उस्मानाबाद, दि.25:- शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली.
श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी
केली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती.
मात्र विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे भाविकांना
सुलभपणे दर्शन मिळत आहे.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर
मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री देवीजींचे या रुपातील दर्शन घेण्यासाठी
भाविकांनी एकच गर्दी केली. चौथ्या माळेपासून
विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज
देशमुख, व्यवस्थापक (प्रशासन) सुनिल पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत
आहेत. दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही
भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि.26) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही
अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.