Sunday, 2 September 2018

*"एकाच दिवशी-एकाच वेळी लोकराज्य मासिकाचं सामूहिक वाचन" हा उपक्रम यशस्वीपणे संप्पन्न* _एकूण १ लाख २६ हजार २२९ शिक्षक-विद्यार्थ्यांनी केले लोकराज्यचे सामूहिक वाचन_


          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य वाचक अभियानांतर्गत " एकाच दिवशी एकाच वेळी लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन" हा उपक्रम आज जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या एकत्रित प्रयत्नाने उत्साहाने, नीटनेटकेपणाने आणि यशस्वीपणे संप्पन्न झाला.
            सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ५४० जिल्हा परिषद शाळांमधून २ हजार ८४५ शिक्षक,२९ हजार ५२२ मुले,२७ हजार ३२९ मुलींनी, खाजगी एकूण २०१ शाळांमधून २ हजार २७० शिक्षक,३३ हजार १२१ मुले,२८ हजार ६३५ मुलींनी आणि १० महाविद्यालयांमधील १०१ शिक्षक, १ हजार २०८ मुले, १ हजार १९८ मुलींनी लोकराज्यचे सामूहिक वाचन केले. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ५ हजार २१६ शिक्षकांनी, ६३ हजार ८५१ मुलांनी तर ५७ हजार १६२ मुलींनी (सर्व विद्यार्थी मिळून १लाख २१ हजार १३) आज लोकराज्यचे सामूहिक वाचन केले. 
        याची सुरुवात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेतून म्हणजेच श्रीपतराव भोसले हायस्कूल येथून करण्यात आली. जवळपास तीन हजार विद्यार्थी आणि संस्थेचे अध्यक्ष सुधीरआण्णा पाटील , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. कलीम शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, विस्तार अधिकारी श्री.लोमटे, संस्थेचे प्राचार्य सुधीर पडवळ, उपप्राचार्य सिद्धेश्वर कोळी, संस्थेचे प्रशासकीय प्रमुख आदित्य पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय असा उपक्रम पार पडला.
            सुरूवातीस जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देताना शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि गुजराती या भाषांमध्ये प्रकाशित होते. वार्षिक सभासद शुल्क फक्त शंभर रुपये असलेले हे मासिक आपल्या ज्ञानात मोलाची भर घालते. महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ते गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत, समाजातील कोणत्याही घटकाला हा अंक म्हणजे माहितीचा स्त्रोत आहे,असे सांगून  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, जनतेने लोकराज्यचे जास्तीत जास्त वाचन करावे असे आवाहन केले तसेच यामुळे सर्वांना शासकीय योजना समजतील आणि त्यामुळे गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि पर्यायाने आपल्या राज्याचा विकास होईल, ही जाणीव जागृती व्हावी म्हणूनच हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आला आणि तो अशाच प्रकारे संपूर्ण राज्यातही राबविण्यात येत आहे,असे सांगितले.
      शिक्षणाधिकारी डॉ.शेख म्हणाले,हा उपक्रम असाच चालू राहील यात शंकाच नाही.याबरोबरच लोकराज्य प्रश्नमंजुषा हा उपक्रमही शाळा-महाविद्यालयांद्वारे राबविण्यात येणार आहे तसेच लोकराज्यशाळा, लोकराज्य महाविद्यालय, लोकराज्यग्राम,लोकराज्य संस्था,लोकराज्य कार्यालय या उपक्रमांद्वारेही अधिकाधिक लोकांनी लोकराज्यचे सभासद व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
       संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना या अभियानाला जिल्ह्यात सर्वदूर पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
              यावेळी संस्थेचे प्राचार्य सुधीर पडवळ यांनी या विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी लोकराज्य चे सभासद होतील आणि लोकराज्य विषयीचे विविध उपक्रमही या विद्यालयात सातत्याने राबविण्यात येतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमलाकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य सिध्देश्वर कोळी यांनी केले.
           हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, संचालक अजय अंबेकर, संचालक शिवाजी मानकर, लोकराज्यचे संपादक सुरेश वांदिले आणि त्यांची  टीम लोकराज्य, औरंगाबादचे प्रभारी संचालक आणि उपसंचालक  यशवंत भंडारे या सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आणि प्रत्यक्ष काम करताना शिक्षणाधिकारी डॉ. कलीम शेख, शिवाजी चंदनशिवे, सय्यद अख्तर, नारायण मुदगलवाड, विवेकानंद कदम आणि तानाजी खंडागळे या सर्वांचे अमोल सहकार्य लाभले.

