Thursday, 13 August 2026
स्थानिक तक्रार समितीच्या पुनर्गठनासाठी महिलांकडून अर्ज मागविले अध्यक्ष व दोन सदस्यांची तीन वर्षांसाठी निवड ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
स्थानिक तक्रार समितीच्या पुनर्गठनासाठी महिलांकडून अर्ज मागविले
अध्यक्ष व दोन सदस्यांची तीन वर्षांसाठी निवड ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव दि.१४ ऑगस्ट (जिमाका) कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.या समितीसाठी एक महिला अध्यक्ष आणि दोन महिला सदस्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात येणार असून,धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी,इच्छुक व पात्रताधारक महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक पूरक कागदपत्रे सादर करावीत.अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.या पदांची निवड करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना राहणार आहेत.निवड झालेल्या उमेदवारांना कोणतेही मानधन दिले जाणार नाही. मात्र,नियमानुसार बैठक भत्ता देण्यात येईल.
अध्यक्षपदासाठी पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.समितीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारास सामाजिक कार्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून,महिलांच्या प्रश्नांप्रती बांधीलकी असणे आवश्यक आहे.समितीसाठी दोन महिला सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
महिलांच्या समस्यांशी बांधीलकी असलेल्या अशासकीय संघटना,संघ किंवा स्वयंसेवी संस्थांशी संबंधित अथवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेल्या व्यक्तींपैकी सदस्यांची निवड करण्यात येईल.यापैकी एक सदस्य कायद्याची (Legal) पात्रता असलेली महिला असणे आवश्यक आहे.तर दुसरी सदस्य अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असावी.
विहित नमुन्यातील अर्ज १७ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती इमारत,तळ मजला,कक्ष क्रमांक २७, धाराशिव येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी आपले अर्ज तसेच स्वसाक्षांकित पूरक कागदपत्रे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उक्त कार्यालयात सादर करावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.
******