Tuesday, 5 May 2026

“फ्रँचायझी २.०” योजनेद्वारे टपाल सेवा अधिक गतिमान ; स्थानिकांना रोजगाराची सुवर्णसंधी

“फ्रँचायझी २.०” योजनेद्वारे टपाल सेवा अधिक गतिमान ; स्थानिकांना रोजगाराची सुवर्णसंधी धाराशिव दि.५ मे (जिमाका) टपाल विभागाची " फ्रँचायझी २.०" योजना - जनतेसाठी अधिक सुलभ व जलद टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांना अधिक वेगवान,सुलभ व जवळच्या ठिकाणी टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी "फ्रँचायजी २.०" योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेद्वारे स्थानिक उद्योजक, दुकानदार व इछुक व्यक्तींना अधिकृत फ्रँचायझी भागीदार म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध होत असून,टपाल सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. योजनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेअंतर्गत स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल,पार्सल बुकिंग व टपाल वितरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलद व कार्यक्षम सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.यामुळे स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगाराची संधी निर्माण होणार असून ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये टपाल सेवांचा विस्तार होणार आहे.तसेच टपाल विभागाच्या देखरेखीखाली विश्वसनीय सेवा नागरिकांना मिळणार आहे. कोण अर्ज करू शकतो आवश्यक जागा,मूलभूत सुविधा व निर्धारित पात्रता असलेले इछुक नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.इच्छुकांनी आपल्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयाशी किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. फ्रँचायजी २.० ही योजना टपाल सेवांचा विस्तार,डिजिटल सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यांचा प्रभावी संगम आहे.या योजनेमुळे टपाल सेवा अधिक लोकाभिमुख व परिणामकारक होणार असून,सर्व इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री यस.पी.मालकर,अधीक्षक डाकघर धाराशिव विभाग,धाराशिव यांनी केले आहे. ******

Sunday, 3 May 2026

धाराशिव केंद्रावर वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा (NEET) (UG)-२०२६ शांततेत व यशस्वीरीत्या संपन्न १८४५ विद्यार्थ्यांची उपस्थित

धाराशिव केंद्रावर वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा (NEET) (UG)-२०२६ शांततेत व यशस्वीरीत्या संपन्न १८४५ विद्यार्थ्यांची उपस्थिती धाराशिव,दि.३ मे (जिमाका) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी,नवी दिल्ली यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा NEET (UG)-२ ०२६ आज रविवारी,३ मे रोजी धाराशिव येथील केंद्रावर अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडली.दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत,तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण पाच उपकेंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १,९०२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १,८४५ विद्यार्थी उपस्थित राहिले,तर ५७ विद्यार्थी गैरहजर होते.परीक्षा प्रक्रियेदरम्यान सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही,व्हिडिओग्राफी, बायोमेट्रिक पडताळणी,फ्रिस्किंग तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितु खोखर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासनाचे नोडल अधिकारी श्री.विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली. परीक्षा आयोजनासाठी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिवचे प्राचार्य श्री. मो.रा.लोहकरे यांनी NTA नोडल अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.ड्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून तहसीलदार श्री.अरविंद बोळंगे,श्री. रणजितसिंह कोळेकर,श्री.जयवंत पाटील,श्री.निलेश काकडे आणि श्री.गोविंद येरमे यांनी कार्य पाहिले. भरारी पथक प्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी श्रीमती.सुधा साळुंके,तसेच पोलीस निरीक्षक श्री. आमोद भुजबळ यांनीही परीक्षा प्रक्रियेत प्रभावी समन्वय साधला. केंद्रप्रमुख म्हणून श्री.लहु माने,श्री. बी.जी.कुंभार,श्रीमती.डी.आर. हाके,श्री.शरद सदाफुले आणि डॉ. संदीप देशमुख यांनी जबाबदारी पार पाडली. याशिवाय नायब तहसीलदार श्री. संतोष पाटील,सहायक महसूल अधिकारी श्री.ज्योतीराम देवकर, महसूल सहायक श्री.शंभो पांचाळ यांच्यासह विद्युत,परिवहन,आरोग्य विभाग आणि नगर परिषद धाराशिव यांनी परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले. संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या समन्वयपूर्ण नियोजनामुळे NEET (UG)-2026 परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना,पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. *****

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही पालकमंत्री प्रताप सरनाईक * समिती बैठकीत विकास,पर्यटन, शिक्षण व पायाभूत सुविधांवर भर * १०० टक्के निधी खर्चाची उल्लेखनीय नोंद

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही पालकमंत्री प्रताप सरनाईक * समिती बैठकीत विकास,पर्यटन, शिक्षण व पायाभूत सुविधांवर भर * १०० टक्के निधी खर्चाची उल्लेखनीय नोंद धाराशिव,दि.३ मे (जिमाका) जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,अशी ठाम ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या बैठकीस आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील घाडगे, आमदार प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून विकासाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे श्री.सरनाईक यांनी स्पष्ट केले.जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश झाल्याने विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्यातील विविध स्थळांचे नियोजनबद्ध आराखडे तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तुळजापूर विकास आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत स्थानिक पर्यटन स्थळांच्या विकासातून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ट्राफिक गार्डन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल,अशी घोषणाही त्यांनी केली.याशिवाय विविध विभागीय समित्या लवकरच स्थापन करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून विकासाला चालना दिली जाईल,असे त्यांनी सांगितले. बैठकीत अर्चना पाटील यांनी शाळा, क्रीडांगणे,अंगणवाडी,महिला भवन, जलजीवन मिशन,पशुसंवर्धन दवाखाने आणि ग्रामविकास योजनांसाठी निधीची मागणी केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निधीतील कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यावर भर दिला,तर आमदार कैलास पाटील यांनी धोकादायक शाळा खोल्यांच्या पुनर्बांधणीसह आदिवासी उपयोजनांसाठी प्राधान्याने निधी देण्याची मागणी केली. बैठकीत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील विकास निधी खर्चाचा आढावा घेताना जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे स्पष्ट झाले.सर्वसाधारण योजनेसाठी मंजूर ४५७ कोटी रुपयांचा १०० टक्के खर्च करण्यात आला असून ५१०.९८ कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ७४.९८ कोटी रुपयांचा ९९.९७ टक्के निधी खर्च झाला,तर आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेंतर्गत मंजूर संपूर्ण निधी खर्च करण्यात आला. या यशस्वी कामगिरीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या प्रभावी अंमलबजावणीची दखल घेण्यात आली.सन २०२६-२७ साठी शासनाने मंजूर केलेल्या ४९४ कोटी रुपयांच्या नियतव्ययानुसार विकास कामांना वेळेत प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले.नव्या धोरणानुसार एप्रिल ते जून या कालावधीत शासकीय विकास कामे आणि एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांच्या याद्या मंजूर करण्यावर भर राहणार आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्रितपणे कार्यरत राहतील,असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी विविध विभागाच्या यंत्रणा प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेत त्यांच्या विभागामार्फत खर्च करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली व सन २०२६-२७ या वर्षासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची देखील माहिती दिली.या बैठकीला विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.बैठकीचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी मानले. *******