Friday, 9 October 2026

*सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा

*सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा धाराशिव,दि.८ ऑक्टोबर (जिमाका) नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ,पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याचा संदेश देतानाच आरोग्यदायी जीवनशैली,पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत सायकल व ई-बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय,बसवेश्वर चौक ते बार्शी रोड मार्गे निघून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप झाला.विविध शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवा,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७.३० वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, शासकीय सेवांविषयी जनजागृती करणे तसेच युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश होता. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नावरे,शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक,आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे,नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलतेने दखल घेतली जावी,ही लोकाभिमुख प्रशासनाची खरी ओळख आहे.सेवा संकल्प अभियान याच भावनेला बळ देणारे आहे.प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे,सेवा वितरणात गतिमानता आणणे आणि शासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे,या बाबींना अभियानाच्या माध्यमातून महत्त्व देण्यात येत आहे. *चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग ; नव्या पिढीकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश* या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्ह्यातील विविध शाळांमधील जवळपास ४०० विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग होता.विद्यार्थ्यांचा उत्साह, युवकांची ऊर्जा आणि उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. शालेय जीवनातच आरोग्य,पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत.त्यामुळे अशा उपक्रमांतून त्यांना केवळ सायकल चालविण्याचा आनंद मिळत नाही,तर सार्वजनिक हितासाठी एकत्र येण्याची प्रेरणाही मिळते. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा छोटासा प्रयत्नही महत्त्वाचा असतो. सायकलचा वापर,पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य आणि शासकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या बाबींचे महत्त्व या रॅलीच्या निमित्ताने दिसून आले. या अभियानांतर्गत आयोजित सायकल व ई-बाईक रॅलीने शासकीय सेवा,सामाजिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणला.नागरिकांना सेवा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी आहे,हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या सायकल व ई-बाईक रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे,अक्षय बिरादार,क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे,विश्वास खंदारे,डिंपल ठाकरे,जान्हवी पेठे,संपदा मोरे,किशोर भोकरे आणि सुरेश कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. सेवेचा संकल्प,आरोग्याचा जागर आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार या तिन्ही बाबींचा संदेश देणारी ही रॅली विद्यार्थी व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लक्षवेधी ठरली.प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्र येऊन समाजहितासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले. ००००००००००००

Thursday, 8 October 2026

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल *७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील पथकाकडून यशस्वी मूल्यांकन*

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल *७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील पथकाकडून यशस्वी मूल्यांकन* धाराशिव, दि.८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्ह्यातील एकूण ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे,अशा एकूण १०१ आरोग्य संस्थांचे राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी किर्ती कीरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आरोग्य विभागाने हि महत्वाची व मोलाची कामगिरी केली आहे, अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यात एकमेव जिल्हा आहे. या कामगिरीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांचे योग्य नियोजन व त्यासाठीचा पाठपुरावा आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे,रुग्णांना सुरक्षित व प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देणे, तसेच आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ,औषधसाठा, उपकरणे, स्वच्छता,संसर्ग प्रतिबंध व विविध आजारावर नियंत्रण आणून रुग्णाभिमुख सेवा यांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांची विविध निकषांच्या आधारे काटेकोर तपासणी व मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये जिल्हा स्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय पातळीवरील अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली जाते तपासणी सूचीनुसार आरोग्य संस्थेतील पायाभूत सुविधा,उपलब्ध मनुष्यबळ, औषधे व वैद्यकीय साहित्य, प्रयोगशाळा सेवा,रुग्णसेवा, स्वच्छता व जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण,रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, नोंदवही व अभिलेख व्यवस्थापन तसेच आरोग्य सेवांची एकूण गुणवत्ता आदी बाबींची पाहणी केली जाते. जिल्ह्यातील संबंधित आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच आवश्यक कागदपत्रे व नोंदी अद्ययावत करणे,स्वच्छता व परिसर व्यवस्थापन,औषधे व उपकरणांची उपलब्धता,रुग्णांच्या समाधानावर आधारित सेवा आणि विविध आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून राष्ट्रीयस्तरावरील पथकाने संबंधित आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले.मूल्यांकनामध्ये निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता केल्याचे आढळून आल्याने ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र मिळणे ही धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी निश्चितच अभिमानाची आणि उल्लेखनीय बाब आहे.या यशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होत आहे. या यशामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,डॉ. कुलदीप मिटकरी,डॉ.विनयशील कुलकर्णी,डॉ.मारुती कोरे, डॉ.सुशील चव्हाण,डॉ.पंकज शिनगारे,जीवन कुलकर्णी, किशोर गवळी,किशोर तांदळे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,परिचारिका, प्रयोगशाळा कर्मचारी,आशा स्वयंसेविका तसेच इतर सर्व अधिकारी-कर्मचायांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आरोग्य विभागाच्या विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे.राष्ट्रीय स्तरावरील मिळालेले प्रमाणपत्र व त्या सोबतच आरोग्य संस्थांना बक्षिसापोटी मिळणारा निधी यामुळे संबंधित आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यास मदत होईल तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आरोग्य संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी अधिक झाली असून भविष्यातही या गुणवत्तेचा सातत्याने दर्जा राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांना वेळेवर, सुलभ,सुरक्षित आणि रुग्णाभिमुख आरोग्य सेवा देणे हा आरोग्य विभागाचा केंद्रबिंदू राहणार आहे. जिल्ह्यातील १०१ आरोग्य संस्थांना मिळालेले राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र हे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तावाढीचे द्योतक असून,गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत' पोहोचविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. 00000000

*जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे वाढते प्रमाण : नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन*

*जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे वाढते प्रमाण : नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन* धाराशिव,दि.८ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डासांची उत्पत्ती रोखणे,घरात डासांचा प्रवेश टाळणे आणि ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे,या उपाययोजनांमुळे कीटकजन्य आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होते.घरातील पाण्याची भांडी,ड्रम,टाक्या तसेच परिसरातील पाणी साठे याकडे नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.पाणी वाहते करावे. गटारे नाल्या स्वच्छ कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात डास उत्पती होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशिल कुलकर्णी यांनी केले आहे. *खिडक्यांना जाळ्या बसवा* डासांचा घरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.दरवाजे व खिडक्या शक्यतो बंद ठेवून घरात डासांचा वावर कमी करण्याची काळजी घ्यावी. *झोपताना मच्छरदाणीचा वापर करा* रात्री झोपताना मच्छरदाणीचा नियमित वापर करावा.विशेषतः लहान मुले,वृद्ध आणि आजारी व्यक्तींना डासांपासून संरक्षण मिळेल याची दक्षता घ्यावी. *आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा* आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा.या दिवशी घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी,ड्रम व टाक्या रिकाम्या करून आतून घासून स्वच्छ कराव्यात.घराच्या परिसरात कुठेही पाणी साचले असल्यास ते तातडीने काढून टाकावे. *सेप्टिक टँकच्या पाईपला जाळी लावा* सेप्टिक टँकच्या पाईपला योग्य प्रकारे जाळी बसवावी.या माध्यमातून डासांची उत्पत्ती होणार नाही,याची दक्षता घ्यावी. घराभोवती अनावश्यक पाणी साचणार नाही,याचीही काळजी घ्यावी. *कोणताही ताप अंगावर काढू नका* ताप,अंगदुखी,डोकेदुखी,थंडी वाजणे,अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.कोणताही ताप अंगावर काढू नका.वेळेत तपासणी व उपचार घेण्यासाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. *स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका* ताप आल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत.तसेच केवळ औषध दुकानातून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.तापाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासणी व उपचार करून घ्यावेत. *नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा* कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे.प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात व परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही,यासाठी नियमित पाहणी करावी.पाणी साठविण्याची भांडी झाकून ठेवावीत आणि अनावश्यक पाणी साठे नष्ट करावेत.डासांची उत्पत्ती रोखा,कीटकजन्य आजार टाळा आणि निरोगी धाराशिवसाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 0000000

Wednesday, 7 October 2026

जलजीवन मिशनची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करा ; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई* * ९० टक्क्यांहून अधिक प्रगतीची २५ कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश * अपूर्ण कामांमुळे गावाला टँकर लागल्यास खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करणार

*जलजीवन मिशनची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करा ; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई* * ९० टक्क्यांहून अधिक प्रगतीची २५ कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश * अपूर्ण कामांमुळे गावाला टँकर लागल्यास खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करणार धाराशिव दि.७ ऑक्टोबर ( जिमाका) ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमधील अपूर्ण कामांना आता गती देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे,अपूर्ण कामामुळे एखाद्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहणार असून,टँकरसाठी येणारा खर्चही संबंधित ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय,येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीस जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कामे असलेले २३ कंत्राटदार,मुख्य कार्यकारी अधिकारी, उपअभियंता,कनिष्ठ अभियंता, TPI, सहाय्यक लेखा तसेच PMC WAPCOSचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत प्रत्येक कामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. *५९४ पैकी ३४६ कामे पूर्ण; २४८ प्रगतिपथावर* ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे जलजीवन मिशनअंतर्गत एकूण ५९४ कामे आहेत.त्यापैकी ३४६ कामे पूर्ण झाली असून,२४८ कामे प्रगतिपथावर आहेत.प्रगतीनुसार ० ते २५ टक्के टप्प्यात २२ योजना, २५ ते ५० टक्के टप्प्यात ३९ योजना,५० ते ७५ टक्के टप्प्यात ९३ योजना,७५ ते ९९ टक्के टप्प्यात ९४ योजना,तर १०० टक्के पूर्ण झालेली ३४६ कामे आहेत. याच कालावधीत तांत्रिक बदल अथवा योजना सुधारित करणे आवश्यक असलेली १९९ कामे आहेत.त्यापैकी १२० कामांना शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. बैठकीत कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा देण्यात आली. ८० ते ९० टक्के प्रगती झालेली ४४ कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत,तर ९० ते १०० टक्क्यांच्या टप्प्यातील २५ कामे आठ दिवसांतच पूर्ण करावीत, असे सक्त आदेश देण्यात आले. पाणीपुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचूनही ते अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये,यासाठी प्रशासनाने ही कालमर्यादा निश्चित केली आहे. *काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत* निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.आदेशानुसार काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर निविदेतील अटी व शर्तींनुसार कठोर कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कामांच्या गुणवत्तेबरोबरच ती निर्धारित वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे असून,ग्रामीण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये,यासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांनी जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपूर्ण कामामुळे टँकर लागला तर जबाबदारी ठेकेदाराची जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरू असलेल्या अथवा काम अपूर्ण असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेण्याचे स्पष्ट केले आहे.अशा गावाला टँकरची आवश्यकता भासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्चही संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल,अशा सक्त सूचना बैठकीत देण्यात आल्या. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ एखाद्या योजनेच्या कामाच्या टक्केवारीपुरता मर्यादित राहत नाही.एखादे काम रखडले की त्याचा थेट परिणाम गावातील कुटुंबांवर होतो.घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्यास महिलांना पाण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो,तर पाणीटंचाईच्या काळात संपूर्ण गावाची चिंता वाढते.त्यामुळे जलजीवन मिशनमधील प्रत्येक अपूर्ण काम लवकर पूर्ण करून गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांना आणखी पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये आणि जलजीवन मिशनचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा,यासाठी प्रगतिपथावरील कामांवर आता प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे. ****************

