Wednesday, 12 August 2026

नशामुक्त समाजाचा संकल्प करूया जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हर घर तिरंगा अभियानांतर्गत धाराशिवमध्ये सायकल व ई-बाईक रॅली उत्साहात

नशामुक्त समाजाचा संकल्प करूया जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हर घर तिरंगा अभियानांतर्गत धाराशिवमध्ये सायकल व ई-बाईक रॅली उत्साहात धाराशिव,दि.१३ ऑगस्ट (जिमाका) व्यसनमुक्त समाज ही निरोगी, सक्षम आणि प्रगत राष्ट्राची गरज आहे.ड्रग्स, तंबाखू,मद्य यांसारख्या व्यसनांपासून युवकांसह प्रत्येक नागरिकाने दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे.त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान,राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारे ‘हर घर तिरंगा’ अभियान नागरिकांच्या सहभागातून अधिक व्यापक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. राज्यात ९ ते १७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा कार्यालय आणि मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. रॅलीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सहभागी विद्यार्थी,युवक,अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ‘नशामुक्त भारत’ आणि ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियानाबाबत मार्गदर्शन केले.ते म्हणाले,ड्रग्स,तंबाखू, मद्य यांसारख्या कोणत्याही व्यसनापासून विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक नागरिकाने दूर राहण्याचा संकल्प करावा.कोणत्याही व्यसनाची भीती न बाळगता त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढे आले पाहिजे.व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्त होण्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रांची सुविधा उपलब्ध आहे. आपला जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करूया.’’ मोबाईलच्या अतिवापराबाबतही त्यांनी युवकांना सावध केले.मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळ,व्यायाम,शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे युवकांनी वळावे,असे आवाहन त्यांनी केले.नशामुक्त समाजामुळे युवकांची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते,कुटुंबांचे आरोग्य व आर्थिक स्थैर्य टिकते आणि समाजाच्या विकासाला चालना मिळते,त्यामुळे व्यसनमुक्ती ही केवळ एका व्यक्तीची नव्हे,तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व विशद करताना जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर, शासकीय कार्यालये,खासगी संस्था,दुकाने व प्रतिष्ठानांवर तिरंगा ध्वज लावून या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन केले.तिरंगा हा देशाची सार्वभौमता,एकता,अखंडता आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे प्रतीक असून,प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्राभिमानाची भावना दृढ करण्यासाठी अशा अभियानांना विशेष महत्त्व आहे. रॅलीमध्ये जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.एम.भंडे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,तहसीलदार मृणाल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ७५० विद्यार्थी व युवक,तसेच शासकीय कार्यालयांतील सुमारे १०० अधिकारी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले.हातात तिरंगा आणि देशभक्तीचा उत्साह घेऊन सायकल व ई-बाईकवरून सहभागी झालेल्या युवकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी येळाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.रॅलीचा समारोप जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत करण्यात आला. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्था,तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली. क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे,अक्षय बिरादार,क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे, विश्वास खंदारे,डिंपल ठाकरे,युवा समन्वय अधिकारी वैभव लांडगे,किशोर भोकरे, सुनील घोगरे,व्यंकटेश दंडे,सुरेश कळमकर आदींनी परिश्रम घेतले. ‘हर घर तिरंगा’ अभियानातून राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याबरोबरच,नशामुक्त भारताच्या संकल्पातून निरोगी आणि सक्षम पिढी घडविण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. ******