Monday, 19 March 2018

ग्राहक संरक्षण कार्यकर्त्यांनी समन्वयकाच्या भूमिकेने काम करावे -जिल्हाधिकारी श्री.गमे





उस्मानाबाद दि.19:- प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असतेच, मात्र सर्वांना ग्राहक म्हणून आपले अधिकार, हक्क याची जाणीव नसते म्हणून याबाबत जागरुकता वाढावी यासाठी ग्राहक संरक्षण कार्यकर्त्यांनी समन्वयकाच्या भूमिकेने काम करावे,असे प्रतिवादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
          जागतिक ग्राहक हक्क दिना निमित्त जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर, तहसिलदार सुजित नरहरे, नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती मुंबईचे सदस्य संपतराव जळके, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सहसंघटक प्रा. हेमंत वडणे, श्रीमती मेघा कुलकर्णी हे  मान्यवर उपस्थित होते.
          श्री. गमे पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते मग फसवणूक का होते? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शोधणे गरजेचे आहे. यासाठी आपण ग्राहक असताना व नसतानाही आपली भूमिका स्पष्ट असणे आवश्यक आहे, अंतर्मुख होवून आपण आपली भूमिका योग्य प्रकारे निभावतो का याचा विचार करणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले.
          समाजात वावरताना आपण प्रत्येकाने आपण देत असलेली सेवा ही सर्वोत्तम असावी याकडे कटाक्ष द्यावा, तसेच कंज्युमर क्लब स्थापित करुन शाळा-कॉलेजेसमधून ग्राहक संरक्षण आणि त्यासंबंधीच्या माहितीबाबत जनजागृती मोठया प्रमाणावर करावी. आपण स्वत: जागरुक व्हावे, इतरांनाही जागरुक करावे, आपापल्या क्षेत्रात अधिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी केले.
          ते पूढे म्हणाले, शासनाने सेवा हमी कायदा, माहितीचा अधिकार, आपले सरकार या माध्यमातून जनतेसाठी जास्तीत-जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेच, त्याचा लाभ आपण घ्यावा आणि इतरांनाही घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
          यावेळी संपतराव जळके, अनिल पाटील, हेमंत वडणे, मेघा या मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती करमरकर यांनी केले तर आभार तहसिलदार सुजित नरहरे यांनी मानले. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले.