Monday, 6 February 2017

बळीराजा चेतना अभियानांतर्गत मिशन आरोग्य सप्ताहनिमित्त विशेष महाआरोग्य शिबिर


उस्मानाबाद,दि.6 : ते आले,त्यांनी पाहिलं. त्यांनी जिंकून घेतलं सारं हे वाक्य  तंतोतंत सार्थ ठरविणारे लंडनचे डॉक्टर सालाबादप्रमाणे यावर्षीही सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. हार तुरे नको की पुष्पगुच्छ नको ,भाषण नको की कसले प्रदर्शन नको,आल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात करणारे 85 वर्षाचे लंडनचे डॉक्टर डॉ.जॉन क्लेग आजही तरुणालादेखील लाजवतील  एवढया तडफेने काम करतात. चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा कायम तसाच. लहान मुलांसोबत खेळतात, रमतात त्यांना बक्षीस देतात आणि शस्त्रक्रिया करतानादेखील लोण्यात सुरी  फिरवावी  इतक्या  सहजतेने मोठी शस्त्रक्रिया पार पाडतात. आजपर्यंत सास्तूर येथे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास 800 बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम त्यांनी केले आहे. सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे व जॉन क्लेग यांचे एक अतूट नाते  निर्माण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या मार्गदर्शनाखली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
        सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालय येथे  बळीराजा चेतना अभियान अंतर्गत संकल्प निरोगी उस्मानाबाद जिल्हयाचा, मिशन आरोग्य, विशेष आरोग्य सप्ताह च्या सहाव्या दिवशी 0ते 12 वयोगटातील अपंगत्व ( दिव्यांग ) असलेल्या बालकांची तपासणी व शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. या शिबिराचे उदघाटन लंडनचे डॉ. जॉन क्लेग, अस्थिव्यंग तज्ञ डॉ. मयुरेश वारके ,मलतज्ञ डॉ. प्रमोद काळे तसेच उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राज गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोपल, लोहारा ग्रा.रु. चे वैदयकीय अधीक्षक डॉ. यु. व्ही सूर्यवंशी, निवासी अपंगशाळा सास्तूरचे मुख्याध्यापक श्री. बालाजी नादरगे, स्पर्शचे कार्यक्रम अधिकारी श्री. अच्चुत आदटराव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी 342 बालकांची तपासणी व उपचार करण्यात आले.
              या शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी लंडनचे डॉ. जॉन क्लेग, डॉ. हिमांशू, डॉ.कलपेश, डॉ.शहाबाज तसेच मुबंईचे डॉ .मयूरेश वारके, प्रमोद काळे, डॉ.रोहित व त्यांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ देवनारचे प्रेसीडेंट श्री. ए. व्ही. सुरेश,सतिश लांबा, नागेश भटट, प्रबोध रोटे, अमर रोटे इत्यादी शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी मदत करीत आहेत. स्पर्श ग्रामीण रूग्णालय सास्तूर येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. मंगेश कुलकर्णी हे रूग्णांना विविध व्यायाम तसेच शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी  याबददल मार्गदर्शन करीत आहेत, तसेच आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रावरून या शिबिराबददल जनजागरणही करण्यात येत आहे.
        समाजकल्याण विभागातर्फे चालत असलेल्या उस्मानाबाद, बीड, लातूर, सोलापूर जिल्हयातील अपंग शाळामधून या शिबिराची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही या शिबिरासाठी रूग्णांचा प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरासाठी निवासी अपंग शाळा सास्तूर व मुख्याध्यापक श्री. बालाजी नादरगे यांचेही सहकार्य लाभत आहे. कुठलेही बालक उपचाराविना जाणार नाही याची दक्षता स्पर्श गामीण रूग्णांलयाच्या कर्मचाऱ्यामार्फत घेतली जात आहे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी  व्ही.डी.ओ. कॉन्फरन्सद्वारे रूग्णांशी संवादही साधला.