Sunday, 21 June 2026

उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक प्राधिकारी संस्था निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण

उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक प्राधिकारी संस्था निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण धाराशिव,दि.२१ जून (जिमाका) महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी दि.२२ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.ही मतमोजणी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),तुळजापूर रोड, धाराशिव येथे होणार असून प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया १८ जून रोजी शांततेत पार पडली. त्यानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी केंद्रावर सुरक्षा,प्रवेश नियंत्रण तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. ******

वैद्यकीय प्रवेश परीक्षा शांततेत ; धाराशिव येथे RE-NEET ला ९१.५५ टक्के उपस्थिती २०७२ पैकी १८९७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; १७५ परीक्षार्थी गैरहजर

वैद्यकीय प्रवेश परीक्षा शांततेत ; धाराशिव येथे RE-NEET ला ९१.५५ टक्के उपस्थिती २०७२ पैकी १८९७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; १७५ परीक्षार्थी गैरहजर धाराशिव,दि.२१ जून (जिमाका) देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी RE-NEET (UG) २०२६ परीक्षा रविवारी धाराशिव शहरातील पाच केंद्रांवर शांततेत,शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न बाळगलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निर्णायक असल्याने सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत घेण्यात आली.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर एकूण २०७२ परीक्षार्थी नोंदणीकृत होते.त्यापैकी १८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,तर १७५ परीक्षार्थी गैरहजर राहिल्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील उपस्थितीचे प्रमाण सुमारे ९१.५५ टक्के राहिले. परीक्षा केंद्रनिहाय पाहता,श्रीपतराव भोसले हायस्कूल,तांबरी विभाग येथे ७२० पैकी ६५७ विद्यार्थी उपस्थित होते,तर ६३ गैरहजर राहिले.रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,बार्शी रोड येथे ४८० पैकी ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.शासकीय तंत्रनिकेतन,तुळजापूर रोड येथे ३६० पैकी ३२६,छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तांबरी विभाग येथे २८८ पैकी २६४,तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे २२४ पैकी २०४ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते.सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, व्हिडिओग्राफी,बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्किंग व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी विद्याचरण कडवकर तसेच सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट सिद्धार्थ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडली. याशिवाय शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य व NTA नोडल अधिकारी मो.रा.लोखंडे, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके,भरारी पथक प्रमुख आमोद भुजबळ,पोलीस निरीक्षक, महसूल,आरोग्य,परिवहन,वीज वितरण विभाग तसेच नगर परिषद प्रशासनानेही परीक्षा व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा जिल्ह्यात अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पूर्ण झाल्याने जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि विविध यंत्रणांमधील योग्य समन्वय साधून ही परीक्षा घेण्यात आली. ****

निरोगी जीवनाचा मंत्र देणारा योग दिन उत्साहात साजरा ७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

निरोगी जीवनाचा मंत्र देणारा योग दिन उत्साहात साजरा ७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग धाराशिव दि.२१ जून (जिमाका) बदलती जीवनशैली,वाढता ताणतणाव आणि विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी आज जगभर स्वीकारली जात असून,निरोगी आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज २१ जून रोजी रविवारी धाराशिवमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे,विद्यार्थी,खेळाडू,युवक- युवती,नागरिक आणि योग साधक- साधिका अशा विविध स्तरांतील सुमारे ७०० जणांनी एकत्रितपणे योगाभ्यास करत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला. जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,आयुष विभाग आणि मेरा युवा भारत केंद्र यांच्या विद्यमाने तसेच पतंजली योग समिती,आर्ट ऑफ लिव्हिंग,धाराशिव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व क्रीडा भारती यांच्या सहकार्याने सकाळी ७ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथील स्केटिंग मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रवीण बागल, आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरी शिंदे,खो-खो वर्ल्ड कप विजेती अश्विनी शिंदे,जिल्हा आयुष अधिकारी प्रिया सोनवणे,शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे,क्रीडा भारतीचे प्रवीण गडदे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे नंदकिशोर तांबडे तसेच डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सहसचिव योगेश थोरबोले यांचे स्वागत करून योग सत्रास प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (IDY २०२६) "निरोगी वृद्धत्वासाठी योग" (Yoga for Healthy Ageing) ही संकल्पना विशेष ठरली.वाढत्या वयातही शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी योग किती उपयुक्त आहे, याचा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला.मैदानावर एकाच वेळी विविध वयोगटांतील नागरिकांनी योगाभ्यास करत या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी नियमित योगासने करण्याचे आवाहन केले."स्वतःचे आरोग्य डॉक्टरविरहित ठेवण्यासाठी दररोज योगासने करा,नियमित मैदानावर या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा," असे सांगत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करून उपस्थितांकडून ध्यान-धारणा करून घेण्यात आली. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, स्केटिंग मैदान येथे पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.विविध योगासने, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश कसा करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.मैदानावर उपस्थित शेकडो नागरिकांनी उत्साहाने त्यांच्या सूचनांचे पालन करत योगाभ्यास केला. या कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी व अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे व विश्वास खंदारे,मनपा शिक्षणाधिकारी मल्हारी माने,आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक,मेरा युवा भारत केंद्राचे वैभव लांडगे,पतंजली योग समितीच्या साधनाताई व वैशाली उपासे यांच्यासह सुमारे ७०० योग साधक-साधिका उपस्थित होते. तसेच शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालय,खोखो खेलो इंडिया सेंटरचे खेळाडू,कर्मवीर बालक मंदिरचे विद्यार्थी, नागरिक,युवक-युवती आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शेकडो नागरिकांनी एकत्रितपणे केलेला योगाभ्यास,मैदानावर उमटलेली सकारात्मक ऊर्जा आणि निरोगी जीवनाचा घेतलेला संकल्प यामुळे यंदाचा योग दिन विशेष संस्मरणीय ठरला. राम ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक शुंभागी रोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ******