Saturday, 5 August 2017

तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजन


उस्मानाबाद. दि. 5:- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी सोडवून त्यांना तत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी 'लोकशाही दिन'  जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. जिल्हयाचा लोकशाही दिन हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होत असतो. कार्यपध्दती सुलभ व्हावी यासाठी तालुकास्तरावरही लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे, असे उमरगा  तहसीलदार श्री. अरविंद बोळंबे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयस्तर तसेच जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तर, दुस-या सोमवारी विभागीय आयुक्तस्तर व तिस-या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन होणार आहे. या दिवशी  सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येणार आहे.तालुकास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार असतील. लोकशाही दिनाचा कार्यक्रम संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात येईल.
अर्ज  विहित नमुन्यात म्हणजे  नमुना  प्रपत्र 1 अ ते  1 ड  मध्ये  असावा. अर्जदाराची  तक्रार  अथवा निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असावे व चारही  स्तरांवरील  लोकशाही  दिनाकरिता अर्ज  15  दिवस आधी 2 प्रतींमध्ये पाठविणे आवश्यक आहे. तालुका लोकशाही  दिनानंतर 1 महिन्याने जिल्हास्तरीय/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्जदाराला अर्ज करता येईल. या लोकशाही  दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त यांच्या व त्यानंतर दोन महिन्यांनी मंत्रालयस्तरीय लोकशाही दिनात अर्जदारास अर्ज करता येईल.
लोकशाही  दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपिल्स,  सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर. यानुसार जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येवू शकणार नाहीत ते संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकीत करण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय लोकशाही दिनासाठी उप विभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पाटबंधारे, कृषि, सहकार, बांधकाम, पाणीपुरवठा या विभागांचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता  लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी  त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही.
                जनतेकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोचपावती प्रपत्र 2 प्रमाणे देण्यात येईल. सर्व स्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या  विभागाच्या  विभाग प्रमुखांकडे सदर अर्ज पाठविण्यात येईल व विभागप्रमुख या अर्जातील विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. सदर अहवाल, अर्जदाराची  विनंती,  त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करुन लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील.
            अर्जदाराला अंतिम  उत्तर लोकशाही  दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याचा आत देण्यात येणार आहे. जनतेने  द्यावयाच्या अर्जाच्या नमुना  प्रती त्यांना  विनासायास  विनामुल्य उपलब्ध आहेत, लोकशाही दिनाच्या माध्यमातून आपल्या तक्रार, निवेदनांचे सामोपचाराने  निराकरण  करावे, असेही  प्रसिध्दीस  दिलेल्या पत्रकात  म्हटले  आहे.

मुरघास युनिट व विद्युतचलीत कटबाकुट्टी यंत्रासाठी प्रस्ताव सादर करावेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त


            उस्मानाबाद, दि. 05:- राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत मुरघास युनिटची स्थापना करणे व कडबाकुट्टी यंत्र वापरास प्रोत्साहन या योजनेचा लाभ देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे त्याकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी पशुधन विकास अधिकारी (विसतार) पंचायत समिती यांच्याकडे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
            मुरघास युनिटची स्थापना करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 5 आणि अनुसूचित जातीमधील 2 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट उस्मानाबाद जिल्हयासाठी देण्यात आलेले आहे. विद्युतचलीत कडबाकुट्टी यंत्र वापरास प्रोत्साहन या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 40 आणि अनुसूचित जातीमधील 10 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट उस्मानाबाद जिल्हयासाठी देण्यात आलेले आहे.

            मुरघास युनीटसाठी इच्छूक लाभार्थ्यांनी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे तर विद्युतचलीत कडबाकुट्टी यंत्रासाठीच्या इच्छूक लाभार्थ्यांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  यांच्याकडे दि. 07 ऑगस्ट 2017 ते दि. 25 ऑगस्ट 2017 या कालावधीत सादर करावयाचे आहेत. अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती याबाबतचा तपशील संबंधित पंचायत समितीमध्ये उपलब्ध आहे. 

स्पर्धा परिक्षांमध्ये यशप्राप्तीसाठी उर्दू लोकराज्य अत्यंत उपयुक्त- मुख्याध्यापक मीर एजाज अली




उस्मानाबाद, दि. 05:- अल्पसंख्याक समाजातील विशेषत: उर्दु भाषिकांना आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त उर्दू भाषेतून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र अत्यंत उपयुक्त आहे असे प्रतिपादन मुध्याध्यापक मीर एजाज अली यांनी केले. 
            उस्मानाबाद येथील अल्लामा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूलमध्ये आज जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबादच्या वतीने उर्दू लोकराज्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी  शिक्षक सय्यद फैसलअली, पठाण अखिल, शेख तलत फातेमा, शेख आर्शिया, जिल्हा माहिती कार्यालयातील भिमा पडवळ, आश्रुबा सोनवणे, सिध्देश्वर कोंपले, सचिन मोरे उपस्थित होते.
            पुढे बोलताना मीर सर म्हणाले की, या मासिकाच्या माध्यमातून  शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, अल्पसंख्यांकाच्या योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय, विविध उपक्रम, शासन निर्णयासह विविध सामाजिक, सांसकृतिक विषयाची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होईल. शासनाने उर्दू भाषिकांसाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उर्दू लोकराज्यचे वाचन नियमित व्हावे याकरिता या शाळेतील शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होणे गरजेचे आहे. अल्लामा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूल या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी या मासिकाचे वर्गणीदार होतील असे आश्वासनही त्यांनी दिले.
            उर्दू भाषिकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि शासनाच्या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या व लोकराज्यची उर्दू आवृत्ती प्रत्येक उर्दू भाषिकांपर्यंत पोहोंचावी आणि विद्यार्थी व युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. उर्दू भाषेत दर्जेदार आणि अचूक ज्ञान देणारा लोकराज्य हे एकमेव मासिक आहे. या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असून वर्गणीदांना दरमहा अंक पोस्टाने घरपोच पाठविण्यात येतो. उर्दू भाषेचे जतन-संवर्धन व भाषेला चालना देण्याची यामागची शासनाची भूमिका आहे. उर्दू भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय, सामाजिक, सांस्कृतिक विषयाची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होईल त्यासाठी उर्दू भाषिक व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे वाचन नियमित करावे, व सर्वांनीच वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक यासेरोद्यीन फहद मखदूम काझी यांनी केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना उर्दू लोकराज्य मासिकाचे अंक भेट म्हणून देण्यात आले.

            या कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.