Monday, 10 August 2026
जलसंधारणाच्या कामांना वेग ; धाराशिवमध्ये ७६ कोटींच्या ६ हजार ९१९ कामांना मंजुरी गाळ काढल्याने ३९१६.८० घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा ; ९३८.९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
जलसंधारणाच्या कामांना वेग ; धाराशिवमध्ये ७६ कोटींच्या ६ हजार ९१९ कामांना मंजुरी
गाळ काढल्याने ३९१६.८० घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा ; ९३८.९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
धाराशिव दि.१० ऑगस्ट (जिमाका) पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे,भूजलपातळी वाढविणे आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देणे,या उद्देशाने जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती देण्यात आली आहे.‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नालाखोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या शेतात साचलेला गाळ सुपीकतेचा आधार ठरत असून,पाणीसाठ्याची क्षमता वाढण्याबरोबरच सिंचन क्षेत्रातही वाढ होत आहे.
या योजनेंतर्गत जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग आणि जलसंधारण विभागामार्फत पाझर तलाव,साठवण तलाव,लघु प्रकल्प तसेच मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत. सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत जिल्ह्यातील ३०२ प्रकल्पांतून सुमारे १७०.३८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. धरणातून काढण्यात आलेला हा गाळ ११ हजार ६०७ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये टाकण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गाळ टाकल्यामुळे सुमारे १३ हजार १३८ हेक्टर एवढी खडकाळ व मुरमाड जमीन सुपीक झाली आहे.
पाणीसाठा वाढला, शेतकऱ्यांना थेट लाभ
धरणातून गाळ काढल्यामुळे धरणातील पाण्याची क्षमता १३१५० टीसीएमने वाढली आहे. या योजनेवर आतापर्यंत ६०.४८ कोटी रुपये खर्च झाला असून,पात्र शेतकऱ्यांना २४.२३ कोटी रुपयांचे अनुदान आरटीजीएसद्वारे वितरित करण्यात आले आहे.
जलसंधारणाची ही कामे केवळ धरणातील पाणीसाठा वाढविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत.ज्या जमिनी मुरमाड व खडकाळ होत्या,त्या ठिकाणी गाळ टाकल्याने जमिनीची मशागत सुलभ झाली आहे.परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली आहे.एकीकडे धरणात अधिक पाणी साठू लागले,तर दुसरीकडे शेतजमिनीची सुपीकता वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हातभार लागला आहे.नालाखोलीकरणामुळे शेजारील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
१६३ गावांत ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात एकूण १६३ गावांची निवड करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत कृषी विभाग,जिल्हा परिषद विभाग,वन विभाग,वरिष्ठ भूवैज्ञानिक व विकास यंत्रणा आणि भूजल व जलसंधारण विभाग कार्यरत आहेत.जिल्ह्यात विशेष निधीअंतर्गत १,३७४,तर अभिसरण अंतर्गत ५ हजार ५४५, अशी एकूण ६ हजार ९१९ कामे मंजूर करण्यात आली आहेत.या कामांसाठी ७६.१४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
विविध यंत्रणांच्या समन्वयातून ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आजअखेर ६ हजार ६९२ कामे पूर्ण झाली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात सुमारे ३९१६.८० घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला असून, ९३८.९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
मृद् व जलसंधारणातून शेतीला नवी ताकद
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडींग,सलग समतल चर (CCT), खोल सलग समतल चर (Deep CCT),गॅबियन बंधारे, गॅबियन बंधारे, रिचार्ज शाफ्ट आणि नाला खोलीकरण अशी विविध प्रकारची कामे करण्यात येत आहेत.
या कामांमुळे भूजलपातळीत वाढ, सिंचन क्षमतेत वाढ,मृद् व जलसंधारणाला चालना मिळत असून,त्याचा थेट फायदा शेतीच्या उत्पादनक्षमतेला होत आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याची प्रक्रिया वाढल्याने विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांना आधार मिळत आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रत्यक्ष परिणाम
धाराशिवसारख्या तुलनेने कमी पर्जन्यमानाच्या आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात प्रत्येक थेंब पाणी शेतासाठी महत्त्वाचा आहे.त्यामुळे जलसंधारणाच्या या कामांना केवळ शासकीय योजनेचा भाग न मानता,भविष्यातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची गरज म्हणून पाहिले जात आहे. धरणातील गाळ शेतात आणि पावसाचे पाणी जमिनीत—या दुहेरी प्रक्रियेतून जलसाठा, जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांचे उत्पादन या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक बदल घडत आहे.
*******