Thursday, 18 January 2018

आपले पोलिस आपली अस्मिता लोकराज्य पोलिस विशेषांकाचे प्रकाशन




उस्मानाबाद,18, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोंहचवून, अल्पावधीतच लाखो वाचकांच्या -हदयातस्थान निर्माण करणा-या, शासनाचे मुखपत्र लोकराज्य आपले पोलिस आपली अस्मिता या पोलिस विशेषांकाचे प्रकाशन उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांच्या हस्ते बुधवारी, 18 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
          यावेळी  श्री देशमुख यांनी पोलिस विशेषांकाचे कौतुकही केले. यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले की, पोलिस विभागामार्फत करण्यात आलेल्या कामगिरीवर आधारीत जानेवारी 2018 चा लोकराज्यचा अंक हा दर्जेदार आणि वाचनीय आहे. तसेच लोकराज्यमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या अंकाचे नियमित वाचन केल्यास, याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी  व्यक्‍त केला. यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची 100 प्रतींची नोंदणीही पोलिस विशेषांकाच्या प्रकाशनावेळी केली.

शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचे वार्षीक सभासद होण्यासाठी तात्काळ जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळीस जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी केले.  

Saturday, 13 January 2018

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्हयात मोठया प्रमाणात पाणीसाठा होईल यादृष्टीने कामे करावीत - एकनाथ डवले




उस्मानाबाद,दि.13:- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हयातील एकूण 586 गावांची निवड करण्यात आली असून तीनही टप्प्यातील कामांमुळे पाणीसाठा मोठया प्रमाणात होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन मृद, जलसंधारण व रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे केले.  

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे श्री. कांबळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, उमरगा, कळंब, परंडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान, रोजगार हमी योजनेची जिल्हयातील सर्वच कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असून या सर्व कामांतून पाणीसाठा मोठया प्रमाणात वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी आराखडा तयार करावा व त्यानुसार कामकाजाचे योग्य नियोजन करुनच कामे करावीत.  

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देताना सांगितले की, सन 2015-16 ची 21 हजार 25 कामे पूर्ण करण्यात आली आहेत त्यामुळे सन 2015-16 मध्ये 25 हजार 190.68 टी.सी.एम. पाणीसाठा झाला असून 89 हजार 452.36 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे. सन 2016-17 मधील 16 हजार 795 कामांपैकी 9 हजार 759 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे 16 हजार 163.39 टी.सी.एम. पाणीसाठा झाला असून 9 हजार 330.24 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

यावेळी श्री. एकनाथ डवले यांनी सर्व विभागप्रमुखांकडून जिल्हयातील विविध कामांचा आढावा घेतला.उपस्थित विभागप्रमुखांनी  आपापल्या विभागासंबंधी कामकाजाबाबतचे सादरीकरण यावेळी केले.


या बैठकीस जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

Saturday, 6 January 2018

चांगला समाज व देश घडविण्यासाठी सकारात्मक विचार करायला हवा -अपर जिल्हाधिकारी पराग सोमण


,दि.6:- वृत्तपत्रामध्ये समाजमनाचे व प्रशासनाचे योग्य ते रुप दिसले पाहिजे, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुन चांगला समाज व देश घडविण्यासाठी  सकारात्मक विचार करायला हवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी आज व्यक्त केले.




जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दर्पणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. सोमण हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते हे होते.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार कमलाकर कुलकर्णी, प्रशांत कावरे, धनंजय पाटील, राजाभाऊ वैद्य, देविदास पाठक, शिला उंबरे, संतोष हांबीरे, मच्छिंद्र कदम, सुभाष कदम, भिमाशंकर वाघमारे, हुंकार बनसोडे, भाऊसाहेब अणदुरकर, कलीम मुसा सय्यद, श्री.जी.बी.राजपूत, संतोष खुने, आकाश नरोटे, मल्लिकार्जून सोनवणे आदीची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना श्री.सोमण म्हणाले की, पत्रकारासाठी सकारात्मक कायदे देखील झाले आहेत, यामध्ये आर्थिक बाबीचा देखील विचार करण्यात आला आहे.

यावेळी श्री.डॉ.कोलते यांनी अध्यक्षीय समारोपात शासनाच्या विविध विकास योजनाचा रथ पुढे नेण्याचे काम पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभते, त्यामुळे पत्रकार व प्रशासन मिळून चांगले काम करु या, असे आवाहन यावेळी केले.


यावेळी पत्रकार धनंजय रणदिवे, देविदास पाठक व संतोष हंबीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मानले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पत्रकारांची मौखिक आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच लोकराज्य, महाकर्जमाफी, सामाजिक न्यायाच्या दिशेने, कथा परिर्वनाची – दर्शन समृध्दीचे, बदलत्या महाराष्ट्राचे आदी पुस्तकांचे यावेळी पत्रकारांना वाटप करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे व उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व जिल्ह्यातील पत्रकार  मोठ्या संख्येने उपस्थित होते.