Saturday, 29 April 2017

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


उस्मानाबाद, दि.29:-  राज्य शासनाच्या  महात्मा गांधी तंटामुक्त गाव  मोहिमेत उत्कृष्ट वार्तांकन व लेख लिहिणाऱ्या  पत्रकारांसाठी  पुरस्कार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील  पुरस्कारांसाठी  तात्काळ प्रवेशिका  पाठविण्याचे  आवाहन  करण्यात आले आहे.  या पुरस्कारासाठी  2 मे 2016 ते 1 मे 2017 या कालावधीत  प्रसिध्द  झालेले साहित्य  पुरस्कार पात्रतेकरिता  मूल्यमापनार्थ ग्राह्य  धरण्यात  येईल .
            महात्मा  गांधी तंटामुक्त गाव मोहीम  प्रभावी व यशस्वीरित्या राबविण्यामध्ये  प्रसार  माध्यमांचा मोठा  वाटा आहे.  यासाठी पूरक  व प्रबोधनात्मक  बातम्यांच्या माध्यमातून  मोहिमेला  वस्तुनिष्ठ प्रसिध्दी  देणाऱ्या  वृत्तपत्रांच्या बातमीदारांना  जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावरील  पुरस्कार दिले जातात.  जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी या संबंधीचे  निकष  पूर्ण  करणाऱ्या  पात्र  पत्रकारांनी  विहित  नमुन्यातील  अर्ज तीन  प्रतीत  सर्व कागदपत्रे  व कात्रणांसह आठ दिवसात पाठवावेत असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी , उस्मानाबाद यांनी केले आहे.

            पारितोषिकासाठी  विहित मुदतीत वैयक्तिरित्या केलेले अर्जच विचारात  घेण्यात येतील.  एका  वर्तमानपत्राच्या  प्रत्येक  आवृत्तीच्या  एकाच  पत्रकाराचा अर्ज  संपादकांमार्फत  स्विकारण्यात  येईल.  या संदर्भातील  अधिक माहिती तसेच  नियमावली  जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत, कक्ष क्र. 28 उस्मानाबाद  येथे शासकीय  कामकाजाच्या  दिवशी  कार्यालयीन वेळेत  पाहता येईल.