शारदीय नवरात्र महोत्सव-2017
उस्मानाबाद,दि.
30:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता
श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूर येथे गुरुवार दि. 21
सप्टेंबर रोजी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे
पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी
करण्यात आले.
यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाची मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली आणि
गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच
खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ती या मंदिरांमध्ये
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या पत्नी सौ. भारती गमे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात
आली. यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी देवीची नित्योपचार पूजा
करण्यात आली.
चौथ्या माळेच्या
दिवशी श्रीतुळजाभवानी देवीजींची ललित पंचमीनिमित्त नित्योपचार पूजा झाल्यानंतर रथ
अलंकार महापूजा बांधण्यात आली.
ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सूर्यनारायण यांनी
त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार
पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
मंगळवारी पाचव्या दिवशी श्री
तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. पाचव्या
माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात आली होती.
श्री
तुळजाभवानीची सहाव्या दिवशी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार
महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर
विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू
यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची
नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी
जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी
विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व
विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला, म्हणून
विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही
अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी दि. 27 सप्टेंबर रोजी श्री
तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी
महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या
हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद दिला होता, म्हणून या दिवशी श्रींस
महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, अशी ही अवतार पूजा
मांडण्यात आली होती.
आठव्या दिवशी
म्हणजे गुरुवारी दि. 28 सप्टेंबर रोजी श्रीतुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी
अंलकार पूजा मांडण्यात आली. त्यानंतर रात्री पूर्णाहूतीही देण्यात आली. त्यानंतर
शुक्रवारी दि. 29 सप्टेंबर रोजी नगरच्या पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात आली,
शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी श्रीदेवीजींची शिबिकारोहण, शमीपूजन आणि सार्वत्रिक
सीमोल्लंघन मिरवणूक काढण्यात आली.
सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत
निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया
परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी
तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण
करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
शेवटी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि जिल्हा
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तमाम उस्मानाबादवासियांना विजयादशमीच्या हार्दिक
शुभेच्छा दिल्या.
शासनाच्या विविध विभागांनी घेतली भाविकांची विविध प्रकारे काळजी
नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन,
मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन,
नगरपालिका, तहसिल कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी.
महामंडळ, आपत्कालीन विभाग आदि विभागांनी भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध
करुन दिल्या. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन
जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.
जिल्हा
प्रशासन :-
जिल्हा प्रशासन
आणि मंदिर संस्थान यांच्या मार्गदशर्नाखाली सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांनी या यात्रेकरिता आलेल्या भाविकांना उत्तम प्रकारे
सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. जिल्हा सूचना –विज्ञान केंद्राच्या ऑनलाईन
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने
जिल्ह्याच्या संकेतस्थळावरुन जनतेसाठी विविध विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरविण्यात
जिल्हा प्रशासनाने एन. आय. सी. मार्फत महत्वाचा वाटा उचलला, नवरात्र महोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी http://osmanabad.nic.in या संकेतस्थळावर ई-लाईव्ह दर्शन ही सुविधा
पुरविण्यात आली. याशिवाय यावर्षी
भाविकांना सुलभ दर्शनासाठी बायोमॅट्रीक पध्दतीने पासेस देऊन प्रथमच अशा प्रवेश पध्दतीचा
अवलंब करण्यात आला.
पोलीस
विभाग :-
नवरात्रौत्सवाच्या
निमित्ताने देशातील दहशतवादी घटनांच्या
पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या
देखरेखीखाली श्री तुळजाभवानीच्या मंदिरात
कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. देवीच्या
दर्शनासाठी 25 लाखांपेक्षा जास्त भाविकांची संख्या
ग्राह्य धरुन प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्यापूर्वी 15 दिवसांपासून चोख
पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षेकरिता
बॉम्बशोधक पथकही सज्ज होते. वृध्द, अपंग भाविकांना पोलीस कर्मचारी
विशेष मदत करीत होते. साधारणत: 2 हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची या
ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक
भाविकांवर प्रत्यक्ष पोलिसांकडून, सामान्य वेषातील पोलिसांकडून तसेच
सीसीटीव्हीमधून बारकाईने लक्ष दिले जात होते. त्यामुळे कोणतीही अप्रिय
घटना घडली नाही, यातच जिल्हा व पोलीस प्रशासनाचे यश आहे.
या यात्रेच्या निमित्ताने महाद्वारासमोर उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने
पोलीस दलातील समाज व मन परिवर्तनात्मक निवडक छायाचित्रांचे अप्रतिम असे प्रदर्शनही
भरविण्यात आले होते.