Friday, 31 August 2018

हमाली व तोलाईच्या प्रचलित दरात वाढ करण्याबाबतच्या हरकती/आक्षेप नोंदवाव्यात -- जिल्हा उपनिबंधक


         जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांचे पत्र जा.क्र.पणन/हमालीवतोलाई/दरनिश्चित/2018 दिनांक 19 जुलै 2018 नुसार उस्मानाबाद जिल्हातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमाली व तोलाईच्या प्रचलित दरात वाढ करणे बाबत जिल्हयातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती यांना सदर दर निश्चिती बाबत अवगत करुन दरवाढी बाबत बाजार समित्यांकडून हरकती/आक्षेप मागविले आहेत.
 जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समिती यांना खालील प्रमाणे हमाली व तोलाईचे प्रचलित दरात वाढ करणे बाबत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांनी दरनिश्चिती केलेली आहे. या निश्चिती प्रमाणे हमालीचे प्रचलित प्रति 100 किलो रु.5.63/- असून अनुज्ञेय 25 % वाढी प्रमाणे वाढीव दर प्रति 50 किलो रु.3.51% प्रस्तावित आहे. त्याच प्रमाणे तोलाईचे प्रचलित दर प्रति 100 किलो रु.2.81/- असून अनुज्ञेय 25 % वाढी प्रमाणे वाढीव दर प्रती 50 किलो रु.1.75/- प्रस्तावित आहे. त्याबाबत बाजार समित्यांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. तरी बाजार समित्यांनी दिनांक 10 सप्टेंबर 2018 पर्यंत आपले हरकती/आक्षेप जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद या कार्यालयात नोंदवाव्यात  असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांनी केले आहे.

Thursday, 30 August 2018

जिल्ह्याच्या आकांक्षापूर्तीसाठी संधी म्हणून सर्वांनी मिळून काम करूया -- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


               उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाच्या अभ्यासानुसार आकांक्षीत जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्याच्या शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वच्छता या क्षेत्रातील काम चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे.म्हणूनच येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच जनतेनेही या गोष्टीकडे एक संधी म्हणून पाहावे, जेणेकरून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
           जिल्हा प्रशासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 व 30 ऑगस्ट या दोन दिवशी "उस्मानाबाद जीवन रेखा एक मुक्त चर्चा" या कार्यशाळेचे नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे ,या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाधिकारी श्री.नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार, महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, श्री. निपाणीकर, शिक्षणाधिकारी डॉ.शेख,जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार उपस्थित होते.
            श्री.गमे. यांनी यावेळी उस्मानाबाद जिल्हा नेमका आकांक्षीत जिल्हा म्हणून कसा निवडला गेला,या जिल्ह्याच्या कोणत्या घटकांवर विशेष काम करणे आवश्यक आहे, या बाबींवर उत्तम असे सादरीकरण केले.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची पाणी टंचाई, जमिनीची प्रत,भौगोलिक स्थान, पडणारा पाऊस या बाबींचा समावेश होता.
                  जिल्हाधिकारी श्री गमे यांनी सांगितले की, येथील शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यातही पडणाऱ्या पावसाचे बरेचसे पाणी म्हणजे जवळपास 58 टक्के पाणी कृष्णा पात्रात तर 42 टक्के गोदावरी पात्रात जाऊन मिळते.त्यापैकी इथे जवळपास 16 टक्के पाण्यावरच शेती होते. त्यातही जास्तीत जास्त पाणी उसाच्या शेतीला वापरले जाते.या जिल्ह्यात जवळपास 7 लाख 50 हजार हेक्‍टर शेती क्षेत्र आहे परंतु फक्त चाळीस हजार हेक्‍टर क्षेत्राला हे 16 टक्के पाणी वापरायला मिळते. 16 लाख 57 हजार 576 इतकी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात 728 गावे तर 621 ग्रामपंचायती आहेत. येथे स्थलांतरणाचेही प्रमाण जास्त आहे.गेल्या पंधरा वर्षांत सात वेळा दुष्काळ या जिल्ह्याने अनुभवला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आयोगाच्या 115 आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत आपला जिल्हा 51 व्या क्रमांकावर आहे.एक गोष्ट स्पष्ट आहे की, निती आयोगाने केलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा करावयाची असल्यास एकाक्ष होऊन फक्त कामच करावे लागेल,याला दुसरा पर्याय नाही त्यासाठी कामात सुधारणा करून जिल्ह्याला आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्याचे आवाहन शेवटी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी उपस्थितांना केले.
             या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना युनिसेफच्या अपर्णा देशपांडे यांनी केली तर सूत्रसंचालन डॉ. हनुमंत वडगावे यांनी केले. 
         या दोन दिवसीय कार्यशाळेत युनिसेफच्या तज्ञ मार्गदर्शकांकडून स्वच्छता, आरोग्य,शिक्षण, महिला व बालकल्याण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असून तद्नंतर गटागटाने शासकीय
अधिकारी,कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या गटचर्चा करणार आहेत. या गटचर्चेतून आपल्या दैनंदिन कामात कशा प्रकारे सुधारणा घडवून आणता येतील,लोकांचे प्रश्न कसे सोडविता येतील याबाबत विचारमंथन होऊन प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
      या कार्यशाळेस विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, युनिसेफचे तज्ञ मार्गदर्शक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.