Sunday, 9 August 2026
स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी भोजन,निवासासह शैक्षणिक सुविधांचा आधार
स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी भोजन,निवासासह शैक्षणिक सुविधांचा आधार
धाराशिव दि.१० ऑगस्ट (जिमाका) शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नूतनीकरण अर्जांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी नूतनीकरण अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते.शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेले तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेले अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी भोजन भत्ता,निवास भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते.तसेच, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक २६ डिसेंबर २०२४ अन्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे.
४ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज सुरू
सन २०२६-२७ या वर्षाकरिता स्वाधार योजनेचे नूतनीकरण अर्ज (Renewal Applications) दि. ४ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपले नूतनीकरण अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
नूतनीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वाधार योजना ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावा.ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची हार्डकॉपी (ऑनलाइन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे) समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावी.नूतनीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
******