*दुष्काळाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन गावात* * आठही तालुक्यांसाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी * दर आठवड्याला टंचाईग्रस्त गावात मुक्काम * पीक पंचनाम्यांपासून पाणी-चारा,रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर लक्ष * गावनिहाय नोडल अधिकारी २४ तास उपलब्ध राहणार

*दुष्काळाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन गावात* * आठही तालुक्यांसाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी * दर आठवड्याला टंचाईग्रस्त गावात मुक्काम * पीक पंचनाम्यांपासून पाणी-चारा,रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर लक्ष * गावनिहाय नोडल अधिकारी २४ तास उपलब्ध राहणार धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) पावसाची तूट, करपलेली पिके,घटणारे जलसाठे आणि पुढील काळात निर्माण होऊ शकणारी पाणी व चारा टंचाई यामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांना प्रशासनाचा थेट आधार मिळावा,यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक दुष्काळ व्यवस्थापन आराखडा कार्यान्वित केला आहे. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून,या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून केवळ अहवाल घेण्याऐवजी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन परिस्थिती पाहण्याचे,नागरिकांशी संवाद साधण्याचे आणि टंचाईग्रस्त गावात दर आठवड्याला एकदा मुक्काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. सन २०२६ च्या खरीप हंगामात जूनपासून आजतागायत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाच्या निर्देशानुसार पर्जन्याची तूट व अन्य घटकांमुळे बाधित झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अधिकारी व कार्यालयांना देण्यात आले असून,क्षेत्रीय स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. एल निनोमुळे कमी झालेल्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर सध्या पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आणि संरक्षण करण्याबरोबरच पाटबंधारे प्रकल्प, जलाशय,बंधारे व संबंधित जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखणे आवश्यक झाले आहे.त्यासाठी उपविभागीय अधिकारी,तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी तथा पंचायत समिती कार्यालयांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कमी पावसामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही प्रशासनाने गृहीत धरली आहे.त्यामुळे पशुधन विकास अधिकारी,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,तहसीलदार आणि सेवाभावी संस्था यांनी तालुकास्तरावर समन्वयातून पूर्वतयारी करण्याचे निर्देश आहेत. *दुष्काळी भागांसाठी १२ उपाययोजना व सवलती* मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात ‘ट्रिगर-१ (प्रथम कळ)’ लागू झालेल्या तालुक्यांसाठी विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.त्यात जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात सूट,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे,आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर,टंचाई जाहीर झालेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे,शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही अशी व्यवस्था करणे, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करणे,जलसंधारणाची कामे सुरू करणे,तसेच यापूर्वीच्या शासन निर्देशांनुसार पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे या १२ बाबींचा समावेश आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषिपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपांना संबंधित सूट लागू राहणार आहे.या सर्व उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना दुष्काळाच्या दाहकतेपासून संरक्षण देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. *आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी खरीप पिकांच्या पंचनाम्यांची तपासणी, भरारी पथकासह पाटबंधारे प्रकल्प, जलाशय आणि जलस्रोतांना भेटी देऊन अनधिकृत पाणी उपसा रोखणे,संभाव्य चारा टंचाईच्या दृष्टीने पूर्वतयारी करणे तसेच संबंधित तालुक्यांना वेळोवेळी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तुळजापूर तालुका - अपर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील (मो. ९८५००४१२३२),धाराशिव तालुका - जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे (मो.९४२३४६५९८७), भूम तालुका - जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)तुकाराम भालके (मो. ९०११०९५७३३), कळंब तालुका - उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रविण धरमकर (मो. ९४२२७४४००७), वाशी तालुका - उपजिल्हाधिकारी म.प्र.-२, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोष राऊत (मो. ९०७५९०८८६९),परंडा तालुका - उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती स्वाती शेडे (मो. ९८२२५४०२३७),उमरगा तालुका - उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती.अरुणा गायकवाड (मो. ७३५००१५०७९) तर लोहारा तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आणि मनोज राऊत (मो. ९०२१४४३१८५) यांचा आदेशातील तपशीलानुसार समावेश आहे.या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमित कार्यालयीन जबाबदाऱ्यांसह दुष्काळ व्यवस्थापनाशी संबंधित अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्यात,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. *पंचनाम्यांची तपासणी ते अनुदानवाटपापर्यंत लक्ष* समन्वय अधिकाऱ्यांनी जूनपासून आजपर्यंत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे बाधित तालुक्यांतील खरीप पिकांच्या पंचनाम्यांच्या कामकाजाची रीतसर तपासणी करावी. आवश्यक अहवाल शासनाला वेळेत सादर करावा.नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या पीक नुकसान अनुदान वाटपासाठी आवश्यक याद्या वेळेत पूर्ण करून शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान संबंधित शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचेल, याचीही दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची आठवड्यातून एकदा तहसील कार्यालय स्तरावर बैठक घेऊन दुष्काळविषयक उपाययोजना, पूर्वतयारी,पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा बाबनिहाय आढावा घेतला जाणार आहे.बैठकीत गावनिहाय पशुधनाची संख्या,उपलब्ध चारा,हिरवा व सुका चारा,चारा डेपो किंवा चारा छावणीची आवश्यकता आणि पशुधनासाठी उपलब्ध पाण्याचा आढावा घ्यावा.त्याचबरोबर गावनिहाय पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,विहिरी व बोअरवेलमधील पाणीपातळी, जलस्रोतांची सद्यस्थिती,टँकरची आवश्यकता आणि टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा तपासून टंचाई निवारण उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. *रोजगारासोबत मृद व जलसंधारणावर भर* शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून पाणी,चारा,शेती,पशुधन, रोजगार,पिकांची स्थिती,नुकसान नोंदणी आणि इतर मदत व उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.रोजगाराची साधने जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची कामे घेताना मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश आहेत. गावांतील शासकीय जलस्रोत,विहिरी, बोअरवेल,तलाव,बंधारे आणि पाझर तलावांची स्थिती तपासून त्यांच्या वापराचे आणि संरक्षणाचे नियोजन करावे.पाणी किंवा चाराटंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या बाबींची आधीच कल्पना घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात.नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांची नोंद घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधत त्यांचे तातडीने निराकरण करावे.नागरिकांना प्रशासनाकडून उपलब्ध होणाऱ्या मदतीची स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ माहिती देऊन अनावश्यक अफवा अथवा गैरसमज निर्माण होणार नाहीत,याचीही दक्षता घेतली जाणार आहे. *सर्व यंत्रणा एका सूत्रात* ग्रामपंचायत,महसूल विभाग,पंचायत समिती,कृषी विभाग,पशुसंवर्धन विभाग,जलसंपदा विभाग,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,महावितरण आणि अन्य संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून एकत्रित दुष्काळ व्यवस्थापन करावे,असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः पाणीटंचाई,चाराटंचाई, पशुधनाच्या अडचणी,रोजगाराची गरज,पिकांची स्थिती अथवा अन्य गंभीर समस्यांना सामोरे जाणाऱ्या कुटुंबांची स्वतंत्र माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. *आठवड्यातून एकदा गावातच मुक्काम* दुष्काळी परिस्थितीत कागदावरील आकडेवारी आणि प्रत्यक्ष गावातील वास्तव यामधील अंतर कमी करण्यासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांना थेट गावात मुक्काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुकास्तरावरील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने टंचाईग्रस्त गावांची निवड करून दर आठवड्यातून एकदा त्या गावात सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मुक्काम करावा,असे आदेशात म्हटले आहे. या मुक्कामादरम्यान गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी,शेतकरी,महिला, पशुपालक,ज्येष्ठ नागरिक आणि अन्य घटकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत.मुक्कामात एखादी गंभीर बाब निदर्शनास आल्यास त्याच दिवशी सक्षम प्राधिकाऱ्याला अहवाल अथवा माहिती देऊन तातडीची कार्यवाही सुनिश्चित करण्याचे निर्देश आहेत. पाऊस कमी झाल्याने शेतातील पीक हातातून जाण्याची भीती असलेला शेतकरी असो,जनावरांसाठी उद्याचा चारा कुठून आणायचा या चिंतेत असलेला पशुपालक असो किंवा गावातील पिण्याच्या पाण्याची चिंता असलेले कुटुंब अशा नागरिकांपर्यंत प्रशासन प्रत्यक्ष पोहोचावे,हा या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. मुक्कामादरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची नागरिकांना माहिती द्यावी.‘दुष्काळी परिस्थितीत शासन व प्रशासन नागरिकांच्या पाठीशी असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी प्रशासनाशी संपर्क साधावा,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्याचेही आदेश आहेत. *प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी ; २४ तास संपर्क* प्रत्येक गावासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांचा मोबाइल क्रमांक सर्व गावकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.संबंधित नोडल अधिकारी नागरिकांसाठी पूर्णवेळ (२४ × ७) उपलब्ध राहतील.नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी आणि संबंधित विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन करावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच २५ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयातील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासून क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत योग्य समन्वय राहील आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल,याची जबाबदारीही समन्वय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. *दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल* नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी तालुका व गावभेटींचा संक्षिप्त अहवाल, प्रत्यक्ष आढळलेल्या समस्या, त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रलंबित बाबींची माहिती दर सोमवारी सकाळी १० वाजता समक्ष उपस्थित राहून सादर करावी लागणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही,याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कामकाजात निष्काळजीपणा अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल,असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. *************

*चारा टंचाईवर मात करण्यासाठी बगॅस-मळीपासून पशुखाद्याचा पर्याय* जिल्हाधिकाऱ्यांकडून पशुसंवर्धन विभागासह ढोकी साखर कारखान्याची पाहणी शास्त्रोक्त प्रक्रिया,प्रयोगशाळा तपासणी अन् शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे निर्देश

