Thursday, 9 February 2017

हत्तीरोग नियंत्रण औषधोपचार मोहिमेचा गरजूंनी लाभ घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी –सुनिल यादव



उस्मानागाद.दि.9:- राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम एम.डी.ए.2016-17 अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय, उस्मानाबाद यांनी  दि.10 ते 14 फेब्रुवारी 2017 या दरम्यान आयोजित केलेल्या सामुदायिक हत्तीरोग नियंत्रण औषधोपचार मोहिमेचा जिल्हयातील गरजू जनतेनेही लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी केले.
                 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एम.डी.ए. जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ.विजय भराटे, डॉ.विद्या शिंदे, महिला व बालविकास चे   श्री. शहापूरकर, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                   या  हत्तीरोग  नियंत्रण कायर्यक्रम  यशस्वीतेसाठी  ग्रामीण भागात जिल्हास्तरीय 5 अधिकारी, तालुकास्तरीय 8 अधिकारी, 97 पर्यवेक्षक व 1 हजार 914 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरी भागात जिल्हास्तरीय 3 अधिकारी, तालुकास्तरीय 8 अधिकारी, 11 पर्यवेक्षक व 214 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जबाबदार वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. उस्मानाबाद जिल्हयाची लोकसंख्या 17 लाख 56 हजार 352 असून अपेक्षीत लाभार्थी 16 लाख 33 हजार 408 आहेत. या कामासाठी स्वयंसेवक, कर्मचारी (दोन कर्मचारी एक टीम) 2 हजार 128 आहेत व पर्यवेक्षक (20 कर्मचारी 1 पर्यवेक्षक ) असे एकूण 108 अधिकारी/कर्मचारी  स्वयंसेवक आहेत.

              प्रारंभी  जिल्हा हिवताप अधिकारी श्री. एन.एन.बोरकर यांनी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण  कार्यक्रमाची  रुपरेषा  विशद  केली  व शेवटी  उपस्थितांचे  आभार  मानले.