Monday, 31 August 2026
निमंत्रित पत्रकारांसाठी धाराशिवमध्ये ‘वार्तालाप’ कार्यशाळा
निमंत्रित पत्रकारांसाठी धाराशिवमध्ये ‘वार्तालाप’ कार्यशाळा
‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ विषयावर मंथन ; केंद्राच्या योजना,पत्रकार कल्याण योजनेचीही माहिती
धाराशिव,दि.२९ ऑगस्ट (जिमाका )भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय (पीआयबी),मुंबईच्या वतीने धाराशिव येथे मंगळवार, दि.१ सप्टेंबर २०२६ रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’ या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांच्याशी निगडित विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे,माध्यमांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणे तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील परस्पर संवाद अधिक दृढ करणे, हा या ‘वार्तालाप’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शाश्वत शेतीवर होणार संवाद
‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ या विषयावर आयोजित या कार्यशाळेत अणुऊर्जा विभाग,मुंबई आणि केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रतिनिधी सहभागी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.याशिवाय पत्र सूचना कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या पत्रकार कल्याण योजनेबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर तसेच पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. शासनमान्य यादीवरील प्रादेशिक व स्थानिक वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी व संपादक तसेच उपग्रह वाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्यासाठी हा ‘वार्तालाप’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी हर्षल आकुडे,माध्यम आणि संवाद अधिकारी,पत्र सूचना कार्यालय,पुणे (मोबाईल : ९६३७१४३५४४) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क पाझर तलाव,बंधाऱ्यांची नियमित पाहणी ; प्रत्येक प्रकल्पासाठी विशेष पथकांची नियुक्ती
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
पाझर तलाव,बंधाऱ्यांची नियमित पाहणी ; प्रत्येक प्रकल्पासाठी विशेष पथकांची नियुक्ती
धाराशिव दि.२९ ऑगस्ट (जिमाका) संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पर्जन्यमानात घट होऊन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती व अन्य आवश्यक बाबींसाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन आणि प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक पाझर तलाव व बंधाऱ्याची नियमित पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.यासाठी तहसीलस्तरावर प्रत्येक प्रकल्पासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी आढावा बैठक झाली.या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येक पाझर तलाव व बंधाऱ्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.या पथकांनी संबंधित प्रकल्पांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन जलसाठा आणि पाणी उपलब्धतेवर लक्ष ठेवायचे आहे.
तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा विस्तार अधिकारी,पाणीपुरवठा विभागातील अभियंता,उपविभागीय किंवा कनिष्ठ अभियंता,जलसंपदा अथवा पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी, जिल्हा परिषद विभागातील अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,महसूल सेवक, ग्रामपंचायत अधिकारी,ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी,सहायक कृषी अधिकारी,पोलीस बीट अंमलदार,पोलीस पाटील तसेच विद्युत विभागातील कर्मचारी यांचा या पथकांमध्ये समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्याचे नाव,पदनाम, कार्यालय आणि मोबाईल क्रमांक आदेशात नमूद करण्यासही सांगण्यात आले आहे.
जलसाठ्याचा अनधिकृत वापर रोखणार
पथकांकडून प्रकल्पातील सद्यस्थितीतील जलसाठा आणि उपलब्ध पाण्याची स्थिती तपासली जाणार आहे.पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या प्रकल्पातील जलसाठ्याचा अनधिकृत वापर होत नाही ना,यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नदी,नाला,तलाव किंवा बंधाऱ्यातील पाणी अनधिकृत पंप,मोटार,पाइपलाइन अथवा अन्य साधनांद्वारे उपसले जात असल्याचे निदर्शनास आल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यासह संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीची प्रतिबंधात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची सद्यस्थिती तपासून पाणी उपलब्धतेची माहिती घेण्यात येणार आहे.तसेच संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असलेल्या गावांची पूर्वसूचना आणि पूर्वतयारीच्या दृष्टीने माहिती संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कार्यक्षेत्रातील पाणीटंचाईसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी या पथकांवर असेल.विशेष भरारी पथकाने प्रकल्पनिहाय दैनंदिन क्षेत्रभेटी देऊन प्रत्येक भेटीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी. त्यात भेटीचा दिनांक,प्रकल्पाचे नाव, जलक्षमता,उपलब्ध जलसाठा, आढळलेल्या त्रुटी किंवा अनियमितता आणि केलेल्या कार्यवाहीची नोंद करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गंभीर स्वरूपाची बाब,अनधिकृत पाणी उपसा,पिण्याच्या पाण्याच्या स्रोताला धोका किंवा विद्युत पुरवठ्याशी संबंधित गंभीर बाब निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने तहसीलदारांना द्यावी.तसेच तहसीलदारांनी याबाबतचा पथकनिहाय दैनंदिन अहवाल ‘गुगल शीट्स’द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या कामात कोणतीही दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही,याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले आहेत.