*चारा टंचाईवर मात करण्यासाठी बगॅस-मळीपासून पशुखाद्याचा पर्याय* जिल्हाधिकाऱ्यांकडून पशुसंवर्धन विभागासह ढोकी साखर कारखान्याची पाहणी शास्त्रोक्त प्रक्रिया,प्रयोगशाळा तपासणी अन् शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे निर्देश धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईवर मात करताना पशुधनाला सुरक्षित,पौष्टिक आणि किफायतशीर आहार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक साधनसंपत्तीचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर करण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ६ ऑक्टोबर रोजी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत ढोकी येथील साखर कारखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन साखर निर्मितीतील उपउत्पादने असलेल्या बगॅस (उसाची चिपाडे) आणि मोलॅसिस (मळी) यावर योग्य प्रक्रिया करून त्यांचा जनावरांसाठी पूरक चारा म्हणून प्रभावी वापर करण्याच्या शक्यतांची सविस्तर पाहणी केली. दुष्काळसदृश परिस्थितीत पशुपालकांसमोर जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो.अशा परिस्थितीत उपलब्ध स्थानिक संसाधनांचा शास्त्रीय आणि सुरक्षित पद्धतीने उपयोग झाल्यास पशुधन जगविण्यासह दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यासही मोठा आधार मिळू शकतो.या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांमधून उपलब्ध होणाऱ्या बगॅस आणि मोलॅसिसचा पशुखाद्यासाठी उपयोग करण्याच्या शक्यता प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत.केवळ कोरडा बगॅस जनावरांना पचण्यास कठीण असतो आणि त्यातून नगण्य पोषण मिळते.मात्र, पशुवैद्यकीय शास्त्रातील तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यावर युरिया,मोलॅसिस व खनिज मिश्रणाची (Urea Molasses Enriched Straw / UMMB) प्रक्रिया केल्यास त्यातील तंतुमय घटकांची पचनक्षमता लक्षणीयरीत्या वाढते.मोलॅसिसमुळे ऊर्जेची व चवीची पूर्तता होते,तर युरियामुळे प्रथिनांचे प्रमाण सुधारते.या तांत्रिक प्रक्रियेची प्रत्यक्ष व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कारखान्यातील बगॅस डेपो तसेच मोलॅसिस साठवणूक विभागाची बारकाईने पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले.पशुसंवर्धन विभागाने ढोकी साखर कारखान्याशी समन्वय साधून बगॅस आणि मोलॅसिसवर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे एक मॉडेल तातडीने कार्यान्वित करावे.या प्रक्रियेतून तयार होणारा चारा पशुधनासाठी सुरक्षित आणि पोषणमूल्यांच्या दृष्टीने उपयुक्त असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची वैज्ञानिक पडताळणी करण्यावर विशेष भर देण्यात यावा,असे श्री . पुजार यांनी स्पष्ट केले. प्रक्रिया केलेल्या चाऱ्यातील पचनक्षमता,पोषणमूल्ये विशेषतः टीडीएन (TDN), क्रूड प्रोटीन (Crude Protein) तसेच विषबाधा प्रतिबंधक मानकांची (Toxicity Safety) जिल्हा व विभागीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून काटेकोर तपासणी करून घ्यावी.आवश्यक सुरक्षितता आणि गुणवत्ता निश्चित झाल्यानंतरच त्याचा पशुपालकांसाठी व्यापक वापर करण्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करावे,असे निर्देश देण्यात आले. या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ कारखाना अथवा प्रशासकीय पातळीपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष पशुपालकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.पशुपालकांना आपल्या शेतावरच उपलब्ध बगॅस व मळीवर सोप्या पद्धतीने प्रक्रिया करता यावी,यासाठी पशुसंवर्धन विभागाने ग्रामपातळीवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करावीत. प्रक्रियेची योग्य पद्धत,प्रमाण, सुरक्षितता आणि पशुधनाला देण्याची पद्धत याबाबत जनजागृती करावी,असेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले. चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना बगॅस आणि मोलॅसिस माफक व नियंत्रित दरात उपलब्ध व्हावे,यासाठी साखर कारखान्यासोबत आतापासूनच पूर्वतयारीचे धोरण निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.उपलब्ध साधनसंपत्ती, त्याची गरज,वाहतूक,साठवणूक आणि पशुपालकांपर्यंत सुलभ पुरवठा या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करण्यावर भर देण्यात आला. चारा टंचाईच्या काळात पशुधन जगवणे आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.साखर कारखान्यातील बगॅस आणि मळीचा शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास स्थानिक पातळीवरच शाश्वत व स्वस्त चारा उपलब्ध होईल,असे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले. चारा टंचाईच्या संभाव्य संकटाला सामोरे जाताना उपलब्ध स्थानिक संसाधनांकडे केवळ उपउत्पादन म्हणून न पाहता त्यांचे पशुधनासाठी उपयुक्त साधनात रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे. शास्त्रोक्त प्रक्रिया,सुरक्षिततेची प्रयोगशाळेत खात्री आणि हे तंत्रज्ञान थेट पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याची सांगड यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील पशुपालकांना चारा टंचाईच्या काळात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.मुळे,सहाय्यक आयुक्त,पशुधन विकास अधिकारी तसेच साखर कारखान्याचे समन्वयक उपस्थित होते. ****************

कुष्ठरोग शोध मोहिमेत १.२८ लाख नागरिकांची तपासणी* * ६७२ संशयित आढळले * ४८० जणांची तपासणी पूर्ण * सहवासित तपासणीत तीन असंसर्गिक * तर फोकस लेप्रसी कॅम्पेनमध्ये एक संसर्गिक रुग्ण आढळला

*कुष्ठरोग शोध मोहिमेत १.२८ लाख नागरिकांची तपासणी* * ६७२ संशयित आढळले * ४८० जणांची तपासणी पूर्ण * सहवासित तपासणीत तीन असंसर्गिक * तर फोकस लेप्रसी कॅम्पेनमध्ये एक संसर्गिक रुग्ण आढळला धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) कुष्ठरोगाबाबत समाजात असलेली भीती, गैरसमज आणि कलंक दूर करण्याबरोबरच रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.दि.१६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सहवासित तपासणी व फोकस लेप्रसी कॅम्पेन अंतर्गत २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातून ६७२ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ही विशेष कुष्ठरोग जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मागील पाच वर्षांत शोधण्यात आलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची तपासणी या कालावधीत करण्यात येत आहे. तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये संसर्गिक रुग्ण,१४ वर्षांखालील बालरुग्ण तसेच विकृती ग्रेड-१ व ग्रेड-२ चे रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये फोकस लेप्रसी कॅम्पेन सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज आणि कलंक दूर व्हावा, नागरिकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि संशयित रुग्णांचे लवकर निदान व्हावे,या उद्देशाने विशेष जनजागृती व कुष्ठरोग तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे,प्रतिबंध, निदान आणि उपचार याबाबत माहिती देण्यात येत आहे.तालुकानिहाय २५ हजार ५४१ घरांतील नागरिकांची तपासणी फोकस लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ५४१ घरांतील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव तालुक्यात ६ हजार ९६४ घरांतील ३५ हजार ८२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यातून १०३ संशयित शोधण्यात आले असून, ७२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.तुळजापूर तालुक्यात ४ हजार ५८९ घरांतील २३ हजार ४४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये २५३ संशयित आढळून आले असून, त्यापैकी २०१ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. वाशी तालुक्यात २ हजार ५२४ घरांतील १२ हजार १७० नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १५ संशयित शोधण्यात आले असून,सर्व १५ संशयितांची तपासणी पूर्ण झाली आहे.लोहारा तालुक्यात १ हजार ८३९ घरांतील ९ हजार १३६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये २७ संशयित शोधण्यात आले असून,सर्व २७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. भूम तालुक्यात २६५८ घरांतील १३ हजार १७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये ८२ संशयित आढळून आले असून, ३२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.परंडा तालुक्यात १२० घरांतील ५७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ४ संशयित शोधण्यात आले असून,चारही संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. कळंब तालुक्यात १ हजार ४८९ घरांतील ७ हजार ४३९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३९ संशयित शोधण्यात आले असून,३७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.तर उमरगा तालुक्यात ५ हजार ३५८ घरांतील २६ हजार ६८२ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १४९ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ९२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण २५ हजार ५४१ घरांतील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, ६७२ संशयित शोधण्यात आले आहेत. त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. १४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ जणांची तपासणी दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण १४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ सहवासितांची तपासणी करण्यात आली आहे.या तपासणीत तीन नवीन पी.बी. (असंसर्गिक) रुग्ण शोधून काढण्यात आले आहेत. फोकस लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ४६४ लोकसंख्येपैकी १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.या तपासणीत ६७२ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.त्यातून एक नवीन एम.बी.(MB-संसर्गिक) रुग्ण शोधून काढण्यात आला आहे. *ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका* त्वचेवर संवेदना कमी झालेला,न खाजणारा,न दुखणारा फिकट, पांढरा किंवा लालसर बधिर चट्टा दिसणे,त्या भागातील केस व घाम कमी होणे,हात-पायांमध्ये मुंग्या येणे अथवा संवेदना कमी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे तसेच चेहरा तेलकट दिसणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. *कुष्ठरोग उपचाराने पूर्णपणे बरा होतो* कुष्ठरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.संसर्गिक रुग्णाला १२ महिने,तर असंसर्गिक रुग्णाला सहा महिने उपचार दिले जातात.कुष्ठरोगाचे निदान आणि बहुविध औषधोपचार (MDT) शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. वेळेवर निदान होऊन उपचार सुरू झाल्यास अपंगत्व टाळण्यास मदत होते. अभियानाच्या माध्यमातून गावोगावी तसेच वॉर्डनिहाय जनजागृती करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची तपासणी,निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी कुष्ठरोगाबाबत भीती किंवा गैरसमज बाळगू नयेत. संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.‘कुष्ठरोग लपवू नका; लवकर तपासणी करून घ्या,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना सहकार्य करावे आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लावावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव डॉ.सतीश हरिदास आणि सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (कुष्ठरोग),धाराशिव डॉ.एम.आर. कोरे यांनी केले आहे. ****************

*नवरात्रोत्सवात तुळजापुरातील वीजपुरवठा अखंडित ठेवा* * २४ तास नियंत्रण कक्षासह अधिकारी-वायरमन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश * महोत्सवापूर्वी विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्याच्या सूचना

