Thursday, 2 July 2026
भूकंपाच्या धक्क्यांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका ; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन जिल्ह्यात भूकंप झाल्याची अधिकृत नोंद नाही
भूकंपाच्या धक्क्यांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका ; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यात भूकंप झाल्याची अधिकृत नोंद नाही
धाराशिव,दि.२ जुलै (जिमाका ) जिल्ह्यात आज गुरुवारी २ जुलै रोजी सकाळी काही भागांत भूगर्भातून गूढ आवाज ऐकू आल्याने तसेच भूकंपासदृश धक्का जाणवल्याच्या माहितीची जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून याबाबतची पडताळणी केली.
राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार,हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील कामटी तांडा येथे आज सकाळी १०.१४ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता.धाराशिव जिल्ह्यात काही नागरिकांना जाणवलेला गूढ आवाज हा हिंगोली जिल्ह्यात झालेल्या या भूकंपाचा परिणाम असू शकतो,अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.दरम्यान,धाराशिव जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,अशा घटनांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.केवळ प्रशासनाकडून अधिकृतपणे जारी करण्यात येणाऱ्या सूचना व माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि त्याचे पालन करावे.
******
Thursday, 25 June 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात जनजागृतीची व्यापक चळवळ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात जनजागृतीची व्यापक चळवळ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धाराशिव,दि.२५ जून (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,धाराशिव,जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग तसेच यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संदेश देणाऱ्या या अभियानात विद्यार्थी,युवक,शिक्षक, अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभियानाला सुरुवात करण्यात आली.
अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषद कन्या प्रशाला,धाराशिव येथे आयोजित व्यसनमुक्ती शपथविधी कार्यक्रमाने झाला.या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा म्हाडदाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले,यश मेडिकल फाउंडेशनचे डॉ. संदीप तांबारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.संदीप तांबारे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, त्यावरील उपाययोजना आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.
यानंतर समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी कन्या प्रशाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत भव्य जनजागृती दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स,बॅनर्स आणि जनजागृतीपर फलक घेऊन सहभाग नोंदविला.
"नशामुक्त भारत – सशक्त भारत", "नशामुक्त भारत – विकसित भारत" आणि "नशामुक्त धाराशिव – सशक्त धाराशिव" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे युवकांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन कवले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिदानंद बागर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त परमेश्वर खुने,समाजकल्याण निरीक्षक अमोल कातगळे तसेच डॉ.संदीप तांबारे यांचा समावेश होता.
यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन कवले यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प करून धाराशिव जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यशाळेत डॉ.संदीप तांबारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचारपद्धती,पुनर्वसन प्रक्रिया तसेच युवकांची सामाजिक जबाबदारी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबासह संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
या सर्व उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक,शिक्षक,विद्यार्थी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांनी पुन्हा एकदा नशामुक्त भारताची शपथ घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा दृढ संकल्प व्यक्त केला.व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने जनजागृतीची व्यापक चळवळ उभी करणारे हे अभियान धाराशिव जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
******
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात ; गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसह गौरव
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात ; गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसह गौरव
धाराशिव,दि.२५ जून (जिमाका) सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय दिन तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रेरणादायी वक्ते भैरवनाथ कानडे आणि डॉ.संदीप तांबारे यांनी मार्गदर्शन केले.तसेच दिव्यांग कल्याण आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन बांगर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त काशिनाथ खुणे,विजयकुमार गायकवाड आणि ॲड.बडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात अध्यक्ष सचिन कवले यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष शासन व्यवस्थेत रुजविली.शिक्षण,आरक्षण, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या माध्यमातून वंचित समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श प्रत्येकाने आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार आणि सामाजिक न्याय’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे यांनी शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वाधिक प्रभावी साधन असल्याचे सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून समता,स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची व्यापक चळवळ उभी केली.वसतिगृहे,शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि आरक्षणाच्या धोरणांद्वारे त्यांनी वंचित समाजाला नवी दिशा दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संविधानिक मूल्ये,सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा विचार आत्मसात करून समाजपरिवर्तनाचे वाहक बनावे,असे आवाहन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिनानिमित्त युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देताना डॉ.संदीप तांबारे म्हणाले की,मादक पदार्थांचे व्यसन हे व्यक्ती,कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे.युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण,आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा.व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामूहिक सहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले,तर आभार प्रदर्शन युवराज चव्हाण यांनी मानले.
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करताना विद्यार्थ्यांचा गौरव आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
******
Subscribe to:
Posts (Atom)





