Thursday, 17 September 2026

*न घाबरता सूक्ष्म नियोजनातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करा* पालकमंत्री प्रताप सरनाईक

*न घाबरता सूक्ष्म नियोजनातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करा* पालकमंत्री प्रताप सरनाईक *पाणीटंचाई,चारा आणि पीक नुकसानीचा घेतला आढावा* * टँकरचे नियोजन आतापासूनच करण्याचे निर्देश * सिंचन प्रकल्पांत केवळ आठ टक्के पाणीसाठा * भूजल पातळीत मोठी घट धाराशिव,दि.१७ सप्टेंबर (जिमाका) पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे यंत्रणांनी घाबरून न जाता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेचे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे,असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज,१७ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी पाणीटंचाई आणि पीक नुकसानीच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर व निवारा उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. *टँकरचे नियोजन आतापासूनच करा* पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले, जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून दीर्घ खंडामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.आगामी काळात संभाव्य भीषण टंचाईला सामोरे जाण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच सज्ज राहावे. विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता लक्षात घेऊन त्याचे नियोजन आतापासूनच करावे.राज्य शासनदेखील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाने साथ दिली नसली तरी शासन शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही.पाणी,चारा आणि पीक नुकसानीच्या प्रश्नावर प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून परिस्थितीला सामोरे जावे.लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी स्पष्ट केले. *आपत्कालीन वीज भारनियमन थांबवा* पीक नुकसानीच्या काळात ज्या पिकांना पाणी दिले जात आहे, अशा वेळी करण्यात येणारे आपत्कालीन वीज भारनियमन महावितरणने तात्काळ थांबवावे,असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत महावितरणच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. वीजविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच महावितरणचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल,असेही श्री. सरनाईक यांनी स्पष्ट केले. *शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज* खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले आहे.काही ठिकाणी हे नुकसान जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत आहे.शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.पिण्याच्या पाण्याची परिस्थितीदेखील गंभीर आहे.आजच अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे. भविष्यात टँकरची मागणी वाढल्यास टँकर भरण्यासाठी पाणी आणायचे कुठून,हाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे,याकडे खासदार श्री. राजेनिंबाळकर यांनी लक्ष वेधले.या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत,अशी मागणीही त्यांनी केली.या संभाव्य पाणी संकटाचे गांभीर्य शासन आणि प्रशासनाने लक्षात घ्यावे. भरीव निधीची तरतूद करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.महावितरणनेही आपत्कालीन वीज भारनियमन करू नये,असे खासदार श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगितले. पीक नुकसानीचे मूल्यांकन करताना उपग्रहाद्वारे दर्शविण्यात आलेले उत्पन्न गृहीत धरण्याची अट रद्द करावी.सर्व शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी झाली पाहिजे,जेणेकरून शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल,असेही खा. श्री.राजेनिंबाळकर म्हणाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,पीक कापणी प्रयोगाचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्यात यावे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी आणि शासनाला आवश्यक असलेली माहिती विहित नमुन्यात त्वरित उपलब्ध करून द्यावी,असे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली.पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याचे काम करण्यात येत आहे.धाराशिव तालुक्यात पाच आणि लोहारा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.१८४ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर पाणीटंचाई आराखड्याबाबत बैठका घेण्यात आल्या असून जुलै २०२७ पर्यंतचा जिल्ह्याचा टंचाई आराखडा लवकरच तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. *सिंचन प्रकल्पांत अवघा आठ टक्के पाणीसाठा* कृषी विभागाचे श्री.चोपडे यांनी जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र, खरीप हंगामातील लागवड,झालेले पर्जन्यमान,पावसाचा दीर्घ खंड, तालुकानिहाय पावसातील खंड आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट तसेच पीक नुकसानीची सविस्तर माहिती दिली. जलसंपदा विभागाचे श्री.थोरात यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या केवळ आठ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली.उपलब्ध पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेतीच्या सिंचनासाठी पाणी देणे बंद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे श्री.मांजरमकर यांनी भूजल परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट झाली असून काही ठिकाणी ती सुमारे सात मीटरने खाली गेली आहे.या कालावधीत भूजल पातळी साधारण दोन ते तीन मीटरपर्यंत अपेक्षित होती,मात्र पावसाच्या दीर्घ खंडामुळे भूजल पातळी झपाट्याने घटल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धनचे डॉ.मुळे यांनी जिल्ह्यातील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची उपलब्धता आणि संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. पाऊस लांबल्याने एकीकडे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत,तर दुसरीकडे गावागावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही ताण वाढत आहे.त्यामुळे पीक वाचविण्यापासून शेतकरी वाचविण्यापर्यंत आणि आजचे पाणी जपण्यापासून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी बैठकीत दिल्या. *****************

*शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; शासन भक्कमपणे पाठीशी* पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून खेड येथे पीक नुकसानीची पाहणी *शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद*

*शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; शासन भक्कमपणे पाठीशी* पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून खेड येथे पीक नुकसानीची पाहणी *शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद* धाराशिव,दि.१७ सप्टेंबर (जिमाका ) पावसाच्या दीर्घ खंडामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.पीक नुकसानीबाबत शासन सकारात्मक असून येत्या काही दिवसांत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी आज,१७ सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील खेड येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव तसेच संबंधित विभागांचे गावपातळीवरील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी खेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर टकले यांच्या शेताला भेट देऊन नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.त्यांनी श्री.टकले यांच्याशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.जवळपास शंभर टक्के सोयाबीन पीक हातचे गेल्याची व्यथा श्री.टकले यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.एवढ्या मोठ्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने पीक नुकसानीपोटी भरीव आर्थिक मदत करावी,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. *शेतातूनच उपमुख्यमंत्र्यांना दाखविले नुकसान* पीक नुकसानीचे गांभीर्य प्रत्यक्ष लक्षात आणून देण्यासाठी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.त्यांनी नुकसानग्रस्त शेतातील सोयाबीन पीक उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष दाखविले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर टकले यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.राज्य शासन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशीही संवाद साधून जिल्ह्यातील पीक नुकसानीची माहिती घेतली.राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करावी,अशी मागणी खासदार श्री. राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी संवाद साधत जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.पालकमंत्री श्री. सरनाईक यांनीही जिल्ह्यातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांना दिली. *शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही* नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री. सरनाईक म्हणाले,शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.येत्या काही दिवसांत मदतीबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.सोयाबीनसह अन्य पिकांचेही नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चितपणे मदत करेल.या शब्दांत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला. यानंतर पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी खेड येथील ऊस उत्पादक शेतकरी वासुदेव मेटे यांच्या शेतालाही भेट दिली.त्यांच्या नुकसान झालेल्या ऊस पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली.यावेळी खेड येथील अनेक शेतकरी बांधवांनी पालकमंत्र्यांची भेट घेत पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन,ऊस आणि अन्य पिकांचे झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिले.शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि अपेक्षा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेत शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार केला. ****************

स्वातंत्र्याच्या लढ्यातून मिळालेली जिद्दच आजच्या संकटावर मात करण्याची ताकद देईल* पालकमंत्री प्रताप सरनाईक