*नवरात्रोत्सवात तुळजापुरातील वीजपुरवठा अखंडित ठेवा* * २४ तास नियंत्रण कक्षासह अधिकारी-वायरमन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश * महोत्सवापूर्वी विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्याच्या सूचना धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने शहरातील विद्युत व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.महोत्सव कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही,याची दक्षता घेण्यासह २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.११ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे.या काळात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल होणार असून भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता विद्युत व्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. *वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता* नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा अखंडित राहील,याची विशेष दक्षता घेण्यात यावी.अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास मोठ्या गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक पूर्वनियोजन करावे. विद्युत व्यवस्थेसंदर्भातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात यावा.तसेच संबंधित अधिकारी आणि वायरमन हेही २४ तास उपलब्ध राहतील,अशा पद्धतीने नियोजन करून त्यांची नियुक्ती करण्यात यावी. *महोत्सवापूर्वी संपूर्ण विद्युत यंत्रणेची तपासणी* महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने तुळजापूर शहरातील सर्व ठिकाणांची पाहणी करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती पूर्ण करण्यात यावी. ट्रान्सफॉर्मरवर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक भार पडणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी.फ्युज व्यवस्थित ठेवावेत.आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर (स्पेअर) उपलब्ध ठेवण्यात यावेत. शहरातील कोणत्याही भागात विद्युत केबल उघड्यावर राहणार नाहीत,याचीही दक्षता घेण्यात यावी.नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल (मेंटेनन्स) पूर्ण करून घ्यावी.यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड होऊन जीवित अथवा वित्तहानी होणार नाही,यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी. *धोकादायक वायर,केबल व पोल तातडीने दुरुस्त करा* तुळजापूर शहरातील विजेच्या केबल किंवा विद्युत बॉक्स उघडे राहणार नाहीत तसेच ते नागरिक आणि भाविकांसाठी धोकादायक ठरणार नाहीत,याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शहरात धोकादायक स्थितीत असलेल्या वायर,केबल, विद्युत पोल तसेच विद्युत यंत्रणेतील अन्य त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात,असे निर्देश देण्यात आले आहेत. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांची सुरक्षितता आणि सुरळीत दर्शन व्यवस्था अबाधित राहण्यासाठी अखंडित व सुरक्षित विद्युत पुरवठा महत्त्वाचा आहे.त्यामुळे महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवून यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही,यासाठी संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ****************

*महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत १४ ऑक्टोबरला उमरग्यात* प्रलंबित महसुली वादांना सामोपचाराचा मार्ग ; तडजोडीस पात्र प्रकरणांचा होणार जलद निपटारा

*महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत १४ ऑक्टोबरला उमरग्यात* प्रलंबित महसुली वादांना सामोपचाराचा मार्ग ; तडजोडीस पात्र प्रकरणांचा होणार जलद निपटारा धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र प्रकरणे परस्पर संमतीने आणि सामोपचाराने निकाली काढून पक्षकारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचविण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुधवार,१४ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा येथे महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने व सामोपचाराने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. महसूल विभागातील प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे संबंधित पक्षकारांचा वेळ,श्रम आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर होतो.त्यामुळे पक्षकारांची परस्पर संमती आणि तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटवून प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या निर्देशानुसार आणि अपर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय,उमरगा येथे महसूल लोकअदालत होणार आहे. तडजोडीस पात्र प्रकरणांचा समावेश उपविभागीय अधिकारी,उमरगा यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र महसूलविषयक प्रकरणांचाही या महसूल लोकअदालतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधित स्तरावर प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांनी परस्पर संमतीने आणि सामोपचाराने आपले वाद मिटविण्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. उमरगा उपविभागातील तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोड होऊ शकते,अशी प्रकरणेही महसूल लोकअदालतीमध्ये घेण्यात यावीत, असे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. संबंधित पक्षकारांची आपल्या प्रकरणातील वाद सामोपचाराने मिटविण्याची तयारी असल्यास त्यांनी संबंधित तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.आपले प्रकरण महसूल लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी सादर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.दोन्ही पक्षकारांची संमती असल्यास प्रकरणाच्या स्वरूपानुसार नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून त्याचा निपटारा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी,उमरगा यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र प्रकरणांतील पक्षकारांनीही महसूल लोकअदालतीचा लाभ घेत आपली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूल लोकअदालतीमध्ये अधिकाधिक प्रकरणे तडजोडीसाठी यावीत,यासाठी उपविभागीय अधिकारी स्तरावर जिल्हा वकील मंडळाची बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीत लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याबाबत विधिज्ञ मंडळींनाही आवाहन करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा येथे होणाऱ्या महसूल लोकअदालतीत उपविभागीय अधिकारी स्तरावरील तडजोडीस पात्र प्रकरणे घेऊन ती संबंधित पक्षकारांच्या परस्पर संमतीने निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. वेळ आणि खर्चाची होणार बचत महसुली वाद न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास पक्षकारांना वारंवार कार्यालयात जावे लागते.त्यासाठी वेळ,श्रम आणि पैसा खर्च होतो.मात्र,दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्यास लोकअदालतीच्या माध्यमातून वादाला लवकर पूर्णविराम मिळू शकतो. त्यामुळे पक्षकारांना दिलासा मिळण्याबरोबरच महसूल न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यासही हातभार लागणार आहे. त्यामुळे उमरगा उपविभागातील उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र प्रकरणांतील सर्व संबंधित पक्षकारांनी परस्पर संमतीने व सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेऊन महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी, उमरगा दत्तू शेवाळे यांनी केले आहे. ****************

* महिला-पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप * निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यात रूपांतर * अझोला,हायड्रोपोनिक्स आणि काटेविरहित निवडुंगाचे प्रात्यक्षिक

*वृत्त क्र.,८४७* *दि.७ ऑक्टोबर २०२६* *दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी माळकरंजातून चारा व्यवस्थापनाचा नवा मार्ग* ६० महिलांना ‘BHN-11’चे ३० हजार ठोंबे वाटप
महिला-पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप * निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यात रूपांतर * अझोला,हायड्रोपोनिक्स आणि काटेविरहित निवडुंगाचे प्रात्यक्षिक धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) पावसाने ओढ दिली की शिवारातील हिरवाईबरोबरच पशुपालकांच्या चिंतेतही भर पडते.जनावरांसाठी वर्षभर चारा कुठून आणायचा,उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा उपयोग कसा करायचा आणि मर्यादित पाण्यात हिरवा चारा कसा पिकवायचा, हे प्रश्न दुष्काळसदृश परिस्थितीत अधिक तीव्र होतात.याच प्रश्नांवर प्रत्यक्ष उपाय सांगण्यासाठी माळकरंजा येथे मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी चारा लागवड,निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच योग्य चारा व्यवस्थापनाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.बायफ संस्थेचे अध्यक्ष डॉ.मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,कळंब तहसीलदार श्री.हेमंत ढोकले, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.दीपक मुळे,डॉ.हनुमंत गायके,डॉ.बायस, डॉ.वैभव पाटील,डॉ.पांडुरंग इंगळे, डॉ.राऊत,तसेच बायफ संस्थेचे श्री.अतुल मुळे,नूतन क्षीरसागर व श्री.संताजी मिसाळ उपस्थित होते. कळंब तालुक्यातील विविध विभागांचे तसेच उमेद अभियानाचे अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागात पशुधन सांभाळण्याची मोठी जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते. जनावरांचे चारा-पाणी,निगा आणि दुग्ध व्यवसायातून कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यापर्यंत त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे या उपक्रमात महिला पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. उमेद अभियानाच्या माध्यमातून निवड झालेल्या कळंब तालुक्यातील दहा गावांमधील ६० महिलांना हिरवा चारा लागवडीसाठी ‘BHN-11’ हायब्रीड नेपियर चाऱ्याचे एकूण ३० हजार ठोंबे वाटण्यात आले.याशिवाय उपस्थित सुमारे १२५ महिला व पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले. *निकृष्ट चाऱ्यातूनही पोषणाचा मार्ग* दुष्काळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यानंतर हाताशी असलेल्या चाऱ्याचा योग्य वापर करणे पशुपालकांसाठी महत्त्वाचे ठरते.उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा प्रभावी वापर करून त्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर कसे करता येते,याचे डॉ.हनुमंत गायके यांनी सोयाबीन बुस्कटावर प्रक्रिया करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी काटेविरहित निवडुंग चारा पिकाची लागवड,अझोला कल्चर तसेच दुष्काळी परिस्थितीतील चारा व्यवस्थापनाच्या विविध पद्धती याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.उपलब्ध साधनसामग्री आणि मर्यादित पाण्याचा वापर करून पशुधनासाठी पोषक चाऱ्याची व्यवस्था कशी करता येईल,यावर भर देण्यात आला. जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी कार्यक्रमातील विविध प्रात्यक्षिकांची पाहणी केली. दुष्काळाच्या काळात पशुपालकांनी चारा व्यवस्थापनाचे आगाऊ नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हिरव्या चाऱ्याची लागवड करण्याबरोबरच हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन करून पशुधनासाठी वर्षभर चाऱ्याची उपलब्धता राखण्याचे आवाहन त्यांनी पशुपालकांना केले.दुष्काळी परिस्थितीत पारंपरिक चारा व्यवस्थापनासोबतच उपलब्ध आधुनिक आणि पर्यायी तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुलभ करता येऊ शकतो,असा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला. *‘सेवा संकल्प’मधून योजनांची माहिती* पशुसंवर्धन विभागामार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना,राष्ट्रीय पशुधन मिशनांतर्गत पशुधन विमा,कडबा कुट्टी यंत्रासाठी मागणी,चारा व्यवस्थापन तसेच अन्य नाविन्यपूर्ण योजना याबाबत डॉ.दीपक मुळे व डॉ.पांडुरंग इंगळे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.पात्र पशुपालकांनी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज सादर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. *पशुधन विकासासाठी मोफत उपक्रम* बायफ व बीएसएस सोनाटा मायक्रो क्रेडिट यांच्या सामाजिक जबाबदारीतून पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत पशुपालकांसाठी सॉर्टेड सिमेन व पारंपरिक कृत्रिम रेतन,चारा लागवड,खनिज मिश्रण तसेच पशुधन व्यवस्थापनाशी संबंधित विविध उपक्रम मोफत राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ.मुळे यांनी दिली. *दहा गावांतील महिलांची निवड* माळकरंजा,गोविंदपूर,देवळाली,जवळा खु.,देवधानोरा,आंदोरा, हसेगाव (केज), मस्सा खु.,मोहा आणि खामसवाडी या गावांतील उमेद अभियानांतर्गत ज्या महिलांकडे चारा लागवडीसाठी पाणी उपलब्ध आहे,अशा महिलांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या महिलांना चारा ठोंब व खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले.माळकरंजा व परिसरातील पशुपालकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरांच्या पोटासाठी रोज चाऱ्याची जुळवाजुळव करणाऱ्या पशुपालकांसाठी हा उपक्रम केवळ ठोंबे आणि खनिज मिश्रणाच्या वाटपापुरता मर्यादित राहिला नाही.आज दिलेला चाऱ्याचा ठोंब उद्याच्या हिरव्याy चाऱ्याची बेगमी ठरावी आणि हाताशी असलेल्या निकृष्ट चाऱ्यातूनही जनावरांना पोषण मिळावे,यासाठी आवश्यक ज्ञान आणि तंत्रज्ञान पशुपालकांच्या हातात देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा नियोजन,हिरवा चारा लागवड, उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा योग्य पद्धतीने वापर आणि पशुधनासाठी पोषण व्यवस्थापन याबाबत देण्यात आलेले मार्गदर्शन पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणार असून,पशुधनाची उत्पादकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. *****************

