Tuesday, 25 August 2026
सामंजस्य करार ते प्रत्यक्ष गुंतवणूक,उद्योग आणि रोजगार’ हा विकासाचा मार्ग असावा पालकमंत्री प्रताप सरनाईक
सामंजस्य करार ते प्रत्यक्ष गुंतवणूक,उद्योग आणि रोजगार’ हा विकासाचा मार्ग असावा
पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव उद्योग - गुंतवणुकीसाठी सज्ज ; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा
गुंतवणूक परिषदेचे पालकमंत्र्यांनी केले ऑनलाइन उद्घाटन
धाराशिव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्हा उद्योग,गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी सज्ज आहे.स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत,स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करावे,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज धाराशिव येथे आयोजित ‘जिल्हा गुंतवणूक परिषद– धाराशिव २०२६’चे पालकमंत्री सरनाईक यांनी ऑनलाइन उद्घाटन केले.परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,श्रीमती.धनश्री जाधव समन्वय अधिकारी (मैत्री कक्ष) मुंबई तथा उपनिबंधक भागीदारी संस्था विधी व न्याय विभाग,श्री संजय भुरेवाल सहाय्यक आयुक्त,छत्रपती संभाजीनगर विभाग, श्री.अमर पाटील अध्यक्ष,धाराशिव सहकारी साखर कारखाना,श्री बाळासाहेब गीते,संचालक MAFPCO,कळंब श्री.सुयोग अमृतराव,डायरेक्टर मॅनेजमेंट कॉलेज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र,धाराशिव,श्री शिवराम तोतेवाड,व्यवस्थापक,सीडबी, श्री.देवा सुरवसे Export Branch,पोस्ट ऑफिस, धाराशिव,श्री.मनोज घायाळ, डिजिटल मार्केटिंग,श्री.राजाभाऊ कोंढारे, अध्यक्ष,लघुउद्योग भारती संघटना, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती.
धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात म्हणून या गुंतवणूक परिषदेकडे पाहिले पाहिजे असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की कृषी,कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया,अक्षय ऊर्जा,पर्यटन तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.“या परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७ हजार ५३४ कोटी ८५ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यातून सुमारे ७ हजार ५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.ही केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या हजारो कुटुंबांच्या आशा आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी आहेत,असे श्री. सरनाईक यांनी सांगितले. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभारही त्यांनी मानले.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, कृषीप्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योग,स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ,तसेच वारा व सौरऊर्जा क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. ऐतिहासिक,धार्मिक व नैसर्गिक पर्यटनाला उद्योगाची जोड दिल्यास रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.उद्योगांसाठी जमीन व भांडवलासोबतच पायाभूत सुविधा,प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहतूक व लॉजिस्टिक व्यवस्था आणि सकारात्मक प्रशासकीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. Ease of Doing Business, MAITRI २.०, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), PSI यांसह विविध योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.सरनाईक यांनी केले.
‘एक खिडकी’ पद्धतीने उद्योगांना आवश्यक परवानग्या व सुविधा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. एमआयडीसी क्षेत्राचा विस्तार, लॉजिस्टिक सुविधा आणि आवश्यक औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून उद्योग वाढला पाहिजे; मात्र त्यासोबत स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे.उद्योगांचा सर्वाधिक फायदा स्थानिक युवक,महिला,शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना झाला पाहिजे,असे पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले.आज झालेल्या सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, उद्योग विभाग व संबंधित यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधावा,अशी सूचनाही त्यांनी केली.
“आपले ध्येय केवळ ‘MoU झाले’ इथपर्यंत मर्यादित नसावे.MoU ते प्रत्यक्ष गुंतवणूक,गुंतवणुकीतून उद्योग आणि उद्योगातून रोजगार, हा आपला विकासाचा मार्ग असला पाहिजे,असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.धाराशिवमध्ये संधी व क्षमता असून जिल्हा उद्योग- गुंतवणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश या परिषदेतून जाऊ दया,असे सांगत त्यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन,उद्योग विभाग, एमएआयटीआरआय आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,मागील वर्षाच्या गुंतवणूक परिषदेच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली असून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.सन २०४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होणार असून त्यासाठी विकसित भारत २०४७ ही संकल्पना देश पातळीवर राबविली जात आहे.यामध्ये १४० ट्रीलीयन डॉलरपर्यंत जीडीपी घेऊन जायचा संकल्प करण्यात आला आहे. उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व ना देय प्रमाणपत्राचे काम विनाविलंब मार्गी लागावेत यासाठी दरमहा उद्योजकांच्या विषयांचा आढावा प्रशासकीय पातळीवर घेण्यात येतो.उद्योग वाढीसाठी सर्व घटकांना प्रोत्साहन देणे, सुविधा देणे,रुपरेषा बदलणे ही सर्वांची सांघीक जबाबदारी असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यावेळी उद्योजकांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग विभागाचे सहायक आयुक्त संजय भुरेवाल मार्गदर्शन करताना म्हणाले की, उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या ह्या मैत्री पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच उद्योग पोर्टलवर ६० हजार उद्योग नोंदणीकृत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
धाराशीव येथील उद्योग विभागाचे सहायक आयुक्त अमोल बळे यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रुपरेषा व गुंतवणूक परिषद आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी व उद्योग व रोजगारासाठी आवश्यक माहिती थोडक्यात सांगितली.
धाराशीव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमर पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,उद्योग केंद्राच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना कर्ज व मार्गदर्शन उपलब्ध होते.तर गरज ओळखून उद्योग करावा म्हणजे उद्योग यशस्वी होतो.उद्योगासाठी ४ डी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले - ४ डी म्हणजे डिझायर,डिटरमिनीनेशन, डेडीकेशन व डिसीप्लीन या चार बाबी उद्योगासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.पाटील यांनी यावेळी केले.
000000
Monday, 24 August 2026
‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला बळ ; केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा
‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला बळ ; केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा
धाराशिव,दि.२४ ऑगस्ट (जिमाका) राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दि. १९ व २० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.गावातील प्रत्येक नागरिकाला गावातच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक,सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे,आजारांचे प्रतिबंध व लवकर निदान यावर भर देणे तसेच समुदायाचा आरोग्य व्यवस्थापनातील सक्रिय सहभाग वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, बेंबळी, येथे ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (CPHC) प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते दि.७ जून २०२६ रोजी करण्यात आला. पर्यावरणपूरक संदेश देत कार्यक्रमस्थळी वृक्षारोपण करून या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.आजपर्यंत जिल्ह्यात सात सत्रे पूर्ण झाली असून,केशेगाव येथे आठवे सत्र संपन्न झाले. दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,ढोकी येथे नवव्या सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ईस्माईल मुल्ला,बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर जाधव,डॉ.प्रशांत रेवडकर, डॉ.विकांत राठोड तसेच सुहास शिंदे,आरोग्य सहाय्यक निलंकठ मोरे,संजय शिंदे,श्रीमती सुवर्णा सुरवसे व मंजुश्री सुरवसे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षणात समग्र व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC), माता व बाल आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्य शिक्षण,समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन,लवकर निदान,उपचार व आवश्यक संदर्भ सेवा,गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी तसेच ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रतिबंधात्मक,प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देण्यात येत आहे.गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे,माता-बाल आरोग्य सुधारणे, लसीकरणाला प्रोत्साहन देणे,पोषण व स्वच्छतेबाबत जनजागृती करणे,तंबाखूमुक्ती व व्यसनमुक्तीला चालना देणे, असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान करणे,संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे,या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे.
या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक,गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका आणि आशा समन्वयक उपस्थित होते. आधुनिक आरोग्य सेवा पद्धती, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण आणि माता-बाल संगोपन यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांद्वारे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतीमान होईल,असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
‘गावाचा आरोग्य विकास — सर्वांची सामूहिक जबाबदारी!’
‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून गावपातळीवर आरोग्यविषयक विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम, जागरूक,निरोगी आणि संपन्न करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
निरोगी गाव → सक्षम कुटुंब → सशक्त समाज → आरोग्यसंपन्न महाराष्ट्र,या संकल्पनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
*****
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाबत खुलासा ; नियमित स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती सुरू
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाबत खुलासा ; नियमित स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती सुरू
धाराशिव दि.२४ ऑगस्ट (जिमाका) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे.कार्यालयाची इमारत नियमितपणे संपूर्ण स्वच्छ करण्यात येते.तसेच छत गळती होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या अनुषंगाने प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी कार्यालयाची स्वच्छता करण्यात येते.पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृह वापरात नसले तरी ते प्रत्येक महिन्याला स्वच्छ केले जाते.कार्यालयाच्या भिंतीला गेलेल्या तड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. कार्यालयातील जुन्या फर्निचरचे निर्लेखन करण्याची कार्यवाही सुरू आहे. कार्यालयातील कोणतेही इलेक्ट्रिक साहित्य नादुरुस्त नसून सर्व साहित्याचा योग्य प्रकारे उपयोग होत आहे.तसेच फर्निचरचे काम सुरू असल्यामुळे काही इलेक्ट्रिक बोर्डांची जागा बदलण्यात आली आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव या इमारतीची दुरवस्था झालेली नसल्याचेही खुलाशात नमूद करण्यात आले आहे.बांधकामाच्या सर्व समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.नवीन खरेदी असल्यामुळे नोंद करण्याचे काम सुरू असून,या कार्यालयात वर्षभर ग्रंथ येत असतात,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता,देखभाल तसेच बांधकामाशी संबंधित बाबींवर आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे या खुलाशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)