आरोग्य विभाग :-
महाराष्ट्रासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची
संख्या मोठया प्रमाणावर असल्याने त्यांच्याकरिता तात्काळ आरोग्यसेवा
पुरविण्यात आली होती. गर्दीत काही अघटित घटना घडल्यास जखमी व्यक्तीला
तात्काळ आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे
भाविकांच्या सेवेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकूण 14 प्रथमोपचार
केंद्र सुरू करण्यात आली होती.
एस.टी.महामंडळ:-
या केंद्रांसाठी शहरी भागासाठी वैद्यकीय
अधिकारी, आरोग्य कर्मचारी,
चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
वतीने 13 सप्टेंबर ते 30 सप्टेबर 2017 या कालावधीत मोठया संख्येने ज्यादा
गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
नवरात्रौत्सव काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय
होऊ नये म्हणून एस.टी. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून 125, बीड विभागाकडून 10,
परभणी विभागाकडून 10, लातूर विभागाकडून 10, कर्नाटक राज्याकडून 325
ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
नगरपालिका:-
नगरपालिकेने या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे नेटके नियोजन
केले. सफाई विभागात-07 टॅक्ट्रर, 1 टिप्पर, 10 टमटम, सफाई मजूर (स्थाई)-22 व ठेका
यांच्याकडील एकूण 300 मजूर, लातूर रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्किंग,
आराधवाडी, नळदुर्ग रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली, मोबाईल टॉयलेट-12, तसेच
200 टॉयलेट यात्रा कालावधीत ठेवण्यात आले ठेवण्यात आले होते, फॉगिंग मशिन-3, मंदिरामागील
आराधवाडी भागातील 70 ते 80 ट्रिप कचरा उचलण्यात आला होता व आवश्यकतेनुसार जंतूनाशके
शहरात विविध ठिकाणी वापरण्यात आली होती. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाडयात
सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नगरपालिकेकडून एकूण 8 प्रथमोपचार केंद्रे
निश्चित करण्यात आली होती. भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाद्वारासमोर
मोफत आरओ वॉटरची सुविधा देण्यात आली तसेच शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत
होता. उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले
होते. शहरात आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्युत व्यवस्था करण्यात आली होती.
अग्निशमन विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.
आपत्ती
व्यवस्थापन विभाग :-
जनतेला आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता
शांत राहावे, गडबड गोंधळ करू नये,सैरावैरा पळायला लागू नये, प्रशासन करीत
असलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. तर आपत्ती
व्यवस्थापनासंबंधी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या
होत्या की, आपत्ती व्यवस्थापन साखळीतील लहानापासून मोठया सर्व घटकांनी,
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अत्यंत तत्परतेने आपआपली भूमिका चोख बजावावी,
एकमेकांशी योग्य तो समन्वय राखून आपले कर्तव्य बजावावे,शेवटी
भाविकांची सुरक्षा ही आपली सर्वांत प्रथम जबाबदारी आहे.
या विभागाकडून घेण्यात आलेल्या मॉक
ड्रीलमुळे निश्चितच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
कर्मचारी, मंदीर व्यवस्थापनाचे सुरक्षारक्षक हे कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास,
यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेकरिता सर्व प्रकारे सज्ज
असल्याचे सिध्द झाले होते.
जिल्हा
माहिती कार्यालय :-
या कार्यालयाकडून पत्रकारांसाठी स्वतंत्र
मिडीया कक्ष स्थापन करण्यात आला व या माध्यमातून दररोज श्री देवीजींच्या
बातम्या व छायाचित्रे प्रसारमाध्यमांना त्यांच्या मागणीनुसार पुरविण्यात आल्या,
तसेच सोशल मिडियावरही सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. नवरात्र
महोत्सवासंबंधीच्या बातम्या व छायाचित्रे “महान्यूज” या शासकीय वेबपोर्टलवरही प्रसारित करण्यात आल्या. प्रत्येक
दिवशीच्या विधीची तसेच दररोज नवरात्र महोत्सवाच्या नियोजनात सहभागी असलेल्या एका शासकीय
विभागाची व्हिडीओ क्लिप तयार करुन यूटयूब चॅनल व सोशल मिडीयावर सर्वांना उपलब्ध
करुन देण्यात आली.
या
वर्षी प्रथमच दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवर घटस्थापनेचे, वैदिक होमहवन आणि सीमोल्लंघनाचेही
थेट प्रक्षेपण दि. 21 सप्टेंबर, दि. 28 सप्टेंबर व दि. 30 सप्टेंबर रोजी करण्यात
आले, याचाही लाभ अनेक भाविकांनी घेतला.