Sunday, 9 August 2026
अत्याचारातील मृताच्या पात्र वारसाला शासकीय नोकरीची संधी भुम तालुक्यातील वालवड येथील प्रकरण ; आवश्यक कागदपत्रांसह २४ ऑगस्टपर्यंत समाजकल्याण कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन
अत्याचारातील मृताच्या पात्र वारसाला शासकीय नोकरीची संधी
भुम तालुक्यातील वालवड येथील प्रकरण ; आवश्यक कागदपत्रांसह २४ ऑगस्टपर्यंत समाजकल्याण कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन
धाराशिव दि.१० ऑगस्ट (जिमाका) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम १९८९ सुधारित अधिनियम २०१५ अंतर्गत दाखल खून अथवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दि. २० नोव्हेंबर २०२५ अन्वये ही कार्यवाही करण्यात येत आहे.
या तरतुदीनुसार भूम पोलिस ठाण्यात दाखल गु.र.नं. २६२/२०२४, दि.२६ नोव्हेंबर २०२४ या खून प्रकरणातील मयत भाऊसाहेब ऊर्फ भावड्या गुलच्या काळे,रा.खटाळवस्ती,वालवड,ता. भूम,जि.धाराशिव यांचा दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यांच्या पात्र वारसदारास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मयत भाऊसाहेब ऊर्फ भावड्या गुलच्या काळे यांच्या पात्र वारसदारांनी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे दि.२४ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.पात्र वारसदारांनी रेशन कार्ड, रहिवासी दाखला,शैक्षणिक कागदपत्रे,जातीचा दाखला, संमतीपत्र तसेच कुटुंब सांभाळण्याचे प्रतिज्ञापत्र आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
याबाबत अधिक माहितीसाठी सचिन कवले,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,धाराशिव यांनी पात्र वारसदारांनी विहित मुदतीत कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
*****