Sunday, 9 August 2026

१४ ऑगस्टला धाराशिवमध्ये १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा संकल्प ‘हरित धाराशिव अभियान २.० आठ ठिकाणी मियावाकी पद्धतीने घनवन ; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी काटेकोर नियोजन

१४ ऑगस्टला धाराशिवमध्ये १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा संकल्प ‘हरित धाराशिव अभियान २.० आठ ठिकाणी मियावाकी पद्धतीने घनवन ; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी काटेकोर नियोजन धाराशिव दि.१० ऑगस्ट (जिमाका) राष्ट्रीय वन धोरणानुसार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन असणे आवश्यक आहे.महाराष्ट्रात सध्या सुमारे २० टक्के क्षेत्र वनाखाली आहे.मात्र,धाराशिव जिल्ह्यात हे प्रमाण केवळ एक टक्का असल्याने जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनेतर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून ‘हरित धाराशिव अभियान २.०’ राबविण्यात येत असून,येत्या १४ ऑगस्ट रोजी एकाच वेळी आठ ठिकाणी,१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या व्यापक संकल्पनेनुसार सन २०४७ पर्यंत राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीची लोकचळवळ उभारण्याचे उद्दिष्ट आहे.त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून ‘हरित धाराशिव अभियान २.०’ साकारण्यात येत आहे. ३३.७ हेक्टरवर घनवन या अभियानांतर्गत जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकूण ३३.७ हेक्टर क्षेत्रावर स्थानिक प्रजातींच्या रोपांची मियावाकी पद्धतीने घनवन निर्मिती करण्यात येणार आहे.सन २०२५ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ‘हरित धाराशिव २०२५’ अभियानांतर्गत एकाच दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी त्यापुढचे पाऊल टाकत १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा जागतिक विक्रम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रोपांची संख्या ठरणार रेकॉर्डचा आधार गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार या विक्रमासाठी सहभागी व्यक्तींची संख्या नव्हे,तर सर्व मान्यताप्राप्त ठिकाणी लावण्यात आलेल्या vascular plants अर्थात झाडे,झुडपे,फर्न, फुलझाडे आदींची एकूण संख्या ग्राह्य धरली जाणार आहे.सर्व रोपांची लागवड सलग अधिकृत १२ तासांच्या कालावधीतच पूर्ण करावी लागणार आहे.या कालावधीत वेळ थांबविला जाणार नाही. लागवडीसाठी स्थानिक,देशी किंवा संबंधित परिसरात दीर्घकाळ टिकून वाढू शकणाऱ्या योग्य प्रजातींची निवड केली जाणार आहे.लागवड करण्यात येणाऱ्या सर्व प्रजातींची अधिकृत यादी पूर्वीच तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर करणे आवश्यक आहे.निवडलेल्या प्रजाती आणि मियावाकी पद्धत स्थानिक पर्यावरणासाठी योग्य असल्याचे वनतज्ज्ञ,वनस्पतीशास्त्रज्ञ, आर्बोरिस्ट किंवा पर्यावरणतज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात येणार आहे. तज्ज्ञांची साक्ष आणि जागेची पाहणी प्रत्येक लागवड क्षेत्राची जमीन, माती,भूप्रदेश,सूर्यप्रकाश,पाण्याची उपलब्धता आणि निवडलेल्या प्रजातींची उपयुक्तता यांची तज्ज्ञांकडून तपासणी करून प्रमाणित करण्यात येणार आहे. किमान एका पात्र Specialist Witness ची नियुक्ती करून त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच अनुभवाचे पुरावे सादर केले जाणार आहेत.खड्डे खोदणे,मातीची मशागत,कंपोस्ट, सेंद्रिय खत,कोकोपीट मिसळणे, मातीचे aeration आणि सिंचनाची पूर्वतयारी ही कामे अधिकृत प्रयत्न सुरू होण्यापूर्वी करता येणार आहेत.मात्र,प्रत्यक्ष रोपलागवड अधिकृत १२ तासांच्या कालावधीतच करावी लागणार आहे.प्रत्येक खड्ड्यात केवळ एकच रोप लावले जाईल.रोपांच्या मुळांना व्यवस्थित वाढता येईल,एवढ्या आकाराचे खड्डे तयार केले जातील.खड्डे खोदण्यासाठी जेसीबी किंवा अन्य यंत्रसामग्री तसेच हातातील साधनांचा वापर करता येणार आहे. आठही केंद्रांसाठी एकसंध यंत्रणा सर्व आठ लागवड केंद्रे एका मुख्य आयोजन संस्थेच्या नियंत्रणाखाली राहणार असून,सर्व ठिकाणी समान नियम,समान लागवड पद्धती, समान वेळापत्रक आणि समान पडताळणी पद्धती लागू केली जाणार आहे.सर्व केंद्रांवर होणाऱ्या लागवडीचे Centralised Monitoring System/Control Room मार्फत सतत निरीक्षण केले जाणार आहे. सर्व केंद्रांची संख्या,अचूक ठिकाणे, GPS Coordinates आणि स्थानिक वेळ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केली जाणार आहे.सर्व केंद्रांवर एकाच अधिकृत कालावधीत लागवड सुरू होऊन पूर्ण होईल. Start Time आणि Finish Time चे स्वतंत्र व अचूक दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. प्रत्येक रोपाची स्वतंत्र नोंद प्रत्येक केंद्रावर लावलेल्या रोपांची स्वतंत्र Plantation Log/Plant Register, सहभागींची Participant Register आणि वेळ, त्या वेळेपर्यंतची लागवड संख्या, एकूण संख्या व झालेल्या deductions यांची नोंद असलेले Detailed Log Book ठेवण्यात येणार आहे.रोपे आणि सहभागी मोजण्याची पद्धत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून पूर्वमान्य करून घेतली जाणार आहे.डिजिटल अॅप,QR कोड किंवा बारकोड प्रणालीचा वापर केल्यास ती स्वतंत्रपणे पडताळता येण्याजोगी असणे आवश्यक राहणार आहे.कोणतेही रोप किंवा सहभागी दोन वेळा मोजले जाणार नाहीत,यासाठी स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था राहणार आहे. सहभागींचीही होणार अचूक नोंद विक्रमाचे मुख्य मोजमाप रोपांच्या संख्येवर असले तरी प्रत्येक केंद्रावरील सहभागींची अचूक headcount करणे बंधनकारक राहणार आहे.प्रत्येक केंद्रावर सहभागींची लेखी उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे.केंद्रांच्या संख्येनुसार सहभागींची किमान संख्या निश्चित करण्यात आली आहे.पाच केंद्रे असल्यास प्रत्येक केंद्रावर किमान ५०,सहा केंद्रे असल्यास ४५,सात केंद्रे असल्यास ४०,आठ केंद्रे असल्यास ३५,नऊ केंद्रे असल्यास ३०,तर दहा किंवा अधिक केंद्रे असल्यास प्रत्येक केंद्रावर किमान २५ सहभागी आवश्यक राहणार आहेत. प्रत्येक १०० सहभागींसाठी एक Steward प्रत्येक १०० सहभागींसाठी एक स्वतंत्र Steward नियुक्त करण्यात येणार आहे.Steward हा स्वतंत्र निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या सहभागींच्या गटावर सतत लक्ष ठेवेल.तो स्वतः लागवडीत सहभागी होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही.नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींची तसेच लागवड क्षेत्र सोडणाऱ्या व्यक्तींची नोंद करून आवश्यक असल्यास disqualification करण्याची जबाबदारी Steward वर राहणार आहे.प्रत्येक Steward आपल्या गटासंदर्भातील निरीक्षणे आणि disqualification ची स्वतंत्र नोंद ठेवणार आहे.Steward ने कर्तव्य योग्य प्रकारे पार न पाडल्यास संबंधित संपूर्ण गटाची नोंद किंवा लागवड गिनीजकडून अमान्य केली जाऊ शकते. व्हिडिओ,ड्रोन आणि साक्षीदारांचा पुरावा प्रत्येक केंद्रावर लागवडीचे पुरेसे फोटो आणि व्हिडिओ पुरावे संकलित केले जाणार आहेत. मोठ्या प्रमाणावरील लागवडीसाठी शक्यतो सलग Video Recording केले जाणार असून, मोठ्या क्षेत्रासाठी Drone Video/Aerial Footage घेण्यात येणार आहे.अधिकृत वेळ सुरू व संपल्याची नोंद,प्रत्येक केंद्रावरील साक्षीदारांचे Witness Statements आणि अन्य आवश्यक पुरावे संकलित केले जातील. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र Evidence Package तयार करण्यात येणार असून,त्यामध्ये Plant Logs,Participant Logs,छायाचित्रे,व्हिडिओ, Witness Statements,Time Records,GPS Data आदींचा समावेश राहणार आहे.सर्व केंद्रांची माहिती एकत्र करून एकच Consolidated Claim Report गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केला जाणार आहे.अत्यंत मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यास गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून Independent Professional Auditing Firm मार्फत पडताळणीची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठीही पूर्वतयारी करण्यात येणार आहे. Mock Drill आणि Real-time Monitoring प्रत्यक्ष विक्रमाच्या प्रयत्नापूर्वी सर्व केंद्रांवर Mock Drill/Trial Run घेण्यात येणार आहे.यात Counting,Timing,Video Recording, Stewarding आणि Evidence Collection प्रणालीची चाचणी केली जाईल. प्रयत्नाच्या दिवशी सर्व केंद्रांशी संपर्क ठेवण्यासाठी Central Control Room कार्यान्वित करण्यात येणार असून,शक्य असल्यास प्रत्येक केंद्राकडून Real-time Plantation Count, Participant Count आणि Photo/Video Status मागविला जाणार आहे. पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत Start Signal मिळाल्यावरच प्रत्यक्ष वृक्षलागवड सुरू केली जाईल. १२ तास पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक केंद्रावरील अंतिम लागवड संख्या निश्चित करून स्वाक्षरीयुक्त प्रमाणित अहवाल तयार करण्यात येणार आहे. सर्व मूळ Registers, Videos,Photos,GPS Data, Witness Statements आणि अन्य कागदपत्रे सुरक्षितपणे जतन करून मुख्य आयोजन संस्थेकडे जमा केली जाणार आहेत. लागवडीनंतरही संवर्धनावर भर हा उपक्रम केवळ विक्रमापुरता मर्यादित न राहता वृक्षांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी Irrigation Plan, Protection Plan, Conservation & Maintenance Plan आणि Long-term Survival Plan तयार करण्यात येणार आहे. जनावरे,मानवी हस्तक्षेप,आग, अतिक्रमण आदींपासून रोपांचे संरक्षण केले जाणार असून,पाणी देणे,तण नियंत्रण,पुनर्लागवड आणि वाढीचे निरीक्षण यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. लागवड केलेल्या रोपांच्या दीर्घकालीन जिवंत राहण्याची व वाढीची जबाबदारी संबंधित विभाग,स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायतीनिहाय निश्चित केली जाणार आहे.वन विभाग,कृषी विभाग,पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि स्थानिक पर्यावरणीय संस्थांच्या सल्ल्याने अंतिम लागवड आराखडा तयार केला जाणार आहे.तसेच सर्व केंद्रांवरील अधिकारी,कर्मचारी, सहभागी आणि Stewards यांना एकसमान प्रशिक्षण व मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून १४ ऑगस्टला होणारी ही वृक्षलागवड केवळ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न नसून,धाराशिवच्या पर्यावरणीय भविष्यासाठी उभारली जाणारी व्यापक लोकचळवळ ठरणार आहे.एकीकडे जिल्ह्याचे अत्यल्प वनक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न,तर दुसरीकडे स्थानिक प्रजातींच्या घनवनातून पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश देणारा हा उपक्रम देशासाठीही प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा आहे. ******