Tuesday, 20 March 2018

21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यासाठी उस्मानाबाद झाले सज्ज !



जिल्हयाला 27 लक्ष 67 हजाराचे उद्दिष्ट
उस्मानाबाद दि.20:-  राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण 20% असल्याने लक्षणीय वाढ करणे प्रकरणी येणाऱ्या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्याकरिता अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
          हरित सेनेची नोंदणी करण्‍यामध्ये महाराष्ट्र राज्यात, आज रोजी उस्मानाबाद जिल्हा 3 लाख 99 हजार 513 एवढ्या सदस्य नोंदणीसह राज्यात व्दितीय क्रमांकावर आहे ही गोष्ट निश्चितच अभिमानास्‍पद आहे.
          वित्त, नियोजन व वने मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासनाचे सन 2016 साली 2 कोटी व सन 2017 साली 4 कोटी वृक्षलागवड यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. आता सन 2018 च्या पावसाळ्यात राज्यस्‍तरावर 13 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
          सन 2018 च्या पावसाळ्यात उस्मानाबाद वन विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यात वनविभागामार्फत 13 लक्ष, ग्रामपंचायतींमार्फत 6 लक्ष 77 हजार तर वनेत्तर इतर शासकीय विभागामार्फत 7 लक्ष 90 हजार असे एकूण 27 लक्ष 67 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत आवश्यक कामे प्रगतीपथावर आहेत.
          आपण सर्वजण मिळून आज 21 मार्च, आंतर्राष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने, सन 2019 अखेर महाराष्ट्रात 50 कोटी वृक्षलागवड करुन, वृक्ष संरक्षण व संगोपन करण्याचा संकल्प करुन 33% वनासह हरित महाराष्ट्राच्या दिशने वाटचाल करुयात, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि विभागीय वन अधिकारी, राजेश्वर सातेलीकर (म.व.से.) यांनी केले आहे.