उस्मानाबाद दि.22:- येथील तुळजापूर तालुक्यातील
कात्री गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीस संत तुकाराम वनग्राम योजना सन
2016-17 चे मराठवाडा प्रशासकीय विभागाचे प्रोत्साहनात्मक पारितोषिक घोषित झाले
असून समिती सदस्यांना दि. 21 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या
उपस्थितीत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप 1 लाख 51
हजाराचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. हा कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण
सभागृहात संपन्न झाला.
कात्री गावच्या शिवारात सुमारे 40 हेक्टर वनजमीन
असून वन विभागाकडून वृक्षलागवडीसह जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली आहेत. गावातील
संयुक्त वन व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी मिळून वनाचे जतन केले, त्यांच्या या
कार्याचा गौरव म्हणून त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जागतिक वनदिनाचे
औचित्य साधून गौरविण्यात आले.
यावेळी कात्री संयुक्त वन व्यवस्थापन
समितीच्या अध्यक्षा शैलाताई जांबुवंत कदम, सचिव परशुराम रामचंद्र राठोड, सदस्य जयदेव
भागवत गोंडगिरे, प्रविण त्र्यंबक कदम, सरपंच किशोर पांडुरंग गोंडगिरे, विभागीय वन
अधिकारी आर.ए. सातेलीकर, सहाय्यक वनसंरक्षक आर.जी. मुद्दमवार, वनपरिक्षेत्र
अधिकारी ए.पी. पवार, वनपाल आर.एम. शिंदे हे उपस्थित होते.
