Wednesday, 26 September 2018

दि.26 सप्टेंबर 2018 परंडा तालुक्यातील सेना खैरी उर्फ चांदणी नदीपात्राच्या परिसरात कलम 144 लागू

           परंडा तालुक्यात सिना, खैरी,उल्फा, चांदणी या नद्या असून या नद्यांच्या पात्रांमध्ये लहान मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. तांदुळवाडी,खासगाव, सोनगिरी, रुई दुधी, भोत्रा,  देवगाव, वडनेर या वाळूगटातून अनधिकृतपणे वाळू उपसा व वाहतुकीच्या  प्रकरणाबाबत वारंवार तक्रारी, संदेश प्राप्त होत आहेत.अवैध वाळू चोरी वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रात वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी त्यांच्या अधिकारानुसार 21 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6.00 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत परंडा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी, खासगाव, सोनगिरी,भोत्रा देवगाव, वडनेर,शेळगाव, चिंचपूर या गावातील नदीपात्रामध्ये किंवा वाळू गटाच्या ठिकाणी वाहनाने प्रवेश करण्यास, अवैध उत्खनन करण्यास तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध केला आहे. 
           हा आदेश लागू असलेल्या कालावधीत कोणतेही वाहन जसे जेसीबी, पोकलेन, ट्रक, ट्रॅक्‍टर व इतर, मजूर, ठेकेदार, वाहनचालक व अन्य चार चाकी वाहन व व्यक्तीस प्रतिबंधित ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी -कर्मचारी,पोलीस अधिकारी-कर्मचारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तसेच तहसील कार्यालय, परंडा यांनी नियुक्त केलेल्या पथकास तसेच त्यांच्या वाहनास लागू होणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविले आहे.

1993 च्या भूकंपात अनाथ निराधार झालेल्या मुला-मुलींसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन -- आपले घर

1993 च्या प्रलयंकारी भूकंपात अनाथ, निराधार झालेल्या मुला मुलींचे संगोपन व शिक्षण करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने साने गुरुजी जयंती दि. 24 डिसेंबर 1993 रोजी नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे आपले घर चालू केले. निवास भोजन व शिक्षण यांची  चांगली सोय करण्याबरोबरच त्या मुला मुलींच्या सर्वांगीण विकासाला उत्तेजन मिळावे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून चांगल्या प्रकारे त्यांना जगता यावे,अशी त्यांची तयारी करण्याचा कटाक्ष आपले घर ने नेहमीच ठेवला आहे. अशा निराधार मुली मुलांचे जीवन वाया जाऊ नये,यासाठी आपले घर सुरू राहणे गरजेचे आहे.
दहावीपासून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी नवीन मुले मुली येतात.बारा ते पंधरा स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांचा संच आत्मीयतेने आपले घरचे कार्य सांभाळत आहेत.आपले घर मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांचा आपले घर शी सदैव संपर्क आहे, त्यांच्यापैकी जे नळदुर्गच्या जवळ राहतात ते आपल्या घरच्या कामकाजात आपुलकीने भाग घेतात. समाजातील दानशूर धनिक वर्गाबरोबरच शिक्षक, प्राध्यापक, सेवारत व निवृत्त सरकारी कर्मचारी, बँका वगैरेचे कर्मचारी यांनी या सामाजिक बांधिलकीचे ऋण मानून किमान 2 हजार 500 रुपयांची देणगी आपले घर च्या पत्त्यावर पर्यायाने या अनाथ निराधार मुला-मुलींकरिता द्यावी, ही विनंती आपले घर च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ही देणगी कर 80 जी आर या सवलतीस पात्र आहे.(आपले घर च्या राष्ट्रसेवा दल आपले घर स्टेट बँक ऑफ इंडिया नळदुर्ग खाते क्रमांक 5 2 0 0 0 0 0 4 4 आयएफसी कोड एसबीआय) ही रक्कम बँकेत भरल्यानंतर ९४२२३६६८१० या मोबाईल क्रमांकावर कृपया एसएमएस करावा. तसेच "वंचित बालके आणि समाज" या विषयावर जनजागृतीचे अभियान चालविणे आवश्‍यक आहे, त्यादृष्टीने लातूर भूकंपाच्या स्मृतिदिनी रविवार 30 सप्टेंबर 2018 रोजी सोलापूर येथे एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे तसेच आपल्या घरच्या रौप्यमहोत्सवी दिनानिमित्त स्मरणिका काढण्यात येणार असून त्यात माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा व कार्यकर्त्यांचे अनुभव कथन याबरोबरच "वंचित बालके आणि समाज" या विषयावर मूक- बधिर, मतिमंद मुले, बाधित मुले यांच्या संगोपनासाठी चालविल्या जाणाऱ्या संस्ताचालकांचे अनुभव तसेच या क्षेत्रातील विशेषतज्ञ व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या प्रकट मुलाखती देण्यात येणार आहेत. व्यापारी आणि सहकारी संस्थांनीही या स्मरणिकेस जाहिरातीच्या स्वरूपात सहकार्य करावे.रौप्य महोत्सव समारोप समारंभ रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी आपले घर, नळदुर्ग येथे होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 ते 7 या वेळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही घेण्यात येणार आहे.या सर्व उपक्रमात यथाशक्ती सहभागी होऊन आपले घरला सहकार्य करावे,असे आवाहन आपले घरचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात "नाफेड " च्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरु करण्याचे नियोजन