Tuesday, 6 October 2026

‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ अभियानाला धाराशिवमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद* ३० वर्षांवरील १ लाख ६५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

*‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ अभियानाला धाराशिवमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद* ३० वर्षांवरील १ लाख ६५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी धाराशिव,दि.६ ऑक्टोबर (जिमाका) आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा तो होण्यापूर्वी किंवा सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची चाहूल लागणे अधिक महत्त्वाचे ठरते.विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांची सुरुवातीची लक्षणे अनेकदा जाणवतही नाहीत.याच पार्श्वभूमीवर नागरिकांमधील असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून योग्य उपचार सुरू करता यावेत आणि गंभीर आजारांमुळे निर्माण होणारे धोके कमी करता यावेत,या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ पासून ‘तिशीचा पल्ला,तपासणी आणि सल्ला’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,आतापर्यंत ३० वर्षांवरील तब्बल १ लाख ६५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७ लाख ७३ हजार नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी केली जात आहे. विशेषतः कर्करोग,मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधून त्यांना पुढील उपचार तसेच आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.तपासणीत एखादा आजार किंवा संशयित लक्षणे आढळल्यास संबंधित नागरिकाला पुढील तपासणी आणि उपचारासाठी योग्य आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येत आहे. *मुख कर्करोगासाठी ७६ हजार ११६ नागरिकांची तपासणी* अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ७६ हजार ११६ नागरिकांची मुख कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी संदर्भ सेवेकडे पाठविण्यात येत आहे.त्यामुळे कर्करोगाचे निदान वेळेत होऊन आवश्यक उपचार लवकर सुरू करण्यास मदत होत आहे. *स्तन कर्करोगासाठी १० हजार ३०५ महिलांची तपासणी* महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तन कर्करोग तपासणीवरही विशेष भर देण्यात आला आहे.आतापर्यंत १० हजार ३०५ महिलांची स्तन कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली असून,त्यापैकी संशयित आढळलेल्या २० रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी संदर्भ सेवेकडे पाठविण्यात आले आहे. *गर्भाशयमुख कर्करोगासाठी ८ हजार ५६७ महिलांची तपासणी* महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे,यासाठीही अभियानांतर्गत विशेष तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत ८ हजार ५६७ महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.त्यापैकी १० रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भ सेवेसाठी पाठविण्यात आले आहे. *२,१८७ जणांना मधुमेह; २,०९७ जणांना उच्च रक्तदाब* कर्करोग तपासणीसोबतच नागरिकांची मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठीही तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत २ हजार १८७ नागरिकांमध्ये मधुमेह, तर २ हजार ९७ नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे.या रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले असून,त्यांना नियमित उपचार, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जात आहे. *तिशीनंतर नियमित तपासणी महत्त्वाची* अनेक आजारांची सुरुवातीची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नसल्यामुळे त्यांचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते.आजार गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर उपचार सुरू करण्याऐवजी त्याचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.तिशीचा पल्ला,तपासणी आणि सल्ला’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करून आजारांचे वेळीच निदान करण्यावर भर देण्यात येत आहे. तपासणीदरम्यान एखादा आजार किंवा संशयित लक्षणे आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी योग्य आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येत आहे.त्यामुळे गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन आवश्यक उपचार तातडीने सुरू करण्यास मदत होत आहे.एका साध्या तपासणीतून भविष्यातील गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखता येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही लक्षणे जाणवण्याची वाट न पाहता स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील ३० वर्षांवरील नागरिकांनी ‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ अभियानाचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. तपासणीमध्ये आजाराचे निदान झाल्यास नियमित उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी यांनी केले आहे. ००००००

*नागरिकांचे काम गावातच व्हावे,तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये* आयुक्त डॉ.किरण जाधव आपले सरकार केंद्रांमधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर

*नागरिकांचे काम गावातच व्हावे,तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये* आयुक्त डॉ.किरण जाधव आपले सरकार केंद्रांमधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर धाराशिव दि.६ ऑक्टोबर (जिमाका) गावातील नागरिकाला एखाद्या शासकीय सेवेसाठी रोजगार आणि रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये.त्याचे काम गावातच झाले पाहिजे आणि आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याला दर्जेदार,सुलभ आणि वेळेत सेवा मिळाली पाहिजे,असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी केले. आज ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेताना डॉ.श्री.जाधव बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नागरिकांसाठी नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे नगर पालिका प्रशासनाने तातडीने सक्रियपणे कार्यान्वित करावीत.जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील कामगिरीच्या आधारे महसूल,ग्रामविकास आणि नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ केंद्रांची उत्कृष्ट केंद्र म्हणून निवड केली जाणार असून,या उपक्रमात धाराशिव जिल्हा निश्चितच चांगली कामगिरी करेल,असा विश्वासही डॉ.श्री.जाधव यांनी व्यक्त केला.विभागात धाराशिव जिल्ह्याने यापूर्वी चांगले काम केले असून यापुढेही महसूल, ग्रामविकास आणि नगरपालिका या तिन्ही विभागाच्या आपले सरकार केंद्रांनी अधिक प्रभावीपणे काम करावे,असे त्यांनी सांगितले. शासनाने ग्रामस्थांना विविध सेवा गावपातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत.नागरिक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करू शकतात.त्यामुळे गावपातळीवरच आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून त्यांना उत्तम सेवा मिळणे आवश्यक असल्याचे डॉ.जाधव यांनी स्पष्ट केले.राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत १,२१२ सेवा ऑनलाइन झाल्या असून, नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. पासपोर्ट सेवेचे काम आणखी वेगाने करावे.क्रीडा विभागानेही ऑनलाइन सेवांना प्राधान्य द्यावे.किमान ९० टक्के सेवा नियत कालावधीत देण्याचे उद्दिष्ट ठेवावे.नगरपालिका क्षेत्रात लाभार्थी ऑफलाइन अर्ज घेऊन आल्यास त्यांचे अर्ज ऑनलाइन करून घेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश डॉ.श्री.जाधव यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सूचित असलेल्या सर्व विभागांसाठी डिजिटायझेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून डॉ.जाधव म्हणाले की,लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करून सेवा अधिक गतिमान कराव्यात.अर्जदारांना अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्यास सांगावे. काही प्रकरणांत कागदपत्रांची कमतरता असल्यास संबंधित लाभार्थ्याशी थेट संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. त्यामुळे प्रकरणे अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत.नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे,त्यामुळे प्रत्येक विभागाने प्रभावीपणे काम करून गुणवत्तापूर्ण सेवा दिली पाहिजे,असे स्पष्ट निर्देश डॉ.जाधव यांनी दिले. *प्रलंबित प्रकरणे दररोज निकाली काढण्याचा प्रयत्न करा* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,धाराशिव येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्र तृतीयपंथी व्यक्तीकडून चांगल्या प्रकारे चालविण्यात येत आहे. जिल्ह्यात तहसील कार्यालयांच्या ठिकाणी नव्याने आदर्श ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.या केंद्रांमध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत.मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य आयुक्त कार्यालयाकडून या सेवांचा दर महिन्याला नियमित आढावा घेण्यात येतो.त्यामुळे नागरिकांना कमीत कमी वेळेत सेवा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि दररोज प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करावा,असे श्री.पुजार यांनी सांगितले. नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे तातडीने सक्रिय करून नागरिकांना सेवा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. तहसीलदारांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करावीत.ऑनलाइन सेवा नागरिकांना निर्धारित वेळेत मिळाल्यास त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचण्यास मदत होईल,असे जिल्हाधिकारी पुजार यांनी नमूद केले. लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा देण्यास विलंब झाल्यास दंडाचीही तरतूद आहे.मात्र,दंड करण्याची वेळच येणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक यंत्रणेने प्रभावीपणे काम करून नागरिकांना निर्धारित कालावधीत सेवा द्याव्यात,असे आवाहन श्री.पुजार यांनी केले. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहितीही बैठकीत सादर करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कडवकर यांनी केले. *आपले सरकार सेवा केंद्रांची जिल्ह्यातील कामगिरी* जिल्ह्यात नागरिकांना शासकीय सेवा गावपातळीवर आणि घराजवळ सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे जाळे विस्तारले आहे. जिल्ह्यात एकूण ८४९ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे असून,त्यापैकी ६९५ केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.तालुकानिहाय विचार करता भूम तालुक्यात ९३ पैकी ८२ केंद्रे,धाराशिवमध्ये १६४ पैकी १४३ केंद्रे,कळंबमध्ये १३१ पैकी १०८, लोहाऱ्यात ५६ पैकी ४४,परंड्यात ९० पैकी ७७ केंद्रे,तुळजापूरमध्ये १४८ पैकी ११०,उमरग्यात ११२ पैकी ९४ तर वाशी तालुक्यात ५५ पैकी ३७ केंद्रे सक्रिय असल्याची कामगिरी नोंदविण्यात आलेली आहे. विभागनिहाय आकडेवारी पाहता, जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत २२५ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे सक्रिय असून नगरपंचायत क्षेत्रातील १० केंद्रे सक्रिय असून १० केंद्रांची कामगिरी नाही. ग्रामपंचायत स्तरावरील ६१४ केंद्रे सक्रिय असून १३३ केंद्रे सक्रिय असूनही त्यांची कामगिरी नोंदविण्यात आलेली नाही. ‘आपले सरकार’ सेवा केंद्र म्हणजे नागरिकांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची जागा नसून, गावातील शेतकरी,विद्यार्थी, महिला,ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना विविध शासकीय सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागू नयेत,त्यांचा वेळ,श्रम आणि प्रवासाचा खर्च वाचावा,यासाठीचे आपले सरकार केंद्र महत्त्वाचे माध्यम आहे. ****************

सेवा संकल्प अभियानातून वीज योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत *कळंब तहसील कार्यालयात महावितरणचा माहिती स्टॉल; सौर रूफटॉप,पीएम सूर्यघर योजनेसह विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती

