Tuesday, 26 May 2026
नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर प्रशासनाचे निर्बंध इतर उमेदवारांचे नाव-चिन्ह वापरण्यास मनाई ; आयोगाच्या निकषांचे पालन बंधनकारक
नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर प्रशासनाचे निर्बंध
इतर उमेदवारांचे नाव-चिन्ह वापरण्यास मनाई ; आयोगाच्या निकषांचे पालन बंधनकारक
धाराशिव,दि.२५ मे (जिमाका) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी,यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने १८ मे २०२६ रोजी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी,हितचिंतक तसेच मुद्रणालय चालक आणि अन्य माध्यमांद्वारे छपाई करणारे मालक व प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका छापताना काही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार,इतर उमेदवाराचे नाव अथवा त्यांना नेमून दिलेले निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नमुना मतपत्रिका छापताना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या प्रकारचाच कागद वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.आयोगाने निश्चित केलेल्या आकारामध्येच नमुना मतपत्रिका छापाव्यात,असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधित सर्वांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर वरीलप्रमाणे निर्बंध लागू राहणार असून,निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
*****
निवडणूक काळात जात,धर्म व भाषावार मेळावे-शिबिरांवर निर्बंध धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यांत २५ जूनपर्यंत आदेश लागू
निवडणूक काळात जात,धर्म व भाषावार मेळावे-शिबिरांवर निर्बंध
धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यांत २५ जूनपर्यंत आदेश लागू
धाराशिव दि.२५ मे (जिमाका) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.निवडणूक कालावधीत जात, धर्म किंवा भाषावार शिबिरे तसेच मेळावे आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी नगरपरिषद हद्दीत कोणत्याही प्रकारचे जातीय,धार्मिक अथवा भाषावार शिबिरांचे व मेळाव्यांचे आयोजन होऊ नये, यासाठी निर्बंध लावण्याची आवश्यकता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश लागू केले आहेत. संबंधित सर्वांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जारी करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यानुसार,धाराशिव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुठेही जात,भाषा किंवा धर्म यांच्या आधारावर शिबिरे अथवा मेळावे आयोजित करता येणार नाहीत.हे आदेश १८ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यांत लागू राहणार आहेत. निवडणुकीदरम्यान सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहे.
******
नामनिर्देशनावेळी वाहनांचा ताफा, मिरवणुका व घोषणांवर निर्बंध उमेदवारांसोबत केवळ पाच जणांनाच प्रवेश ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू
नामनिर्देशनावेळी वाहनांचा ताफा, मिरवणुका व घोषणांवर निर्बंध
उमेदवारांसोबत केवळ पाच जणांनाच प्रवेश ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू
धाराशिव,दि.२५ मे (जिमाका) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांनी कोणती कार्यपद्धती अवलंबावी,याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेश जारी केले आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी,या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.भारत निवडणूक आयोगाने १८ मे २०२६ रोजी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या,मोटारसायकली किंवा अन्य वाहनांचा समावेश करता येणार नाही,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांसोबत केवळ पाच व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाईल.याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची मिरवणूक,सभा, घोषणा,वाद्य वाजविणे,गाणी म्हणणे किंवा निवडणूक प्रचार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत.संबंधित सर्वांना नोटीस देऊन म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे आदेश २५ जून २०२६ पर्यंत धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यात लागू राहणार आहेत.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली आहे.
*******
Subscribe to:
Posts (Atom)