Sunday, 17 September 2017

“महाराष्ट्र वार्षिकी 2017” चे प्रकाशन पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते संपन्न


उस्मानाबाद,दि.17:- "महाराष्ट्र वार्षिकी 2017" हा संदर्भग्रंथ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आला असून या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दिवाकर रावते व अन्य मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, कोषागार अधिकारी विशाल पवार, नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसिलदार सुजीत नरहरे तसेच इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
या पुस्तकाबाबत बोलताना पालकमंत्री रावते यांनी हे पुस्तक नागरिकांना,विद्यार्थ्यांना,शासकीय अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींनाही अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
या ग्रंथात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भूमी आणि लोक, शासनाचे सर्व विभागांची महत्त्वपूर्ण माहिती,  गत वर्षातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी,  तसेच सर्व जिल्ह्यांची थोडक्यात माहिती आणि महत्त्वाची माहिती या सदरात मंत्रिमंडळ, विधासभा, विधानपरिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीमंडळ, महत्त्वाचे निर्णय, योजना आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे या पुस्तकाचे  मुख्य संपादक आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रिमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य याबाबतच्या माहितीचाही समावेश आहे. 

थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेतूनच मराठवाडयाचा विकास पालकमंत्री दिवाकर रावते


उस्मानाबाद,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात  सहभागी झालेले  उस्मानाबाद जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले  आणि आजही  क्रियाशील आहेत. ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, आपले प्राणार्पण केले अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची  आम्हाला  सदैव जाणीव राहील. मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या  वर्धापनादिनाच्या मुख्य  ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले. 
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री. दिवाकर रावते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, कोषागार अधिकारी विशाल पवार, नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसिलदार सुजीत नरहरे, अभय मस्के, राहूल पाटील, राजकुमार माने, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागाचे प्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीलढ्यात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना निजामाचा तुरूंगवास भोगावा लागला, मात्र, हा मुक्तीदिन केवळ मराठवाड्यातच साजरा होतो. संपूर्ण महाराष्ट्राने या मुक्तीलढ्याचा सन्मान करावा, त्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्तीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुटी देण्यात यावी, अशी मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून या मुक्ती लढ्याचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा, अशीही मागणी केल्याचे श्री. रावते यांनी सांगितले.         
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान पथदर्शी उपक्रम जिल्हयात राबविला जात आहे त्याचबरोबर राज्य शासनाने आपत्ती जोखीम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रम या प्रकल्पासाठी उस्मानाबाद जिल्हयाची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड केली असल्यामुळे संभाव्य आपत्तीचे धोके कमी करुन विकासास चालना देण्यास मोठी मदत होणार आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.       
            प्रारंभी पोलीस पथकाकडून हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री श्री. दिवाकर रावते, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण  करण्यात आले. त्यानंतर पोलीस शस्त्र दलाने हवेत तीनवेळा बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शस्त्र सलामी दिली.
           यावेळी श्री. रावते यांनी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि नागरीक बंधु-भगिनींची सदिच्छा भेट घेवून त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चोले यांच्या हस्ते ध्वजारोहण


उस्मानाबाद,दि.17: येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.आर.चोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.