शारदीय नवरात्र महोत्सव-2017
उस्मानाबाद. दि.30:- श्रीतुळजाभवानीच्या शारदीय
नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा
सोहळा पार पडला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे
माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात
आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली.
मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा
जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधी
करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन
सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर
देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा
होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या
भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व
भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर
परिसर दुमदुमून गेला.