Tuesday, 20 March 2018

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त रॅली संपन्न




उस्मानाबाद दि.20:- विचार मुखाचा, विचार आरोग्याचा  या घोषवाक्याला अनुसरुन दि. 20 मार्च 2018 रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीस सुरुवात करण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये डॉ. राजाभाऊ गलांडे, डॉ. डी.के. पाटील, डॉ. प्रताप शिंदे, श्रीमती सरस्वती थोरात, मेट्रन तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारीही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निवासी अधिकारी (बा.स.) डॉ. प्रताप शिंदे यांनी डिसेंबर 2017 महिन्यामध्ये केलेल्या जनजागृतीबाबतची माहिती उपस्थितांना सांगितली. तसेच लहान मुलांना 20 दात असतात परंतु मोठे झाल्यावर 32 दातांना तंबाखू सेवनाची सवय लागल्याने युवा पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. त्याकरीता सर्वांनी तंबाखू सेवनापासून दूर राहून इतरांना तंबाखू सेवनापासून दूर ठेवावे असे सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी मार्गदर्शन करताना विचार मुखाचा, विचार आरोग्याचा या घोषवाक्याला अनुसरुन वाघासारखे तोंड उघडा, स्वत: तंबाखू सारखे पदार्थ सेवन न करता इतरांना सेवनापासून दूर ठेवा व आपण स्वत:चे परिक्षण करुन इतरांचे परिक्षण करावे. तसेच जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांनी आपापली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी अधिकारी (बा.स.) डॉ. प्रताप शिंदे यांनी केले तर आभार जिल्हा सल्लागार एन.टी.सी.पी. तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन.सी.डी. विभाग डॉ. विक्रांत राठौर यांनी मानले.
या रॅलीमध्ये जिल्हा रुग्णालय, नर्सिंग कॉलेज, डॉ. शिवाजीराव घोगरे नर्सिंग स्कूल, के.टी. पाटील नर्सिंग कॉलेज, आस्था नर्सिंग कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, संजीवनी नर्सिंग कॉलेज, नवीन नर्सिंग कॉलेज व जीवनज्योती नर्सिंग कॉलेज मधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.