 19 July 2019

गुरुपौर्णिमेच्या दिनी लघुचित्रपट जिल्हा प्रशासनाला सुपूर्द... "बालविवाह, एक अभि:शाप" लघुचित्रपट होणार लवकरच प्रदर्शित..


वृत्त क्रमांक-458                                                     दि.19 जुलै 2019
गुरुपौर्णिमेच्या दिनी लघुचित्रपट जिल्हा प्रशासनाला सुपूर्द...
"बालविवाह, एक अभि:शाप" लघुचित्रपट होणार लवकरच प्रदर्शित..

उस्मानाबाद,दि.19:- जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीच्या पुढाकाराने, जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मन पिळवटून टाकणारी बाल-विवाह ही अनिष्ट प्रथा कायमस्वरूपी नष्ट करण्याहेतू उमरगा शहरातील सोशल मीडिया महामित्र तथा बालविवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री यांनी अथक परिश्रमातून बनविलेल्या बालविवाह, एक अभि:शाप या लघुचित्रपटाची निर्मिती करून दि. 16 जून गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्यास पूर्णपणे तयार फिल्म ची सी.डी.,महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी अशोक सावंत,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना हस्तांतरित केले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
          बालविवाह होण्याची कारणे,यास बळी पडलेल्या पीडितांची दुर्दशा,बालविवाहाचे दुष्परिणाम,एक मुलगी आपल्यातील जिद्द आणि चिकाटीच्या जाेरावर किती उत्तुंग भरारी मारू शकते आणि ती आपल्या वंशाचा दिवा कशी ठरते, हे या लघुचित्रपटामध्ये  सहजगत्या  मांडले आहे.
        जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उत्स्फूर्त मार्गदर्शनाखाली,अप्पर जिल्हाधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध समितीचे अध्यक्ष पराग सोमण यांच्या संकल्पनेतून या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.
          या चित्रपट निर्मितीसाठी प्रेरणा व मोलाचे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी वेळोवेळी केल्याने चित्रपट अगदी सहजरित्या आणि भावनिक,हृदयस्पर्शी, वस्तुस्थितीदर्शक बनलाआहे.
     या हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण उमरगा तालुक्यातील कुन्हाळी गावात,छत्रपती शिवाजी महाविद्यालय,जिल्हा परिषद प्रशाला,आणि अँड प्रवीण तोतला यांचे कार्यालय येथे झाले असून यातील सर्व कलाकार उमरगा शहारातीलच असून मुख्य भूमिकेत बालकलाकार म्हणून गौरी सचिन बिद्री,मुक्ताई साठे,आकांशा कांबळे,भक्ती आष्टे,प्रा.युसूफ मुल्ला,छत्रपती शिवाजी महाविद्यालय चे प्राचार्य घन:श्याम जाधव,रोटरी क्लब अध्यक्ष देवरकर,ऍड प्रवीण तोतला,अमोल पाटील,संजीव विभूते,शैलेश महामुनी,वैशाली कैलास आष्टे,अश्विनी घोडके, नाट्य कलाकार संजय कोथळीकर यांनी अभिनय केला आहे.
      कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन सचिन बिद्री यांनी केले असून चित्रीकरण उमरगा शहरातील ड्रीम क्रिएशन यांनी साकारले आहे.डबिंग, पार्श्वसंगीत, स्पेशल इफेक्टचे कार्य ntv न्यूज मराठी वृत्तवाहिनी स्टुडिओ,अहमदनगर येथे करण्यात आले आहे.
      यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनीही वेळोवेळी सहकार्य केले.

*****








वृत्त क्रमांक-459                                                     दि.19 जुलै 2019

पुलंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य शासनामार्फत
स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन

उस्मानाबाद, दि. 16 :-  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पुलंच्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पुल यांच्या साहित्यावर आधारित स्टँड  अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.
    मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्ये केंद्रावर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. दि. 16 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय फेऱ्यांना सुरुवात झाली असून, प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला 20,000/- आणि उपविजेत्याला 15,000/- अशी रोख स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 आणि दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कार्यक्रम स्थळाजवळील वेळापत्रकाप्रमाणे एक दिवस अगोदर 7506848055 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 2 मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धकाला केंद्रावर 5 ते 8 मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा सोहळा येत्या 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे रंगणार आहे.
    विनोद हा पुलंच्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर आपल्या खुमासदार शैलीत पुलं.नी कायम भाष्य केले. स्टँड अप कॉमेडी ही स्पर्धा देखिल अशाच स्वरुपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवर, माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यवहारी जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवर मिश्कील टिप्पणी करत त्यातील विनोद सर्वांसमोर आणण्याचा प्रकार अनेक स्टँड अप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रावर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.
    या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केलेजाणार असून कलावंतांची कला महाराष्ट्रभर पोहोचावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

****








वृत्त क्रमांक-460                                                     दि.19 जुलै 2019

दि.26 जुलै ला 20 वा कारगिल विजय दिवस होणार साजरा
नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 
उस्मानाबाद,दि.19:-  कारगिल युद्धात(ऑपरेशन विजय) मिळालेल्या विजयास दि. 26 जुलै  2019 रोजी 20 वर्ष पूर्ण होत असून कारगिल विजयाचा 20 वा विजय दिवस कारगिल विजय दिवस म्हणून दि. 26 जुलै 2019 रोजी साजरा करण्यासाठी सकाळी आठ ते नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी जिल्‍हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते नगर परिषद  येथील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण व पुष्पांजली वाहण्यात येणार आहे.
            तरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
****
वृत्त क्रमांक-461
प्रिती रमेश दुधंबे बेपत्ता आहे
कोणालाही दिसल्यास किंवा सापडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा

उस्मानाबाद,दि.19:- प्रिती रमेश दुधंबे, वय वर्ष 18  ही दि. 15 जुलै 2019 पासून सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून कोणासही काहीही न सांगता निघून गेली आहे. सावळा वर्ण, मराठी हिंदी भाषिक, काळी जीन्स पॅंट  व पांढरा टॉप घातलेले, काळे लांब केस,  पाच फूट उंची, उभट चेहरा, हनुवटीवर तीळ, शिक्षण बारावी, मध्यम शरीरबांधा अशा वर्णनाची मुलगी कोणालाही दिसल्यास किंवा सापडल्यास तात्काळ आनंदनगर पोलीस स्टेशन,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
****
वृत्त क्रमांक-462

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत संबंधित
शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित राहाण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19:- उस्मानाबाद तालुक्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत सन 2019-20 करिता विविध योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते.
उस्मानाबाद तालुक्यातून प्राप्त झालेल्या अर्जांची जेष्ठता यादी तयार करण्यासाठी दि. 24 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी ,उस्मानाबाद  या कार्यालयात सकाळी दहा वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
तरी संबंधित शेतकऱ्यांनी या सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.जी. देशमुख यांनी केले आहे.
****