*****
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारे ‘मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन’ धाराशिवमध्ये
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारे ‘मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन’ धाराशिवमध्ये
केंद्रीय संचार ब्यूरो व जिल्हा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम; १ व २ सप्टेंबरला मध्यवर्ती बसस्थानकात प्रदर्शन
‘हरित धाराशिव’साठी विशेष दालन ; मोफत वृक्षवाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन
धाराशिव,दि.२९ ऑगस्ट (जिमाका ) केंद्र सरकारच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय कार्यालय सोलापूर आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती बसस्थानक,धाराशिव येथे दोन दिवसीय ‘मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.‘१२ वर्षे विश्वासाची,विकासाची,जन-कल्याणाची – विकसित भारत – जी राम जी विधेयक-२०२५, राष्ट्रीय पोषण अभियान’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन १ व २ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता होणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती.रितु खोखर,उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,पत्र सूचना कार्यालय, पुणेचे पत्र सूचना अधिकारी हर्षल आकुडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विकसित भारत गॅरंटी रोजगार मिशनची माहिती
ग्रामीण रोजगाराशी संबंधित ‘विकसित भारत गॅरंटी रोजगार मिशन-२०२५ (व्ही.बी.जीराम जी कायदा-२०२५)’ या विषयाची सविस्तर माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सप्टेंबर महिना ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून साजरा करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोषण आहार पाककृती आणि भरड धान्यांचे महत्त्व या विषयावरही प्रदर्शनात विशेष दालन उभारण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तसेच त्यातून साध्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांची माहिती छायाचित्रे आणि एलईडी वॉलच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहे. यामध्ये पीएम विश्वकर्मा योजना,प्रधानमंत्री मातृवंदना योजना,प्रधानमंत्री जनधन योजना व यूपीआय व्यवहार,प्रधानमंत्री कुसुम योजना,प्रधानमंत्री आवास योजना, स्टार्टअप योजना,प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,उजाला योजना आणि सोलार योजना यांसह केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.
‘आत्मनिर्भर भारत’च्या वाटचालीचे दर्शन
इलेक्ट्रॉनिक,कृषी,संरक्षण,आरोग्य, वाहननिर्मिती आणि विमान क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील ‘आत्मनिर्भर भारत’ची वाटचाल, विविध विकास योजना तसेच ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव’ या उपक्रमावर आधारित विशेष छायाचित्र प्रदर्शनही यामध्ये असणार आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने मोफत वृक्षवाटपासाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार आहे.तसेच परिवर्तन सेवाभावी संस्था,लातूर यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मोफत प्रवेश
मध्यवर्ती बसस्थानक,धाराशिव येथे १ व २ सप्टेंबर रोजी होणारे हे प्रदर्शन दोन्ही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.केंद्र सरकारच्या विविध योजना,विकासात्मक उपक्रम,राष्ट्रीय पोषण अभियान,आत्मनिर्भर भारताची वाटचाल तसेच ‘हरित धाराशिव’ उपक्रमाची माहिती एकाच ठिकाणी जाणून घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध होणार आहे.या दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला नागरिक,विद्यार्थी,युवक,महिला तसेच विविध घटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)