सेवा संकल्प अभियानातून वीज योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत *कळंब तहसील कार्यालयात महावितरणचा माहिती स्टॉल; सौर रूफटॉप,पीएम सूर्यघर योजनेसह विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती* धाराशिव दि.६ ऑक्टोबर (जिमाका) घराच्या छतावर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीची संधी,शासनाच्या विविध वीजविषयक योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि दैनंदिन जीवनात विजेचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी,याची माहिती आता नागरिकांना थेट एकाच ठिकाणी मिळत आहे.सेवा संकल्प अभियानाअंतर्गत कळंब तहसील कार्यालयात महावितरणच्या वतीने उभारण्यात आलेल्या माहिती स्टॉलमुळे विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. आज दि.६ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंब तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महावितरणचा विशेष माहिती स्टॉल उभारण्यात आला.या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना सोलर रूफटॉप योजना,प्रधानमंत्री सूर्यघर योजना (PM Surya Ghar Yojana),स्मार्ट योजना (SMART Scheme) तसेच महावितरणच्या विविध सुरू असलेल्या योजना आणि सेवांची माहिती देण्यात आली.यावेळी कळंब तहसीलदार खोकले यांनी सेवा संकल्प अभियानच्या स्टॉलला भेट देऊन महावितरणकडून सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व सेवांची माहिती जाणून घेतली. महावितरणच्या धाराशिव विभागांतर्गत कळंब उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत लढे यांनी तहसीलदार श्री.खोकले तसेच उपस्थित नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये स्मार्ट योजना,पीएम सूर्यघर योजना (PMSGMBY),सोलर रूफटॉप योजना यांसह महावितरणच्या अन्य सेवा व योजनांचा समावेश होता. विशेषतः विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी,विजेचा सुरक्षित वापर,अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने पाळावयाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमात भरत निंगुळे (AA), सौरभ टाकरखडे (AE) आणि येरमाळा येथील शंकर तम्माना (AE) यांनी उपस्थित राहून स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांना विविध योजना,सेवा आणि विद्युत सुरक्षेबाबत माहिती दिली. *नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचविणारा उपक्रम* वीज ही आज केवळ घर उजळविणारी सुविधा राहिलेली नसून कुटुंबाच्या दैनंदिन जीवनापासून शेती,शिक्षण,व्यवसाय आणि रोजगारापर्यंत प्रत्येक क्षेत्राशी जोडली गेली आहे.त्यातच सौरऊर्जेचा वापर वाढवून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व आणि वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.मात्र,अनेकदा योग्य आणि अधिकृत माहितीअभावी पात्र नागरिक या योजनांच्या लाभापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत सेवा संकल्प अभियानच्या माध्यमातून प्रशासन आणि महावितरणची यंत्रणा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याने योजनांची माहिती समजून घेणे,आवश्यक मार्गदर्शन मिळविणे आणि विद्युत सुरक्षेबाबत जागरूक होणे अधिक सुलभ होत आहे. कळंब तहसील कार्यालयातील हा माहिती स्टॉल त्यामुळे केवळ योजनांची माहिती देणारा उपक्रम न ठरता,शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सहज आणि प्रभावीपणे पोहोचविण्याचा सेतू’ ठरत आहे. *************

निपाणीत पशुपालकांच्या दारात योजनांचे मार्गदर्शन *निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक*

निपाणीत पशुपालकांच्या दारात योजनांचे मार्गदर्शन *निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक* धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) पशुपालनाचा वाढता खर्च,चाऱ्याची उपलब्धता आणि पशुधनाच्या आरोग्याची चिंता अशा विविध आव्हानांना सामोरे जाणाऱ्या पशुपालकांसाठी ‘सेवा संकल्प अभियान’ आधार देणारे ठरत आहे.या अभियानांतर्गत कळंब तालुक्यातील निपाणी येथे पशुपालकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. निपाणी येथे आज आयोजित या उपक्रमात पशुपालकांना VMDDP योजनेअंतर्गत कडबा कुट्टी व मका चारा बियाण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती मिळाल्यामुळे पात्र पशुपालकांना योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक पशुपालकांसमोर अनेकदा उपलब्ध चाऱ्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो.अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या निकृष्ट चाऱ्याचाही योग्य प्रक्रिया करून अधिक परिणामकारक पद्धतीने उपयोग करता यावा,यासाठी या मार्गदर्शन कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी,तसेच त्यामध्ये गूळ,मीठ व खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा,याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखविण्यात आले. केवळ योजना सांगण्याऐवजी चाऱ्यावर प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखविण्यात आल्याने पशुपालकांना ही पद्धत समजून घेणे अधिक सोपे झाले.उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून जनावरांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी असे व्यावहारिक मार्गदर्शन पशुपालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. *पशुधन विमा,केसीसीसह विविध योजनांची माहिती* यावेळी पशुपालकांना पशुधन विमा योजना,किसान क्रेडिट कार्ड (KCC) तसेच पशुसंवर्धनाशी संबंधित इतर विविध योजनांची माहितीही देण्यात आली.पशुधन हे ग्रामीण कुटुंबांसाठी केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्यांच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे.त्यामुळे पशुधनाचे संरक्षण,आवश्यक आर्थिक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.त्या दृष्टीने एकाच ठिकाणी विविध योजनांची माहिती मिळाल्याने पशुपालकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्याचा मार्ग अधिक सुकर झाला. *‘सेवा संकल्पमधून सेवा थेट लाभार्थ्यांपर्यंत* ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ शासकीय योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता,त्या योजना आणि सेवा प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत,त्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन स्थानिक पातळीवर मिळावे आणि पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत,हा अशा उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. निपाणी येथील उपक्रमातूनही याच संकल्पनेला कृतीची जोड मिळाली.ऑनलाइन अर्ज भरण्यापासून ते जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकापर्यंत मिळालेले मार्गदर्शन पशुपालकांसाठी उपयुक्त ठरले.‘योजना कागदावर न राहता तिचा लाभ पशुपालकाच्या गोठ्यापर्यंत पोहोचावा’,या सेवाभावी भूमिकेला या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. ***************

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्जास मुदतवाढ *१० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज; प्रवेश यादी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्जास मुदतवाढ *१० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज; प्रवेश यादी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार* धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची यादी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते.या वसतिगृहांमध्ये शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.शासकीय वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’ ही योजना आहे.स्वाधार योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाकरिता ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक आहे.यासाठी इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी https;//hmasnew.mahait .org या पोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे. समाज कल्याण आयुक्तालयाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित केले होते.कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी वसतिगृह प्रवेश अर्ज करण्याची मुदत ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ अशी होती.या प्रवेशाची यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत ७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ अशी होती आणि प्रवेश यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ७ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली होती. तथापि,सीईटी सेलचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश देण्याचे अद्यापही सुरू आहेत.या प्रवेशासाठी अजून काही कालावधी लागणार असल्याने तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी संधी मिळावी,यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्जाची मुदत आणि त्यानुसार प्रवेश यादी प्रसिद्ध करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वसतिगृह प्रवेशाचा अर्ज १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत करता येणार असून,प्रवेशाची यादी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित वसतिगृहांचे गृहपाल, निरीक्षक तसेच सहायक आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जांची छाननी करणे बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे असे अर्ज तात्काळ छाननी करून निकाली काढावेत,असे निर्देश देण्यात आले आहेत. वसतिगृहातील दरवर्षी विहित मुदतीत प्रवेशाच्या याद्या प्रसिद्ध होतील,याची दक्षता घ्यावी. ऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नसल्यास अशा विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत आपल्यास्तरावर एक नोंद रजिस्टर ठेवावे.याबाबत वेळोवेळी आयुक्तालयामार्फत ऑनलाइन बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात यावे. प्रयत्न करूनही तांत्रिक अडचणींमुळे विहित मुदतीमध्ये ऑनलाइन अर्ज करता न आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आवश्यक असल्यास,त्यांना गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश देण्याबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही करावी.मात्र,अशा प्रकारे प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रादेशिक उपायुक्त यांच्यामार्फत आयुक्तालयास तातडीने कळवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. *************

*हवामानाच्या धोक्यांपासून फळबागांना विम्याचे कवच* शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन अंबिया बहारात द्राक्ष,मोसंबी,डाळिंब, केळी,आंबा व पपईचा समावेश ; फळपिकानुसार विमा हप्ता भरण्याच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या

*हवामानाच्या धोक्यांपासून फळबागांना विम्याचे कवच* शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन अंबिया बहारात द्राक्ष,मोसंबी,डाळिंब, केळी,आंबा व पपईचा समावेश ; फळपिकानुसार विमा हप्ता भरण्याच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या धाराशिव दि.६ ऑक्टोबर (जिमाका) हवामानातील अनिश्चितता आणि अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान,सापेक्ष आर्द्रता,वेगाचा वारा तसेच गारपीट यांसारख्या हवामान धोक्यांपासून फळपिकांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी अंबिया बहारात द्राक्ष,मोसंबी,डाळिंब,केळी,आंबा व पपई या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत ऑनलाइन नोंदणी करून या योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल,तर कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकाकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत,त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजनेअंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान,जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता,वेगाचा वारा आणि गारपीट या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळणार आहे.योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशासह फोटो आणि बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग नोंदवायचा असेल,त्यांनी नियमित व अतिरिक्त विमा हप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे. फळपिकनिहाय विमा संरक्षण, शेतकरी हिस्सा आणि अंतिम मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत.द्राक्ष पिकासाठी विमा हप्ता भरण्याचा अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ आहे. मोसंबीसाठी विमा संरक्षित रक्कम नियमित जोखमीसाठी प्रतिहेक्टरी ३ लाख ८० हजार रुपये व गारपिटीसाठी १ लाख २७ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १५ हजार २०० रुपये आणि ९ हजार ५२५ रुपये आहे. मोसंबीसाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. डाळिंबासाठी नियमित विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १ लाख ६० हजार रुपये व गारपिटीसाठी ५३ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १३ हजार ६०० रुपये आणि २ हजार ६५० रुपये आहे.डाळिंबासाठी अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२७ आहे.केळीसाठी नियमित विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १ लाख ७० हजार रुपये व गारपिटीसाठी ५७ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १४ हजार ४५० रुपये आणि २ हजार ८५० रुपये आहे.केळीसाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.आंब्यासाठी नियमित विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १ लाख ७० हजार रुपये व गारपिटीसाठी ५७ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १४ हजार ४५० रुपये आणि २ हजार ८५० रुपये आहे.आंब्यासाठी अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२६ आहे. पपईसाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १३ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा ३ हजार ४०० रुपये व अतिरिक्त विमा हप्ता ६५० रुपये नमूद करण्यात आला आहे.पपईसाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. हवामानावर आधारित फळपिक विमा योजना अंबिया बहारासाठी फळपिकनिहाय अधिसूचित महसूल मंडळेही निश्चित करण्यात आली आहेत.पपई पिकासाठी धाराशिव ग्रामीण,केशेगाव,बेंबळी,जागजी, येडशी,अंबेजवळगे,कळंब,मस्सा ख., नायगाव,ईटकूर,येरमाळा,मोहा,शिराढोण, गोविंदपूर,तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ,जळकोट,मंगरुळ,नळदुर्ग, आरळी बु.,तामलवाडी,परंडा,आसु, जवळा नि.,सोनारी,आनाळा,पाचपिंपळा, शेळगाव,भूम,वालवड, माणकेश्वर, अंभी,आष्टा,पाथुड,ईट,वाशी,तेरखेडा, पारगाव,पारा,गुरुम व डाळिंब ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. आंबा,केळी,डाळिंब आणि द्राक्ष या फळपिकांसाठी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. मोसंबी पिकासाठी शिराढोण,गोविंदपूर, नायगाव,तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ,जळकोट,मंगरुळ,नळदुर्ग, आरळी बु.,तामलवाडी,धाराशिव ग्रामीण, तेर,ढोकी,जागजी,अंबेजवळगे,येडशी, परंडा,आसु,जवळा नि.,सोनारी,आनाळा, पाचपिंपळा,शेळगाव,माणकेश्वर,अंभी, वालवड,ईट,वाशी,तेरखेडा,पारगाव व पारा ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. वरील नमूद केल्याप्रमाणे फळपिकनिहाय अधिसूचित महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.बदलत्या हवामानामुळे फळबागांपुढील जोखीम वाढत असताना विम्याचे आर्थिक कवच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.त्यामुळे संबंधित महसूल मंडळांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्धारित अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी पीएमएफबीवायच्या अधिकृत संकेतस्थळाचा (pmfby.gov.in) वापर करावा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. ***************

