Wednesday, 12 August 2026

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर योजनांचे अर्ज महाडीबीटी २.० वर भरण्याचे आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर योजनांचे अर्ज महाडीबीटी २.० वर भरण्याचे आवाहन धाराशिव दि.१२ ऑगस्ट (जिमाका) अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता मॅट्रिकोत्तर योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थी,पालक तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांनी या प्रक्रियेची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी,असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्ज भरताना सर्व माहिती अचूक व अद्ययावत भरणे आवश्यक आहे. महाडीबीटी २.० वर उपलब्ध मॅट्रिकोत्तर योजना महाडीबीटी २.० पोर्टलद्वारे ऑनलाइन राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील PPP योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती’ योजना यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी नव्याने महाआयडी तयार करणे बंधनकारक महाडीबीटी २.० प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नव्याने महाआयडी (Maha ID) तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील यूजर आयडी व पासवर्डची आता आवश्यकता राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून नवीन महाआयडी तयार करावा.आधार पोर्टलवर आपली माहिती,जसे की पत्ता,मोबाईल क्रमांक,ई-मेल आणि बँक खात्याची माहिती अचूक व अद्ययावत ठेवावी.अर्जासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे,जसे की जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र,शैक्षणिक गुणपत्रके आदी स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत. नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण (Renewal) या दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे.नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करा’ ही विशिष्ट टॅब निवडावी.महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा.महाडीबीटी पोर्टलसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस उपरोक्त पोर्टलवरील लिंकवर जाऊन लॉगिन करावे.लॉगिन करण्यासाठी ‘नागरिकांसाठी लॉगिन’ किंवा ‘महाआयडीशिवाय प्रवेश करा’ या पर्यायाचा वापर करून आधार आधारित लॉगिन करावे.त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी अद्ययावत केल्यानंतरच लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर पात्र योजनेचा तपशील अद्ययावत केल्यावर विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होईल.ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे,त्या योजनेच्या नावासमोर ‘पहा’ या पर्यायावर क्लिक केल्यास योजनेची संपूर्ण माहिती पाहता येईल. त्यानंतर निवडलेल्या योजनेसमोर असलेल्या ‘Apply’ टॅबवर क्लिक करून वैयक्तिक माहिती,चालू व मागील शैक्षणिक तपशील तसेच योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे यांचा तपशील अद्ययावत करावा.अर्ज ऑनलाइन सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवावी. महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना - महाडीबीटी २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी महाविद्यालयांनी सहकार्य करावे.अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये,अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालय व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश,शुल्क रचना आदी माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणांकडून,उदा.संचालनालय, विद्यापीठ,परिषद तसेच FRA, मॅपिंगची कार्यवाही करून घ्यावी. महाविद्यालयासाठी आता केवळ प्राचार्य लॉगिन महाडीबीटी २.० प्रणालीवर महाविद्यालयासाठी आता केवळ एकच लॉगिन उपलब्ध असेल.हे लॉगिन महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल.लिपिक लॉगिन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.ज्या महाविद्यालयांना अद्याप लॉगिन किंवा पासवर्डबाबत अडचणी असतील, त्यांनी संबंधित शैक्षणिक विभागाशी संपर्क साधावा. महाविद्यालयाने मागील यूजर आयडी व दिलेल्या डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाइल तपासावी. तसेच अभ्यासक्रमनिहाय निश्चित करण्यात आलेले शुल्क (Fee Structure) तात्काळ अद्ययावत करावे.पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित (Pending) ठेवू नयेत.विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असेल. अधिक माहितीसाठी हेल्पडेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महाडीबीटी २.० संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०० / १८००१०२५३११ या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवरही संपर्क करता येईल.तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारींसाठी विद्यार्थी तसेच प्राचार्य लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर आवश्यक माहिती व कागदपत्रे अचूकपणे भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,धाराशिव सचिन कवले यांनी केले आहे. ******