  राज्यात खरीप हंगाम 2018-2019 मध्ये विविध जिल्ह्यात “नाफेड” या संस्थेच्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभूत दराने करण्यात येईल. मूग, उडीद व सोयाबीनचे आधारभूत दर व नोंदणी कालावधी पुढीलप्रमाणे आहे- पीक-मूग, आधारभूत दर हंगाम 2018-19,दर -6975/-नोंदणी कालावधी -25/09/2018 ते 09/10/2018, पीक-उडीद, आधारभूत दर हंगाम 2018-19,दर -5600/- नोंदणी कालावधी -25/09/2018 ते 09/10/2018, पीक- सोयाबीन, आधारभूत दर हंगाम 2018-19,दर -3399/-नोंदणी कालावधी -01/10/2018 ते 31/10/2018.
सर्व शेतकऱ्‍यांना  कळविण्यात येते की, सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणारआहे,शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात त्यांची जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी, नोंदणीचाप्रारंभिक कालावधी 15 दिवसांचा असेल. तसेच अपवादात्मक प्रकरणी त्यानंतर आलेल्या शेतकऱ्यांच्याअर्जाची नोंदणी खरेदी सुरु झाल्याच्या पहिल्या 15 दिवसांत करण्यात येईल. तद्नंतर नोंदणी होणार नाही,नोंदणीकरिता आधारकार्डची प्रत व मूग/उडीद/सोयाबीन या पिकांची नोंद असलेला 7/12 उतारा सादर करावयाचा आहे, शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर द्यावयाचा आहे,नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे त्याच केंद्रावर माल आणावयाचा आहे.एसएमएस शिवाय आणलेला माल परत पाठविण्यात येईल, शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला,चाळणी करुन व सुकवून 12 % पेक्षा जास्त आर्द्रता नसलेला माल आणावा. तसा माल नसल्यास परत पाठविण्यात येईल.
 याशिवाय शेतकऱ्यांना असेही कळविण्यात येते की, खरेदी संस्था माल आणल्यानंतर शेतकरी नोंदणीकृत आहे किंवा कसे?,एसएमएस दिल्यानंतर माल आणला किंवा कसे?, शासनाने निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार व खरेदीच्या मर्यादेनुसार माल आणला किंवा कसे?, 7/12 च्या पिकपेऱ्याची नोंद, खरेदी करावयाच्या पिकाची नोंद आहे किंवा कसे?,
गुणवत्ता नियंत्रकाच्या मते माल एफएक्यू दर्जाचा आहे किंवा कसे? या बाबी तपासून त्याची पूर्तता होत असेल तरच खरेदीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजणी झाल्यानंतर मालाची नोंद वजनासह करुन काटापट्टी शेतकऱ्यांना देण्यात येईल, खरेदी केलेल्या मालाची एनईएमएल पोर्टलवर त्याच दिवशी नोंद करण्याचे बंधन सबएजन्ट/खरेदी संस्थेवर राहील, शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम त्यांच्या आधारकार्डाशी संलग्न बँक खात्याद्वारेच देण्यात येईल, त्यामुळे आपले बॅक खाते आधारकार्डशी संलग्न असल्याची त्यांनी खात्री करावी, पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची 7/12 व स्थळ पाहणी करुन महसूल व कृषि विभागाकडून पडताळणी करण्यात  येईल.
तरी या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.