Tuesday, 10 February 2026
“स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय” — सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
“स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय” — सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
धाराशिव,दि.१० फेब्रुवारी (जिमाका)
जगभरात साजरा होणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिन २०२६ निमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री.अंकित सिंह यांनी इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना श्री.सिंह यांनी इंटरनेट म्हणजे काय,त्याचा उपयोग कोणकोणत्या बाबींमध्ये केला जातो,डिजिटल पेमेंटसाठी इंटरनेटचा वापर कसा होतो याची माहिती दिली.तसेच इंटरनेटचा अतिवापर केल्यास होणारे दुष्परिणाम व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी उपस्थितांना जागरूक केले.
सायबर गुन्हेगारी,सायबर फसवणूक कशी घडते,अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने होणारे धोके,मजबूत (Strong) पासवर्ड कसा तयार करावा व तो सुरक्षित कसा ठेवावा,यासह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा जबाबदारीने वापर कसा करावा, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहावे,असे आवाहन त्यांनी केले.
युरोपीय नेटवर्क ऑफ इंटरनेट सेफ्टी सेंटर्स (Insafe Network) यांच्या पुढाकाराने दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो.“स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय – आजचा सुरक्षित आणि जबाबदार वापर” या संकल्पनेवर आधारित या दिनाचा उद्देश इंटरनेट सुरक्षितता,डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा आहे.सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने डिजिटल व्यवहार करताना दक्ष राहून वैयक्तिक माहितीचे संरक्षण करावे व इंटरनेटचा सुज्ञ,सुरक्षित आणि जबाबदार वापर करावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेचे अधिकारी - कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात,जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जिल्हा परिषद सभागृहातून तर विविध विभागाचे अधिकारी -कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
******
परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण
परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण
धाराशिव,दि.१० फेब्रुवारी (जिमाका)
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६’ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याधरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे,जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोगो अनावरणानंतर संवाद साधताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.परळी वैजनाथ येथे होणारे हे महाप्रदर्शन देशातील जातीवंतy पशुधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान एका छताखाली पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे.
प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन यांनी सांगितले की,या महा एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी,म्हशी,शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्षी प्रजातींचे दर्शन घडणार आहे. यासोबतच आधुनिक डेअरी फार्मिंग,चारा व्यवस्थापन,प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स,पशुधन आरोग्य,लसीकरण व वैज्ञानिक संगोपनावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात या प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येणार असून,सर्व पशुवैद्यकीय संस्था,पंचायत समित्या व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच माहिती देण्याचेही नियोजन विभागाने केले आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक,शेतकरी व उद्योजकांनी ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
******
Sunday, 8 February 2026
जि.प व पं.स.सार्वत्रिक निवडणूक २०२६ ५५ जि.प गट व ११० निर्वाचक गणासाठी मतदान
जि.प व पं.स.सार्वत्रिक निवडणूक २०२६
५५ जि.प गट व ११० निर्वाचक गणासाठी मतदान
निवडणुकीत ६५.२२ टक्के मतदान
७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
* सर्वाधिक मतदान भूम तालुक्यात
* सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात
धाराशिव दि ८ फेब्रुवारी (जिमाका) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान मतदान झाले.सायंकाळी ५.३० वाजता नंतरही काही मतदान केंद्रात प्रवेश मिळालेले मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गट आणि ११० निर्वाचक गण अर्थात पंचायत समिती गणासाठी १३०८ मतदान केंद्रावर मतदान झाले.या निवडणुकीसाठी ११ लक्ष ४५ हजार ८८८ मतदार होते.यामध्ये ६ लक्ष ५ हजार ८४३ पुरुष,५ लक्ष ४० हजार ३७ स्त्री आणि ८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता.
७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी ३ लक्ष ९९ हजार ६४९ पुरुष,३ लक्ष ४७ हजार ७१८ स्त्री आणि ४ तृतीयपंथी अशा एकूण ७ लक्ष ४३ हजार ३७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची ही टक्केवारी ६५.२२ टक्के इतकी आहे.सर्वाधिक मतदान या निवडणुकीत भूम तालुक्यात झाले असून मतदानाची तेथील टक्केवारी ७१.६६टक्के इतकी आहे.सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात ५७.३२टक्के झाले.
भूम तालुक्यातील पाच जि.प.गट आणि दहा निर्वाचक गणासाठी ३९ हजार २३४ पुरुष व ३३ हजार ९५६ स्त्री अशा एकूण ७३ हजार १९० मतदारांनी मतदान केले.या मतदानाची टक्केवारी ७१.६६ टक्के आहे. वाशी तालुका - तीन जि.प.गट व सहा निर्वाचक गणासाठी २४ हजार ७७१ पुरुष,२१ हजार ५९४ स्त्री व दोन तृतीयपंथी अशा एकूण ४६ हजार ३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६९.६० टक्के आहे.
कळंब तालुका - ८ जि.प.गट व १६ निर्वाचक गणासाठी ५८ हजार २६३ पुरुष, ५० हजार ४४९ स्त्री.एकूण १ लक्ष ८ हजार ७१२ मतदारांनी मतदान केले.मतदानाची टक्केवारी ६६.६९ टक्के इतकी आहे.धाराशिव तालुका - बारा जि.प.गट व २४ निर्वाचक गणासाठी ८५ हजार ६५० पुरुष व ७३ हजार ६०८ स्त्री अशा एकूण १ लक्ष ५९ हजार २५८ मतदारांनी मतदान केले.या मतदानाची टक्केवारी ६३.७३ टक्के इतकी आहे.
परंडा तालुका - पाच जि.प. गट व दहा निर्वाचक गणासाठी ४१ हजार ६१५ पुरुष, ३५ हजार १९७ स्त्री अशा एकूण ७६ हजार ८१२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७१.६२ टक्के इतकी आहे.तुळजापूर तालुका - ९ जि.प गट व १८ निर्वाचक गडासाठी ६७ हजार ३४० पुरुष व ५८ हजार ७९७ स्त्री मतदार अशा एकूण १ लक्ष २६ हजार १३७ मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ६४.७२ टक्के आहे.
लोहारा तालुक्यातील ४ जि.प गट आणि ८ पंचायत समिती गणासाठी २७ हजार २१७ पुरुष व २४ हजार २२ स्त्री अशा एकूण ५१ हजार २३९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची ही टक्केवारी ५७.३२ टक्के आहे. उमरगा तालुका - ९ जि.प.गट आणि १८ पंचायत समिती गणासाठी ५५ हजार ५५९ पुरुष,५० हजार ९४ स्त्री व दोन तृतीयपंथी व्यक्तींनी मतदान केले.एकूण १ लक्ष ५ हजार ६५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ६१.१८ टक्के इतकी आहे .
*****
Subscribe to:
Posts (Atom)



