Wednesday, 15 July 2026
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१४ जुलै (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक विद्यार्थ्यांनी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता दहावी, बारावी,पदवी,पदव्युत्तर,वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.संबंधित विद्यार्थ्यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असावेत.उपलब्ध निधीच्या अधीन राहून तसेच ज्येष्ठता व गुणक्रमानुसार पात्र विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.
अर्जासोबत स्वहस्ताक्षरातील अर्ज, मोबाईल क्रमांक,शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका,पुढील वर्षात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा प्रवेश शुल्काची पावती,आधार कार्ड, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
पूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,तळमजला,धाराशिव येथील कार्यालयात २४ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावीत किंवा टपालाद्वारे पाठवावीत.निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मांग,मातंग समाज तसेच तत्सम १२ पोटजातींतील पात्र युवा व युवतींनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
******
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी '१९५०' टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी '१९५०' टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित
नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा
धाराशिव,दि.१४ जुलै (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून,या मोहिमेदरम्यान पात्र मतदारांना निवडणूकविषयक सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हास्तरावर विशेष मदत कक्ष (Help Desk) स्थापन केला आहे.तसेच मतदारांच्या अडचणी,शंका आणि तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी '१९५०' हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून,जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या मदत कक्षामार्फत मतदारांना विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक,मतदार म्हणून पात्रता,नाव नोंदणी अथवा दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच मागील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतील (२००२, २००४ व २००५) मतदार नोंदी शोधून देण्यासाठीही सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याशिवाय,मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने भरताना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे.स्थलांतरित मतदारांना त्यांचा सध्याचा आणि पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ ओळखून योग्य ठिकाणी नावनोंदणी करण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे.
मतदारांना निवडणूक आयोगाच्या 'ECInet' या मोबाईल ॲपची माहिती देण्याबरोबरच त्यामधील 'Book a Call with BLO' या विशेष सुविधेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.या सुविधेद्वारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी थेट संपर्क साधून आवश्यक माहिती व सहाय्य मिळविता येणार आहे.
'१९५०' या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना विनामूल्य संपर्क साधून आपल्या शंका व अडचणींचे निरसन करता येणार आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, या प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी '१९५०' हेल्पलाईन तसेच जिल्हास्तरीय मदत कक्षाचा उपयोग करावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
*****
Sunday, 12 July 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार.. -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार.
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..
-परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार.
पंढरपूर, दि १२ :- आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर,पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती.प्रणिता भालके व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत.७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत मोफत प्रवास,तर महिलांना 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी.तसेच पंढरपूरातील विविध बसस्थानकांवर थांबलेल्या बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता,निर्जंतुकीकरण करावे, आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा" असा दर्शनी फलक लावण्यात यावा, त्याचबरोबर चालक व वाहक यांच्या आरोग्याच्या वैद्यकीय तपासणीची बसस्थानक परिसरात व्यवस्था करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश देण्यात यावा अशा सूचनाही परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी दिल्या.
मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार १४५ विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती.यंदा त्याहून अधिक सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.तसेच वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चंद्रभागा,भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.या स्थानकांवर पिण्याचे पाणी,सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष,मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वारी कालावधीत रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या महामंडळाच्या १३ हजार कर्मचाऱ्यांना यामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भीमा बसस्थानची पाहणी
आषाढी यात्रा शुद्ध एकादशी २५ जुलै २०२६ रोजी असून,आषाढी यात्रा सोहळ्यासाठी वारकरी- भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे १८ ते २० लाख वारकरी भाविक पंढरपुरात येतात.आषाढी यात्रेसाठी एस.टी ने येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या अनुषंगाने प्रवासी भाविकांच्या सुविधेसाठी महामंडाळामार्फत पंढरपूर व पंढरपूर परिसरात चार तात्पुरते बसस्थानक निर्माण करण्यात येतात.या अनुषंगाने आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्री.विठ्ठल कारखाना, देगाव येथे तात्पुरते भीमा बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या भीमा बसस्थाकावर,सुलभ शौचालय,शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,स्वच्छता,आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र,चौकशी कक्ष,मार्गदर्शन फलक,सीसीटीव्ही यंत्रणा तसेच सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आदी बाबतची माहिती घेतली व संबधितांना आवश्यक सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
******
Subscribe to:
Posts (Atom)