*स्वातंत्र्याच्या लढ्यातून मिळालेली जिद्दच आजच्या संकटावर मात करण्याची ताकद देईल* पालकमंत्री प्रताप सरनाईक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा *धाराशिवकरांना दुष्काळाच्या संभाव्य संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन* धाराशिव,दि.१७ सप्टेंबर (जिमाका) मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द,त्याग आणि एकजुटीची प्रेरणा घेऊन आजच्या संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या संकटावरही मात करूया,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.संकट कितीही मोठे असू दे,सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी प्रारंभी स्मृती स्तंभास पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. सुरुवातीला राष्ट्रीय गीत वंदे मातरम् झाले.पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थिताना संबोधित करताना पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर, नागनाथ कुंभार,शेषराज बनसोडे, गोविंद नलावडे,नागनाथ कुंभार, मनाबाई घोडके,तात्यासाहेब शिंदे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास घाडगे पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी सर्वश्री प्रवीण धरमकर,संतोष राऊत व स्वाती शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला,मात्र मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त होण्यासाठी आणखी १३ महिने आणि दोन दिवस संघर्ष करावा लागला.१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संघर्षात सामान्य जनतेनेही मोठ्या धैर्याने सहभाग घेतला. धाराशिव जिल्ह्यालाही या गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे,असे सरनाईक यांनी नमूद केले. *पाणीटंचाईवर प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन* यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पावसात दीर्घ खंड पडल्याने जिल्ह्यासमोर संभाव्य पाणीटंचाईचे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय विशेष पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात आले असून उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन केले जात आहे. नागरिकांसह पशुधनाला पाणी उपलब्ध राहावे यासाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर,अनधिकृत पाणीउपसा रोखणे आणि जलस्रोतांचे नियोजन यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. “पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध पाणी जपून वापरा,”हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता लोकचळवळ बनविण्याचे आवाहन त्यांनी केले.नाला बांध,बंधारे, पाझर तलाव, सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास,शेततळी,सिमेंट नाला बांध आणि चेकडॅमच्या कामांना गती देऊन भूजलपातळी वाढविण्याचा दीर्घकालीन संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. *शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा* शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे.‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’च्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कमी व्याजदरात कर्ज, नियमित कर्जफेडीस प्रोत्साहन, शेतीमालासाठी व्यापक बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यावरही भर देण्यात येत आहे. *गुंतवणुकीतून रोजगारनिर्मितीला चालना* धाराशिव जिल्हा उद्योग आणि रोजगाराच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगताना सरनाईक यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योग घटकांशी झालेल्या सामंजस्य करारांचा उल्लेख केला. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. युवकांच्या हाताला काम आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ उपक्रमात जिल्ह्यातील उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.युवकाला योग्य रोजगार आणि उद्योगाला योग्य मनुष्यबळ हेच आपल्या विकासाचे सूत्र आहे असे त्यांनी सांगितले. *सुरक्षित,आधुनिक परिवहन व्यवस्था हे विकासाचे माध्यम* धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि आधुनिक परिवहन व्यवस्था महत्त्वाची असल्याचे सांगत सरनाईक यांनी रस्ते सुरक्षा,वाहन तपासणीतील पारदर्शकता आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिला.महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ या उपक्रमातून अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. *पर्यटनातून स्थानिक रोजगाराला नवी संधी* तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र, धाराशिव लेणी,नळदुर्ग,परंडा,संत गोरक्षनाथांचा वारसा आणि जागजीचे महालक्ष्मी मंदिर यांसारख्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळवून देण्यावर भर असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.“वारसा जपू,पर्यटन वाढवू आणि स्थानिकांच्या हाताला काम देऊ,ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाला मंजुरी,भूजल सुरक्षेसाठी जलसंधारणाची कामे, गोदामांच्या माध्यमातून धान्य साठवणूक क्षमता वाढविणे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला. *‘मराठवाड्याची खरी ताकद मातीमध्ये नव्हे, तर माणसांच्या जिद्दीमध्ये’* भाषणाच्या समारोपात पालकमंत्री सरनाईक यांनी मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाची आजच्या आव्हानांशी सांगड घातली.त्या काळात आपल्या पूर्वजांकडे साधने कमी होती पण जिद्द मोठी होती.आज आपल्याकडे साधने, तंत्रज्ञान,प्रशासन आणि योजना आहेत. त्याला एकजुटीची ताकद जोडली तर कोणतेही संकट मोठे नाही असे ते म्हणाले. ज्या भूमीने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा दिला, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि संकटांवर मात करून विकासाची वाट धरली,तीच भूमी आज पाणीटंचाईच्या संकटावरही नक्कीच मात करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,गरिबांच्या ताटात अन्न पोहोचवणे आणि जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपत धाराशिवला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प या दिनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.यामध्ये सिद्धनाथ अनपट यांना तुळजापूर,आकाश जावळे यांना वाशी,तर साक्षी शिंदे यांना कळंब तहसील येथील आपले सरकार सेवा केद्र मंजूर करण्यात आले.त्यामुळे या अनाथ बालकांना या केंद्रांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच सामाजिक न्यायाच्या योजनांमधून कष्टकरी घटकांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीने गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेंतर्गत सात लाभार्थ्यांना प्रत्येकी एक पत्र्याचा स्टॉल तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या लाभार्थ्यांमध्ये मंगेश नामदेव साबळे (पळसप),वैभव दत्तात्रय बनसोडे (तेर),बालाजी सदाशिव शेरखाने (रुईभर), ज्ञानेश्वर गोपाळ माने (पोहनेर), बब्रुवान व्यंकट हांकारे (सांजा), पांडुरंग जीवन शेरखाने (चिलवडी) आणि दत्तात्रय नानासाहेब राजगुरू (बावी) यांचा समावेश होता.या सातही लाभार्थ्यांना प्रत्येकी एक स्टॉल आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली. कार्यक्रमाला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी,ज्येष्ठ नागरिक,माजी सैनिक,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव,महिला भगिनी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले. *********