Monday, 23 February 2026
जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त बालविवाहविरोधी जनजागृती ; विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त बालविवाहविरोधी जनजागृती ; विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
धाराशिव दि.२४ फेब्रुवारी (जिमाका) जागतिक सामाजिक न्याय दिन (२० फेब्रुवारी) निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव आणि श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहमुक्त भारत आपला संकल्प अभियान व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा न्या.भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली.आपल्या गावात,शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये बालविवाह होत असल्यास तो त्वरित रोखावा,असे आवाहन त्यांनी केले.
बालविवाहाबाबत माहिती देण्यासाठी १०९८ या मोफत मदत क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पोलिसांना कळवावे,असेही त्यांनी सांगितले.
बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एखाद्या मुलीला किंवा मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवणे,अयोग्य हातवारे करणे यांसारखी कृत्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना व ‘नालसा-मुलांसाठी बालस्नेही कायदेविषयक सेवा योजना, २०२४’ याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे,उपप्राचार्य संतोष घासे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम,ॲड. विश्वजीत शिंदे (पॅनल विधिज्ञ) व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक एस.सी.पाटील यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व अधोरेखित करत आभार प्रदर्शन के.पी.पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
******
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू : १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू : १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव दि.२४ फेब्रुवारी (जिमाका) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या प्रवेशासाठी १७ फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal� या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांनी केवळ एकच ऑनलाईन अर्ज भरावा.अर्ज भरताना शाळेपासून घरापर्यंतचे अंतर गुगल मॅपद्वारे अचूक नोंदवावे.निवासाचा पत्ता,जन्मदिनांक, जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,फोटो आयडी,दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी माहिती अचूक व खरी भरावी.चुकीची माहिती भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.तसेच प्रवेशासाठी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी.
वंचित गटात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,वि.जा.(अ),भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड),इतर मागासवर्ग (OBC),विशेष मागास प्रवर्ग (SBC),दिव्यांग,अनाथ तसेच एच.आय.व्ही.बाधित/प्रभावित बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मागासवर्गीय बालकांसाठी वडील किंवा बालकाचा जातीचा दाखला तहसिलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांचा असावा. परराज्यातील जातीचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.दुर्बल गटामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा २०२४-२५ मधील वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेला तहसिलदाराचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे.पगारदार पालकांसाठी कंपनी किंवा मालकाचा पगाराचा दाखलाही ग्राह्य धरला जाईल.
निवासी पुराव्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील स्वतःच्या मालकीच्या निवासाबाबत रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,बीएसएनएल टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी,मतदान ओळखपत्र,पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.स्वतःचे घर नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वी किमान ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे.भाडेकरारातील पत्त्यावर वास्तव नसल्यास पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका/अंगणवाडी/बालवाडीचा दाखला तसेच पालकांचे स्वयंनिवेदन ग्राह्य धरले जाईल.
दिव्यांग बालकांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे किमान ४० टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे.अनाथ बालकांसाठी बालसुधारगृहाची कागदपत्रे आवश्यक राहतील.घटस्फोटीत महिलांसाठी न्यायालयीन निर्णय किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणाचा पुरावा तसेच बालकांच्या आईचे संबंधित अभिलेख आवश्यक आहेत.विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.एकल पालक (सिंगल पॅरेंट) पर्याय निवडल्यास संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.आई किंवा वडिलांचे आधारकार्ड (अनाथ बालकांच्या बाबतीत सांभाळ करणाऱ्या पालकांचे आधारकार्ड) बालकाचे जन्म प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा.भाडे तत्त्वावर राहणाऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत. सामाजिक वंचित घटकांसाठी जातीचा दाखला व अपंगत्व प्रमाणपत्र (परराज्यातील दाखले ग्राह्य नाहीत). आर्थिक दुर्बल गटासाठी २०२३-२४ किंवा २०२४-२५ मधील १ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला.पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर अलॉटमेंट लेटर स्वतःच्या लॉगिनवरून डाउनलोड करून गटशिक्षण कार्यालयाच्या पडताळणी समितीकडे अर्ज व कागदपत्रांसह सादर करावे.
पात्र ठरल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा.पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे.अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी गटशिक्षण कार्यालय किंवा शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) रवींद्र खंदारे यांनी केले आहे.
******
गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम
गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन
‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 फेब्रुवारी (जिमाका) :- श्री गुरु तेग बहादूर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण झाले. शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या समूहगानातून आपण गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून या उपक्रमातून नवप्रेरणा मिळत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त हा समूहगान उपक्रम कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
या प्रसंगी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, मुख्याधिकारी गौरी पाटील, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर हे शीख धर्मातील नववे गुरु होते. त्यांच्या जीवनकार्याने धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि त्याग यांचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजहित मोठे मानावे. गरजूंना मदत करणे, दु:खींचे दुःख दूर करणे ही खरी ईश्वरभक्ती आहे. जात, पंथ, भाषा या पलीकडे सर्व मानव एकसमान आहेत. परस्परांप्रती आदर, करुणा आणि सहिष्णुता राखणे आवश्यक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. गुरु तेग बहादूर यांच्या शिकवणीमधून आपल्याला धैर्य, सहिष्णुता आणि मानवतेचा मार्ग मिळतो. त्यांचे जीवन हे धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठीच्या बलिदानाचे तेजस्वी प्रतीक आहे असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिकरित्या प्रेरणादायी गीत सादर केले. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले गीत समूहगानातून गायले गेले. या गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, शौर्य, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.
०००००००
Subscribe to:
Posts (Atom)