Monday, 5 October 2026

*सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ ऑक्टोबरला सायकल व ई-बाईक रॅली* नागरिकांना सहभागाचे आवाहन

*सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ ऑक्टोबरला सायकल व ई-बाईक रॅली* नागरिकांना सहभागाचे आवाहन धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने धाराशिव शहरात जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.सुमारे एक हजार विद्यार्थी,अधिकारी व कर्मचारी या रॅलीत सहभाग नोंदविणार आहेत. *जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला प्रारंभ* सायकल व ई-बाईक रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथून प्रारंभ होणार आहे.तेथून प्रशासकीय इमारत,महात्मा बसवेश्वर चौक,माणिक चौक, पोलीस अधीक्षक कार्यालयमार्गे मध्यवर्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित या सायकल रॅलीमध्ये धाराशिव शहरातील युवक-युवती, खेळाडू,सायकलप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी केले आहे. *सेवा,समर्पण आणि नागरिक सहभागाचा संदेश* ‘सेवा,समर्पण आणि नागरिक सहभागातून सशक्त भारताच्या निर्मितीसाठी चला,सायकल रॅलीत सहभागी होऊया ! असा संदेश देत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ****************

*दिवाळीसाठी तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जाचे आवाहन* ७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारणार

*दिवाळीसाठी तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जाचे आवाहन* ७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारणार धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल उभारण्यासाठी आवश्यक परवानगीचे अर्ज ७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. विहित नमुन्यातील अर्ज. फॉर्म LE-५.ओळखपत्र — आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदान ओळखपत्र इत्यादी.संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र. संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा साक्षांकित नकाशा.संबंधित जागा खासगी असल्यास जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र व जागेची कागदपत्रे.संबंधित पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र.विहित परवाना शुल्काचा भरणा केल्याचे चलन. इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असलेले प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जातील. तसेच,विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.त्यामुळे तात्पुरते फटाके विक्री स्टॉल सुरू करण्यास इच्छुक अर्जदारांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ***************

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम *जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत ३८६ गावे व शहरी भागात घरोघरी तपासणी* ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम *जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत ३८६ गावे व शहरी भागात घरोघरी तपासणी* ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी धाराशिव,दि.५ ऑक्टोबर (जिमाका) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोग संक्रमण शून्यावर’ आणण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत जिल्ह्यातील ३८६ गावे व शहरी भागातील १ लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन तब्बल ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २ हजार ५७२ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये ६१२ सांसर्गिक रुग्ण,६१ बालरुग्ण, ग्रेड-१ विकृती असलेले ३७ रुग्ण तसेच ग्रेड-२ विकृती असलेला एक रुग्ण आढळून आला आहे. ग्रेड-१ विकृतीमध्ये प्रामुख्याने तळहात किंवा तळपायाला बधिरता येते,तर ग्रेड-२ विकृतीमध्ये दिसणारी शारीरिक विकृती आढळते. ग्रेड-२ विकृती असलेला रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असून,ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्यात आला होता. मागील पाच वर्षांत निदान झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी करण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील ५९१ गावांची निवड करण्यात आली असून,एकूण २१ हजार ३४१ सहवासितांची तपासणी केली जाणार आहे. नवीन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी करून कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी पात्र सहवासितांना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) अंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देण्यात येणार आहे.सहवासितांना औषध देण्यापूर्वी आवश्यक तपासणी व वैद्यकीय निकषांची पूर्तता करण्यात येईल.कुष्ठरोगाच्या संपर्कातील पात्र व्यक्तींना सिंगल-डोस रिफॅम्पिसिन देणे ही संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. *३८६ गावांमध्ये ‘फोकस्ड लेप्रसी कॅम्पेन’* मागील पाच वर्षांत सांसर्गिक रुग्ण, बालरुग्ण किंवा विकृती असलेले रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ‘फोकस्ड लेप्रसी कॅम्पेन’ (Focused Leprosy Campaign) अंतर्गत जिल्ह्यातील ३८६ गावे व शहरी भागांची निवड करण्यात आली आहे.मोहिमेत १ लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.यामध्ये आढळणाऱ्या संशयित रुग्णांची पुढील तपासणी केली जाईल. निदान झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार, त्यांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी आणि पात्र सहवासितांना PEP अंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देऊन कुष्ठरोग संसर्ग साखळी तोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. *कुष्ठरोगाची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत* कुष्ठरोगाची तपासणी तसेच बहुविध औषधोपचार (MDT) सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी उपचारामध्ये खंड न पाडता नियमितपणे औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. बहुसांसर्गिक (MB) कुष्ठरुग्णांसाठी १२ महिने,तर अल्पसांसर्गिक (PB) कुष्ठरुग्णांसाठी सहा महिने नियमित बहुविध औषधोपचार (MDT) घेणे आवश्यक आहे.WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार MDT मध्ये रिफॅम्पिसिन, डॅप्सोन व क्लोफाझिमिन या औषधांचा समावेश असतो. *लवकर निदान करा,विकृती टाळा* कुष्ठरोग लपवून ठेवल्यास किंवा उपचारास विलंब केल्यास आजार वाढून नसांना इजा होण्याबरोबरच कायमस्वरूपी विकृती निर्माण होऊ शकते.मात्र,लवकर निदान आणि नियमित उपचार घेतल्यास कुष्ठरोग बरा होतो आणि विकृती टाळता येते. उपचार सुरू केलेल्या रुग्णामध्ये उपचाराचा प्रभाव लवकर सुरू होतो आणि संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.त्यामुळे कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता नियमित उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. *कुष्ठरोगाची लक्षणे ओळखा* अंगावर एक किंवा अनेक फिकट पांढरे अथवा लालसर,न खाजणारे चट्टे असणे,चेहऱ्यावर किंवा शरीराच्या एखाद्या भागावर संवेदना कमी होणे अथवा बधिरता असणे,हातापायाला मुंग्या येणे; तळहात किंवा तळपायाला बधिरता येणे,चेहरा तेलकट किंवा चकाकणारा दिसणे,भुवयांचे केस विरळ होणे,तसेच हात-पायातील संवेदना कमी होणे किंवा कमजोरी जाणवणे ही कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे आहेत.यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास किंवा कुष्ठरोगाची शंका वाटल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी. *नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे* या विशेष सर्वेक्षण मोहिमेचा अहवाल प्रत्येक आठवड्याला राज्य स्तरावर सादर करण्यात येणार आहे.कुष्ठरोगाचे लवकर निदान,नियमित उपचार,सहवासितांची तपासणी आणि पात्र सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार यामुळे कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी घरोघरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना आवश्यक सहकार्य करावे.तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास रोग लपवून न ठेवता तात्काळ जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. ‘कुष्ठरोग लपवू नका — तपासणी करा,उपचार घ्या,विकृती टाळा.’ असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव डॉ.सतीश हरीदास,जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव डॉ.धनंजय चाकूरकर व सहायक संचालक,आरोग्य सेवा,कुष्ठरोग,धाराशिव डॉ.मारुती कोरे यांनी केले आहे. *************

*औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे* धाराशिवमध्ये १६, तुळजापूर ११, उमरगा १२, लोहारा ६, कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंड्यात ८ केंद्रे आहेत.

*औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे* धाराशिवमध्ये १६, तुळजापूर ११, उमरगा १२, लोहारा ६, कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंड्यात ८ केंद्रे आहेत. धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.या मतदान केंद्रांची ठिकाणे,पत्ते आणि केंद्रनिहाय मतदारसंख्या असलेली प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे. *धाराशिव तालुका* जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात १६, तुळजापूर ११,उमरगा १२, लोहारा ६, कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंडा तालुक्यात ८ अशी एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांची सविस्तर यादी धाराशिव तालुका : मतदान केंद्र क्र. ६२७ – धाराशिव शहर-१ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,जुनी इमारत,पश्चिम बाजूची खोली, धाराशिव.एकूण मतदार – ४२६. मतदान केंद्र क्र.६२८ – धाराशिव शहर-२ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,नवीन इमारत,खोली क्र. ४,धाराशिव. एकूण मतदार – ४९७.मतदान केंद्र क्र. ६२९ – धाराशिव शहर-३ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,जुनी इमारत, पश्चिम बाजूची खोली, धाराशिव. एकूण मतदार – ५९१.मतदान केंद्र क्र.६३० – धाराशिव शहर-४ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,नवीन इमारत, खोली क्र.१,धाराशिव. एकूण मतदार – ४३३. मतदान केंद्र क्र.६३१ – धाराशिव शहर- ५ : नूतन प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,धाराशिव.एकूण मतदार – ४००. मतदान केंद्र क्र. ६३२ – धाराशिव शहर- ६ : नूतन प्राथमिक शाळा,मध्य बाजूची खोली,धाराशिव. एकूण मतदार – २५६. मतदान केंद्र क्र.६३३ – धाराशिव ग्रामीण : नूतन प्राथमिक शाळा, पूर्व बाजूची खोली, धाराशिव. एकूण मतदार – ४०४.मतदान केंद्र क्र. ६३४ – तेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नवीन इमारत,तेर.एकूण मतदार – ३८५.मतदान केंद्र क्र.६३५ – ढोकी : जिल्हा परिषद प्रशाला, पाण्याच्या टाकीजवळ, पश्चिमेकडील खोली,ढोकी. एकूण मतदार – ५५७. मतदान केंद्र क्र.६३६ – बेंबळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची, उत्तरेकडील बाजूची खोली, बेंबळी.एकूण मतदार – २९३. मतदान केंद्र क्र. ६३७ – पाडोळी (आ.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दक्षिण बाजूची खोली,पाडोळी (आ.). एकूण मतदार – २८९.मतदान केंद्र क्र. ६३८ – आंबेजवळगा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नवीन इमारत,मधली बाजूची खोली,आंबेजवळगा.एकूण मतदार – २१०. मतदान केंद्र क्र.६३९ – करजखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,करजखेडा.एकूण मतदार – ११६.मतदान केंद्र क्र. ६४० – येडशी : जिल्हा परिषद प्रशाला,मुलांची इमारत, पश्चिम बाजूची खोली,येडशी.एकूण मतदार – ४२७.मतदान केंद्र क्र.६४१ – जागजी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मध्यवर्ती बाजूची खोली, जागजी. एकूण मतदार – २३०.मतदान केंद्र क्र.६४२ – केशगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मधली बाजूची खोली,केशगाव.एकूण मतदार – २४१. *तुळजापूर तालुका* मतदान केंद्र क्र. ६४३ – तुळजापूर शहर-१ : नगराध्यक्ष यांचे दालन,नगर परिषद कार्यालय,तुळजापूर. एकूण मतदार – ५१५.मतदान केंद्र क्र. ६४४ – तुळजापूर शहर-२ आणि तुळजापूर (ग्रामीण) : बैठक सभागृह,पंचायत समिती कार्यालय,तुळजापूर.एकूण मतदार – ५३०.मतदान केंद्र क्र. ६४५ – सावरगाव : जि.प.कन्या प्राथमिक शाळा, नवीन इमारत,खोली क्र. ३,सावरगाव.एकूण मतदार – २४५.मतदान केंद्र क्र.६४६ – जळकोट : जि.प.प्रशाला,नवीन इमारत, उत्तर बाजू,जळकोट. एकूण मतदार – ६४२.मतदान केंद्र क्र. ६४७ – नळदुर्ग शहर : नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, नळदुर्ग. एकूण मतदार – ६२९.मतदान केंद्र क्र. ६४८ – नळदुर्ग ग्रामीण : ग्रामपंचायत कार्यालय,अणदूर. एकूण मतदार – ५३०.मतदान केंद्र क्र. ६४९ – मंगरुळ : ग्रामपंचायत कार्यालय, मंगरुळ.एकूण मतदार – ३६२.मतदान केंद्र क्र.६५० – सलगरा (दि.) : जि.प.प्राथमिक शाळा,पूर्व बाजू,खोली क्र.१,सलगरा (दि) एकूण मतदार – ४३०. २५) मतदान केंद्र क्र. ६५१ – तामलवाडी : जि.प.प्राथमिक शाळा,मध्य बाजू, तामलवाडी.एकूण मतदार – २६३. २६) मतदान केंद्र क्र. ६५२ – आरळी बु. : जि.प.प्राथमिक शाळा,उत्तर बाजू,खोली क्र.२,आरळी बु.एकूण मतदार – २६७.मतदान केंद्र क्र. ६५३ – इटकळ : जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,पूर्व बाजू,खोली क्र. १,इटकळ.एकूण मतदार – २९६. *उमरगा तालुका* मतदान केंद्र क्र.६५४ – उमरगा शहर-१ : जिल्हा परिषद प्रशाला,उमरगा,खोली क्र. २२,भारत संचार निगम ऑफिसजवळ. एकूण मतदार – ३७४.मतदान केंद्र क्र. ६५५ – उमरगा शहर-२ : श्री छत्रपती शिवाजी (ज्यू.) कॉलेज,बॉटनी लॅब,मध्य बाजू,उमरगा.एकूण मतदार – ४९७. मतदान केंद्र क्र. ६५६ – उमरगा शहर-३ : पंचायत समिती मिटिंग हॉल, उमरगा. एकूण मतदार – ५२२.मतदान केंद्र क्र. ६५७ – उमरगा (ग्रामीण) : श्रीकृष्ण महाविद्यालय, रूम नं.६,उत्तर बाजू, गुंजोटी. एकूण मतदार – ६९२.मतदान केंद्र क्र. ६५८ – मुरुम शहर : जिल्हा परिषद कन्या प्रशाला, मुरुम.एकूण मतदार – ३७२. मतदान केंद्र क्र.६५९ – मुरुम ग्रामीण-२ : जिल्हा परिषद कन्या प्रशाला,खोली क्र. ११,मुरुम. एकूण मतदार – ३७२. मतदान केंद्र क्र. ६६० – नारंगवाडी : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,रूम नं.६,नारंगवाडी.एकूण मतदार – ५३८. मतदान केंद्र क्र.६६१ – मुळज : जिल्हा परिषद प्रशाला, रूम नं.१,मुळज.एकूण मतदार – ३९३.मतदान केंद्र क्र.६६२ – मुळज ग्रामीण-२ : जिल्हा परिषद प्रशाला, रूम नं.११, मुळज.एकूण मतदार – ३९३.मतदान केंद्र क्र.६६३ – बेडगा : जिल्हा परिषद प्रशाला,रूम नं.३, बेडगा.एकूण मतदार – ६९५.मतदान केंद्र क्र. ६६४ – बलसूर : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,पश्चिम बाजू,बलसूर.एकूण मतदार – ६३०.मतदान केंद्र क्र. ६६५ – डाळींब : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली,डाळींब.एकूण मतदार – ५८०. *लोहारा तालुका* मतदान केंद्र क्र.६६६ – लोहारा शहर : तहसील कार्यालय,लोहारा, महसूल हॉल. एकूण मतदार – ६३५.मतदान केंद्र क्र. ६६७ – लोहारा ग्रामीण : तहसील कार्यालय,लोहारा,मिटिंग हॉल. एकूण मतदार – ६३७. मतदान केंद्र क्र. ६६८ – माकणी : भारत विद्यालय, माकणी,हॉल नं.१२.एकूण मतदार – ४५४. मतदान केंद्र क्र. ६६९ – माकणी ग्रामीण-२ : भारत विद्यालय, माकणी,हॉल क्र.१३,पश्चिम बाजू.एकूण मतदार – ४५४. मतदान केंद्र क्र.६७० – धानुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानुरी, हॉल नं.२,पूर्व बाजू.एकूण मतदार – ४९२. मतदान केंद्र क्र. ६७१ – जेवळी : बसवेश्वर हायस्कूल, जेवळी, उत्तर बाजू,हॉल नं.२.एकूण मतदार – ४२३. *कळंब तालुका* मतदान केंद्र क्र. ६७२ – कळंब शहर-१ : तहसीलदार कक्ष,तहसील कार्यालय, कळंब.एकूण मतदार – ३५०.मतदान केंद्र क्र. ६७३ – कळंब शहर-२ : तहसील कार्यालय,महसूल कक्ष,कळंब.एकूण मतदार – ५६४.मतदान केंद्र क्र. ६७४ – कळंब ग्रामीण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,बैठक कक्ष,कळंब.एकूण मतदार – ४४३.मतदान केंद्र क्र. ६७५ – इटकुर : जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला,इयत्ता ८ वीचा वर्ग, इटकुर.एकूण मतदार – ३३६. मतदान केंद्र क्र. ६७६ – शिराढोण : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,समूह साधन केंद्राची खोली,शिराढोण. एकूण मतदार – ४२४.मतदान केंद्र क्र. ६७७ – येरमाळा : जिल्हा परिषद कन्या प्रशाला,पश्चिम बाजू, येरमाळा.एकूण मतदार – ३७५.मतदान केंद्र क्र. ६७८ – मोहा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इयत्ता ५ वीचा वर्ग, मोहा.एकूण मतदार –३३६.मतदान केंद्र क्र. ६७९ – मस्सा (ख.) : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, इयत्ता ६ वीचा वर्ग,दक्षिण बाजू,मस्सा (ख.).एकूण मतदार – ४२४.मतदान केंद्र क्र. ६८० – नायगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,नायगाव. एकूण मतदार – १४७.मतदान केंद्र क्र. ६८१ – गोविंदपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,इयत्ता १ लीचा वर्ग,गोविंदपूर. एकूण मतदार – ४८६. *भूम तालुका* मतदान केंद्र क्र. ६८२ – भूम : तहसील ऑफिस,मिटिंग हॉल, भूम.एकूण मतदार – ४५७. मतदान केंद्र क्र. ६८३ – भूम : पंचायत समिती, आवक-जावक कक्ष, भूम.एकूण मतदार – १४७.मतदान केंद्र क्र. ६८४ – इंट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र.६,ईट. एकूण मतदार – ४८६. मतदान केंद्र क्र. ६८५ – आंबी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजूची खोली, आंबी.एकूण मतदार – १०४. मतदान केंद्र क्र. ६८६ – माणकेश्वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजूची खोली,माणकेश्वर. एकूण मतदार – २२५.मतदान केंद्र क्र.६८७ – आष्टा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र.१,आष्टा.एकूण मतदार – ८६.मतदान केंद्र क्र. ६८८ – पाथरूड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र. ५०, पाथरूड. एकूण मतदार – ११६ मतदान केंद्र क्र. ६८९ – वालवड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली,वालवड. एकूण मतदार – १२९. *वाशी तालुका* मतदान केंद्र क्र.६९० – वाशी शहर : बैठक हॉल,तहसील कार्यालय,वाशी.एकूण मतदार –५२३.मतदान केंद्र क्र. ६९१ – वाशी ग्रामीण : तहसीलदार यांचे दालन,वाशी.एकूण मतदार – ३६५.मतदान केंद्र क्र. ६९२ – तेरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली, तेरखेडा.एकूण मतदार – १८७. मतदान केंद्र क्र. ६९३ – पारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली, पारा.एकूण मतदार – १८७. मतदान केंद्र क्र. ६९४ – पारगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,पारगाव.एकूण मतदार – ३०९. *परंडा तालुका* मतदान केंद्र क्र. ६९५ – परंडा : तहसील कार्यालय,परंडा,सभागृह. मतदान केंद्र क्र.६९६ – परंडा शहर-२ : महसूल शाखा,तहसील कार्यालय,परंडा.एकूण मतदार – ३६१. मतदान केंद्र क्र.६९७ – जवळा (नि.) : जिल्हा परिषद प्रशाला,उत्तर बाजूची खोली, जवळा (नि.).एकूण मतदार – १२५.मतदान केंद्र क्र. ६९८ – आनाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,आनाळा ला एकूण मतदार – ११४. मतदान केंद्र क्र. ६९९ – पाचपिंपळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,पाचपिंपळा.एकूण मतदार – १३२. मतदान केंद्र क्र. ७०० – शेळगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,शेळगाव. एकूण मतदार – १८०.मतदान केंद्र क्र. ७०१ – सोनारी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,सोनारी.एकूण मतदार – २३७.आणि मतदान केंद्र क्र. ७०२ – आसू : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,आसू.एकूण मतदार – २२७.असे आहे. या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मतदारांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.मतदान केंद्रांची अंतिम यादी संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निश्चित होणार आहे. ***************