उस्मानाबाद, दि.22 मार्च- चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने
लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आपल्या भन्नाट कल्पक
आयडीया मागितल्या आहेत. 31 मार्च पर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन आपल्या संकल्पना जिल्हा
प्रशासनाला देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील या अभिनव स्पर्धेत देशातील व
महाराष्ट्रातील सर्व कल्पक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
आशुतोष सलिल यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या
मार्गदर्शनात या अभिनव स्पर्धेचे जिल्हा प्रशासनाने आयोजन केले आहे. यापूर्वी
सामान्य जनतेच्या प्रशासनातील अडचणी सोडवता याव्यात, यासाठी मोबाईलवरुन प्रशासनाशी
संवाद साधणारी‘हॅलो चांदा’ हा उपक्रम जिल्हयात कमालीचा यशस्वी ठरला आहे. यामुळे
प्रशासनाची गती वाढली असून जबाबदार प्रशासनाचा जनतेला प्रत्येय येत आहे. खोज
अर्थात शोध नाविण्याचा ही स्पर्धा देखील शेती, उपजिवीका विकास, पर्यटन व प्रशासन
सुधारणा यामध्ये प्रशासनाने काय बदल करावेत, याच्या संकल्पना मागवणारी आहे. सामान्य
व्यक्तीकडे अनेक भन्नाट कल्पना असतात. अशा अफलातून कल्पनांमुळे क्षणात मोठे बदल
संभवतात. अशा बदलांना प्रशासनात उपयोगी आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.
महाराष्ट्रात प्रथमच एखादया जिल्हयामध्ये असा प्रयोग होत असून सर्वदूर जनतेने
यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर या
संदर्भातील लिंक देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
वेबपोर्टलवरही याबाबतच्या सूचना व लिंक देण्यात आली आहे. सर्वात सुलभ माध्यम
म्हणजेwww.maharashtra.mygov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील पत्रकार, विचारवंत, डॉक्टर, वकील व सर्व
क्षेत्रातील मान्यवरांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 1 लाख
2 हजार रुपयांचे रोख बक्षिस ठेवण्यात आले आहे. यासाठी हॅलो चांदा या टोल फ्री
क्रमांक 1800-266-4401 वर माहिती उपलब्ध आहे.