Thursday, 22 January 2026

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा ३५० वा शहीदी दिन – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मनिंदर पाल सिंग यांच्याकडून कौतुक

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा ३५० वा शहीदी दिन – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मनिंदर पाल सिंग यांच्याकडून कौतुक पुणे , दि. २२ (जिमाका वृत्तसेवा): ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे मनापासून अभिनंदन केले. आज पुणे ग्रँड टूरच्या तिसऱ्या टप्याचे सासवड ते बारामती हे १३७ किलोमीटरच्या स्पर्धेच्या वेळी ही प्रतिक्रिया दिल्ली. नांदेडच्या पवित्र भूमीवर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या विचारांचा आणि बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरु तेग बहादूरजींनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी दिलेले बलिदान सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे ग्रँड टूरचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, गुरु तेग बहादूरजींची विचारधारा ही समाजात एकता, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्द टिकवण्याची प्रेरणा देणारी आहे. त्याच विचारधारेतून सायकलिंगच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जनतेने तसेच प्रशासनाने गुरुजींच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनिंदर पाल सिंग यांनी आभार मानले. नांदेड येथे २४ तारखेला होणारा मुख्य सोहळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुरु तेग बहादूर साहेब यांनी दिलेला धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून, तो खेळाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला जात आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

योग्य नियोजनातून विविध उपक्रम राबवून नांदेड येथील कार्यक्रमात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहावी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

योग्य नियोजनातून विविध उपक्रम राबवून नांदेड येथील कार्यक्रमात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहावी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार धाराशिव,दि.२२ जानेवारी (जिमाका) “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून,त्यांच्या सर्व धर्मांप्रती असलेल्या समानतेच्या भावनेचा आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.त्यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त योग्य नियोजनातून जिल्हाभर विविध उपक्रम राबवावेत तसेच दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात जिल्ह्यातील संबंधित समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहील,असे नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. दिनांक २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित विभाग प्रमुख, तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांची हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत तसेच नांदेड येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.कुंभार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर तहसीलदार,गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या बैठका घेण्यात याव्यात.जिल्ह्यातील शाळा,आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित करावेत.विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करावे तसेच गाव व शहरांमध्ये प्रभात फेरी काढावी.विद्यार्थ्यांना ‘सरताज’ यांचे गीत व माहितीपट दाखविण्यात यावेत.नांदेड येथील कार्यक्रमासाठी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्याशी संबंधित सिख, बंजारा,सिकलकर,लबाना,सिंधी, मोहयाल,वाल्मिकी,उदासीन व भगत नामदेव (वारकरी) संप्रदायातील समाज बांधवांपैकी जिल्ह्यातील इच्छुक व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी व त्यांना नांदेड येथील कार्यक्रमास नेण्याची योग्य व्यवस्था करावी.विशेषतः उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज बांधव असून,त्यांच्याशी संपर्क साधून गटविकास अधिकारी यांनी त्यांना नांदेड येथील कार्यक्रमासाठी प्रोत्साहित करावे,असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी सांगितले की,जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यालयांमध्ये गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमांची माहिती व छायाचित्रे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले की,उमरगा,लोहारा व तुळजापूर तालुक्यांतून जास्तीत जास्त नागरिक नांदेड येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील,यासाठी नियोजन करण्यात यावे.जाणाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करावी तसेच इच्छुकांची यादी तयार करावी.या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना तालुकास्तरावर बोलावून बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांचा सहभाग सुनिश्चित करावा,असे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.कुंभार यांनी सांगितले की,नांदेड येथील कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक उपस्थित राहावेत,यासाठी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका घेण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी सांगितले की,जिल्हा,तालुका व गावस्तरावर विविध शाळा व विद्यालयांमध्ये स्पर्धा तसेच अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून,या स्पर्धा व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येत आहे. *******

गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी समाज बांधवांनी नांदेड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे महंत जितेंद्र महाराज

गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी समाज बांधवांनी नांदेड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे महंत जितेंद्र महाराज धाराशिव दि.२२ जानेवारी (जिमाका) सर्व समाजासाठी गुरु तेग बहादूर साहीबजी यांनी त्याग केला.लकीशा बंजारा व गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास अबाधित राहावा हा नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन पोहरादेवी येथील धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बंजारा समाज बांधवांच्या बैठकीत महंत जितेंद्र महाराज बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना माहीत झाला पाहिजे.नांदेड येथील कार्यक्रम हा जागतिकस्तरावरचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक नांदेड येथे येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे ते म्हणाले. श्री.कडवकर यावेळी बोलताना म्हणाले की,नांदेड येथील कार्यक्रमाचे मोठे महत्त्व आहे.त्याकाळी गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्यासोबत अनेक समाजांचे लोक जुळले होते.त्यांचा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास आहे.चांगल्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. विविध समाजाचे योगदान या कार्यक्रमासाठी असले पाहिजे. जिल्ह्यातील कोणत्या तांड्यातून व गावावरून किती लोक नांदेड येथे जाणार आहेत याची माहिती द्यावी.दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या समन्वयातून नांदेड येथील कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहनाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती श्री.कडवकर यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला हिंद दी चादर क्षेत्रीय आयोजन समितीचे संतोष चव्हाण, ॲड.प्रवीण पवार,विलास राठोड,विद्यानंद राठोड,दिनेश चव्हाण,शिवाजी राठोड, बाळासाहेब पवार,वसंत पवार,लक्ष्मण राठोड,राहुल राठोड,विनायक राठोड, ज्ञानदेव राठोड,दामाजी राठोड, बी.बी.राठोड,नितीन पवार,नितीन राठोड, गुरुनाथ राठोड व दिनेश राठोड यांची उपस्थिती होती. *****