Saturday, 21 January 2017

शहरातील पालकांना आवाहन


उस्मानाबाद, दि.21 :-ज्या विद्यार्थ्यांना  लेखन वाचन व गणिती क्रिया करता येत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी  मोफत लेखन वाचन उपक्रम माहे फेब्रुवारी  व मार्च 2017 या दोन  महिन्यात  घेण्याचा निर्णय नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या घराजवळ असणाऱ्या  नगर परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांची नोंदणी नगर परिषद मुख्यालय  किंवा नगर परिषद शिक्षण विभाग , शहर पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी नोंदणी करावी , असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे .

कुष्ठरोग आणि कुष्ठरोगींबाबतचे गैरसमज दूर करु या ...



उस्मानाबाद, दि.21 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी 30 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या ग्रामसभेला अधिकारी , कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कुष्ठरोगाविषयी माहिती देवून त्यासंबंधी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी केले.   
जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान , विशेष कुष्ठरोग शोध मोहीम व दूर्गम गावात कुष्ठरोग जनजागृती मोहीम या कार्यक्रमासंदर्भात आयोजित बैठकीत सुनिल यादव हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.शेळके,  सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. बी.एस.खडके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप, महिला व बाल कल्याण श्री. सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
कुष्ठरोग हा अल्पसंसर्गजन्य रोग आहे. वेळेत निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग मुक्त होतो. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालये आरोग्य केंद्रामध्ये मोफत औषधोपचार दिला जातो, याची माहिती जनतेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे अभियान व मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेचे योग्य नियोजन करुन कुष्ठरोग निमूर्लनाचा संदेश गावोगावी पोहचावा, असे सुनिल यादव यांनी सांगितले.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजे 30 जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा, कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे याची माहिती दिली जाणार आहे. दळणवळणास कठीण दूर्गम गावांमध्ये 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या शहरी भागातील 300 घरे व गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविली जाणार आहे ,  अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन  जिल्ह्यामध्ये  चार शहरी  भागांमध्ये व 52 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे .

कुष्ठरोग निमूर्लन जनजागृतीसाठी शासकीय/निमशासकीय विभाग सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या  घरी येणाऱ्या  आरोग्य  कर्मचाऱ्यांना  सहकार्य करावे , असे आवाहनही सुनिल यादव यांनी केले. 

Friday, 20 January 2017

दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी,2017 दरम्यान निवड चाचणीचे आयोजन


उस्मानाबाद,दि.20:-भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारा आयोजित स्पोर्टस ट्रेंनिग सेंटर, आकूर्ली रोड कांदीवली(पूर्व) मुंबई येथे ॲथलेटिक्स, बॉक्सींग, ज्युदो, कुस्ती, हॉकी, कब्बड्डी, टेबल टेनिस, फुटबॉल व धनुर्विद्या या खेळातील भारतीय शालेय खेळ महासंघ (SGFI) व राष्ट्रीय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा तसेच राज्यस्तर क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या वैयक्तिक व सांघीक खेळाच्या खेळाडूचे निवड चाचणीचे आयोजन दिनांक 26 ते28 फेब्रुवारी,2017 या कालावधीत करण्यात आले आहे.
 उस्मानाबाद शहर व जिल्हयातील 12 ते 16 वर्षे वयोगटातील राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावरील  / पदकविजेत्या खेळाडूंनी निवड चाचणी करीता  आणि अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन श्री संजय महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी उस्मानाबाद  यांनी कळविले आहे.
****