Wednesday, 8 February 2017

मुलींना सन्मानाने जगण्यासाठी आपले योगदान दयावे - डॉ. प्रशांत नारनवरे






उस्मानाबाद. दि.8:-  मुलींना जनमानसात सन्मानाने जगण्यासाठी अधिकारी वर्गाने आपले योगदान जास्तीत जास्त दयावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आयोजित जिल्हास्तरीय मनोधैर्य टिम  प्रशिक्षण कार्यशाळेत उदघाटन प्रसंगी केले.
          महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात आयोजित मनोधैर्य प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख होते.
                उदघाटन पर प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्याची भूमिका अधिकारी वर्गाची असून यामध्ये डॉक्टरांची भूमिका तर अत्यंत महत्वाची आहे, डॉक्टरांनी आपले वैद्यकीय अहवाल संबंधित विभागांना वेळेत दयावेत, हे काम दैनंदिन कामाइतकेच महत्वाचे आहे, डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालावरून संबंधित विभाग तपासाचे नियोजन करू शकतात, अहवालामध्ये त्रुटी ठेवता कामा नये.
          पिडीतांना दंड करण्याची किंवा शिक्षा ठोठावण्याची जबाबदारी  केवळ न्यायालयाची नसून आपणा सर्वांची आहे. अपराध्यास दंड, शिक्षा होणे नितांत गरजेचे आहे. या कर्तव्‍यासाठी जिल्हयातील डॉक्टरांना प्रशिक्षण दयावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल संबंधित डॅाक्टरांनी  लवकरात लवकर तयार करून पाठवावेत. न्याय देण्याचे काम त्वरीत  करावे, आपल्या सहीची किंमत जाणा, पिडीत मुलगी आपली मुलगी आहे असे समजून सदसदविवेक बुध्दीने अहवाल दयावा, असे ही जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
            यावेळी अध्यक्षीय प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शन करताना पोलीस अधिक्षक पंकज देशमुख म्हणाले की, वैद्यकीय विभागाचे काम पोलीस विभाग करु शकत नाही, वैद्यकीय विभागाने वैद्याकीय अहवाल वेळीच प्राप्त करून देणे महत्वाचे आहे. वैद्यकीय अहवाल उशिरा प्राप्त झाल्यास न्यायदानाची प्रक्रिया मंदावते, यामुळे आपले मत, आपला अहवाल डॉक्टरांनी ताबडतोब दिल्यास पिडीतांना न्याय मिळण्यास मदत होईल.
    या प्रशिक्षण कार्यशाळेस सरकारी वकील ॲड. जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद सोपल यांचे समयोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्यासह जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी  संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
    प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैभव सुर्यवंशी यांनी प्रशिक्षण कार्यशाळेची प्रस्तावना करून शेवटी आभार ही व्यक्त केले.